वाघनदीचे गोंदिया जिल्ह्याच्या लोकजीवनात महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाघनदीचा उगम छत्तीसगढ राज्यात असून तिच्या उगमस्थानाजवळच्या गावाचे नावच बाघनदी आहे (हिंदीत वाघचा उच्चार बाघ असा केला जातो). बाघनदी हे गाव वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असले तरी वाघनदीचे ग्रामसौंदर्य मात्र त्या गावाने जपलेले आहे. मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावरील ते गाव, त्याच्या ‘अजीबोगरीब’ (विचित्र) नावाने त्या महामार्गाने जाणाऱ्या-येणाऱ्यांना मोहवून घेते.
वाघनदी एकेकाळी बारमाही प्रवाही नदी होती. माझे गाव बोरकन्हार हे त्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. आम्हाला नदीपर्य॔त पोचण्यासाठी कन्हारी-मातीच्या शेतातून सुमारे एक किलोमीटर चालावे लागते. गावातील गुरेढोरे दिवसातून एकदा तरी त्या नदीला कवटाळत असतच. नदीच्या पात्रात बोरकन्हार व भजेपार या गावांदरम्यान एक खोल डोह होता (आजही आहे). त्या डोहातील पाण्याची खोली किती असेल, यावरही एकेकाळी वाद-संवाद होत असत. कोणी म्हणे, ‘एका खाटेची रस्सीही पुरणार नाही’; तर दुसरा म्हणे, ‘नाही गा! तेवढा खोल नसे डोह, असेल दहा-वीस फूट खोल!’ डोहाच्या काठावर उंबराचे मोठे झाड होते. ते झाड नंतर जेव्हा मी बालकवींची औदुंबर कविता वाचली व ग्रेस यांच्या संपादनाखालील ‘युगवाणी’च्या एका दिवाळी विशेषांकात त्यावरील गूढरम्य ‘लिखाण’ वाचले, तेव्हापासून माझ्या मनोविश्वात जिवंत झाले. आजही ते जिवंतच आहे. ते झाड मात्र अस्तित्वशून्य झाले आहे.