मधुवंतीची मोहिनी (Raga Madhuvanti)

    डॉ. सौमित्र कुलकर्णी यांची शास्त्रीय संगीताविषयीची मालिका सुरु करण्यामागचा उद्देश शास्त्रीय संगीतातले बारकावे विशद करून सर्वसामान्य रसिकांना त्याचा  आस्वाद घ्यायला मदत करावी, हा होता. यातला पहिला लेख रागसंगीत म्हणजे काय आणि तेच भावसंगीत कसे आहे हे सांगणारा होता तर दुसरा लेख शास्त्रीय संगीताच्या मैफलीची मांडणी सर्वसाधारणपणे कशी असते हे सांगणारा होता. यापुढच्या लेखांमधून  डॉ. सौमित्र कुलकर्णी एकेका विशिष्ट रागाचा परिचय करून देतील. याची सुरुवात त्यांनी मधुवंती या काहीशा नवीन असलेल्या रागापासून केली आहे. रागाचे स्वरूप ते उलगडून सांगतील जेणेकरून रागलक्षणे लक्षात ठेवणे, तो ओळखणे सोपे जाईल. राग न ओळखताही गाण्याचा आस्वाद घेणे शक्य असतेच पण त्याचे बारकावे समजले तर आस्वादात भर पडेल इतकेच!

    मोगरा फुलला या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

    -सुनंदा भोसेकर

    मधुवंती या रागाचा आणि माझा तसा अलीकडचा परिचय! कौशिकी चक्रवर्तींनी गायलेल्या ‘काही मान करो सखी री अब’ या मधुवंतीमधील बंदिशीने माझ्याप्रमाणेच अनेकांना वेड लावले होते. तेव्हापासून मधुवंतीवर प्रेम जडले ते कायमचे ! त्यानंतर ऐकण्यात आला तो डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला ‘शिव आद मद अंत’ हा झपतालातला खयाल आणि त्याला जोडून म्हटलेली ‘तू ही रब गरीब नवाज ‘ही आडा चौतालातली द्रुत बंदिश! या रेकॉर्डिंगची मी किती पारायणे केली, हे मलाच सांगता येणार नाही. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात अश्विनीताईंचा मधुवंती जवळजवळ रोज माझ्या प्लेलिस्ट वर असे.

    यानंतर मात्र मधुवंतीचा आपण अभ्यास करावा, त्याच्याबद्दल आणखी वाचावे, ऐकावे असे वाटू लागले आणि एका वेगळ्या दृष्टीने मी रागाकडे पाहू लागलो. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पंडित वामनराव पाध्ये यांच्या कल्पनेतून साकार झालेला हा राग! पाध्येबुवा कोल्हापूरला असत; त्यामुळेच की काय त्यांनी या स्वनिर्मित रागाला ‘अंबिका’ हे नाव दिले होते. पुढे विलायत खांसाहेबांनी त्याचे ‘मधुवंती’ असे नामकरण केले; असा उल्लेख अच्युत गोडबोले आणि सुलभा पिशवीकर लिखित ‘नादवेध’ या पुस्तकात आहे. काही गायक व संगीतज्ञ या दोन रागांमध्ये कोमल निषाद या स्वराच्या आधारे फरक करतात. याचा अर्थ असा की केवळ शुद्ध निषाद वापरून किंवा दोन्ही निषाद वापरून अशा दोन प्रकारे हा राग गायला जातो. वर उल्लेखलेल्या अश्विनीताईंनी गायलेल्या ‘शिव आद’ या बंदिशीच्या मधुवंतीमध्ये दोन निषादांचा सौंदर्यपूर्ण वापर केलेला आढळतो.

    कोमल ग आणि तीव्र म असे स्वर घेऊन मधुवंतीचा डोलारा उभा राहतो. आरोहामध्ये रे आणि ध वर्ज्य; तर अवरोहामध्ये सगळे सूर लागतात व रे वर न्यासही केला जातो म्हणजे रे या सुरावर थांबता येते, स्थिर सुर लावला जातो. कर्नाटकी संगीत पद्धतीमधील ‘धर्मवती’ या रागाशी मधुवंतीचे साधर्म्य आढळते.

    दुपारी उन्हे उतरायला लागल्यावर साधारणतः मधुवंती गायला जातो. उन्हाचा तडाखा ओसरला आहे; पण ऊब कायम आहे, दुपारच्या  वामकुक्षीतून उठलेली एक गृहिणी संध्याकाळच्या कामांचा विचार करण्यात मग्न झाली आहे, दिवसभर कचेरीत राहणाऱ्या माणसाला आता घरी जायचे वेध लागले आहेत, सभोवतालची झाडे आणि त्यावर नाचणारे किलबिलणारे पक्षीही हळूहळू शांत होत आहेत, दिवसाच्या कोलाहलाप्रमाणेच मनातला कोलाहलही शांत होऊ लागला आहे; अशा काहीशा स्वरूपाचे चित्र मधुवंतीच्या सुरातून माझ्या मनात उभे राहते. यात त्रागा नाही, गांभीर्य आहे. स्थिर मनाने विचारपूर्वक समस्यांना सामोरे जायचे मनोवृत्ती आहे; असे सगळे माझ्या मनात येते.  हा माझ्या परीने रागाच्या जवळ जाण्याचा माझा प्रयत्न आहे. आणखी कोणाला काही वेगळेही वाटेल; पण म्हणूनच की काय, मधुवंतीचा नैराश्यग्रस्त रुग्णांवर ‘म्युझिक थेरपी’ म्हणून उपयोग होतो, असे सांगण्यात येते.

    मधुवंती समजून घेताना, तसेच त्या रागाशी मैत्री करताना मी अनेक जणांचे मधुवंती ऐकले. सावनी शेंडे यांनी विस्तृतपणे गायलेला मधुवंतीदेखील मला विशेष प्रिय आहे. ‘जागे मेरे भाग’ हा खयाल, त्याला जोडून ‘ री नंदलाल घर मोरे आये’ ही मध्यलयीची बंदिश आणि देवीची स्तुती करणारी ‘श्री अंबिका जगदंब भवानी’ ही द्रुत चीज अशा तीन रचनांतून सावनीताईंनी मधुवंतीचे अनेकविध पदर अलगद उलगडले आहेत.

    जवळपास सर्व घराण्यातील कलाकारांनी हा राग गायलेला, वाजवलेला आहे. कुमारजींचा ‘बैरन बरखा रितु’, मालिनी राजूरकरांचा ‘लाल की नैना’, वीणा सहस्रबुद्धेंचा ‘ए मातु अंबिके’, आरती अंकलीकरांचा ‘प्यारे पिया बिन मोहे’ अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील .

    ‘मैंआऊं तोरे मंदरवा’ या सुप्रसिद्ध बंदिशीमागची कथा तर सांगण्यासारखी आहे.पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या मैत्रीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मधुवंती मधील ही प्रसिद्ध बंदिश! त्यामागची गोष्ट अशी की काही कारणाने वसंतराव व कुमारजी यांच्यात बोलणे बंद होते. पण वसंतरावांना कुमारजींची आठवण येऊ लागली व त्यांच्याशी बोलावेसे वाटू लागले. तर मग त्यांनी बंदिशीची अस्ताई लिहून कुमारजींकडे पाठवली,

    ‘मैं आऊं तोरे मंदरवा

    पैंया परन देहो मोहे मनबसिया’

    (मी तुझ्या घरी येऊ का? माझ्या मनात वसलेल्या, मला तुझ्या पाया पडू दे)

    याला उत्तर म्हणून  कुमारजींनी लगेच अंतरा लिहिला. तो असा,

    ‘अरे मेरो मढैया तोरा आहे रे काही धरे चरनन मेरो मनबसिया’

    (अरे, माझे घर हे तुझेच आहे. पाय कशाला धरतोस? माझ्याही मनात तू वस्तीला असतोस.)

    या दोघा खरोखरच्या दिग्गजांच्या मैत्रीची साक्ष असलेली ही मधुवंती रागातली बंदिश! ही वसंतराव आणि कुमारजी या दोहोंची शिष्य मंडळी, तसेच इतरही अनेक कलाकार आवडीने गातात.

    जयपूर घराण्याच्या आधीच्या पिढ्यांमध्ये हा राग कमी गायला गेला असावा असे वाटते. रागाचा अर्वाचीन जन्म, हे कारण असेल कदाचित; पण तरी गानतपस्विनी मोगूबाईंच्या ज्येष्ठ शिष्या श्रीमती कमल तांबे यांचे मधुवंतीचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. ज्या पाध्येबुवांनी हा राग निर्मिला, त्यांच्या शिष्योत्तमाने- म्हणजेच ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी या रागाचा आपल्या अनेक संगीतरचनांसाठी वापर केला आहे. गीतरामायणातले ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता’, माणिक वर्मांनी गायलेले ‘बहरला पारिजात दारी’; ह्या गाण्यांतून मधुवंतीची लालित्यपूर्ण रूपे आपल्याला दिसतात. ‘मधुवंतीच्या सुरासुरातून आळविते मी नाम’ हे सुमन कल्याणपुर यांनी गायलेले गाणे आज किती जणांना ठाऊक आहे, हे माहीत नाही; पण त्या गाण्याचे शब्द, दिलेली मधुवंतीतील चाल आणि सुमनताईंचा आवाज यांचा जो मेळ या गाण्यात जमून आला आहे; त्यामुळे हे गाणे अप्रतिम झाले आहे. तसेच सुरेश वाडकर यांचे ‘झनझन झननन छेडिल्या तारा’ आणि आशा भोसले व सुधीर फडके यांनी गायलेले ‘स्वप्नात रंगले मी ‘ हे द्वंद्व गीत, ही गाणीसुद्धा मधुवंतीमधलीच आहेत. संगीतकार मदन मोहन यांनी ‘रस्मे उल्फत को निभायें तो निभायें कैसे’ या गझलनुमा गाण्याला मधुवंतीचे सूर दिले आणि लतादीदींनी त्याचे सोने केले; हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये.

    असा हा मधुवंती राग! जितके त्यातले ख्याल आणि चिजा सुंदर; तितकीच त्यातली सिनेगीते आणि भावगीतेदेखील सुंदर! त्यामुळेच मधुवंतीच्या सुरांनी मनावर घातलेली मोहिनी ही अजून कायम आहे व पुढेही कायम राहील.

    डॉ. सौमित्र कुलकर्णी

    9833318384

    Saumitrapk94@gmail.com

    विशेष आभार: लीलाधर चक्रदेव

    About Post Author

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here