वाखर


वाखर: पंढरपूर जवळ असलेले एक खेडेगाव. तिथे सर्व महाराष्ट्रातल्या पालख्या एकत्र जमतात. ज्ञानेश्वरांच्या पालखीला पहिला मान असतो. वाखरीला प्रचंड रिंगण होते.

हैबतबाबा आरफळकर: हे ज्ञानेश्वरांचे श्रेष्ठ भक्त होते. ते सरदार असले तरी अध्यात्माकडे वळले. ते आयुष्य ईश्वरचिंतनात घालवण्यासाठी आळंदीत आले आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीपुढे रोज भजन करू लागले. ते ज्या विशिष्ट क्रमाने अभंग म्हणत असत त्यातून आजची भजनमालिका तयार झाली. त्यांच्यापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका गळ्यात घालून नेत असत. पण त्यांनी त्या पालखीतून नेण्याची व्यवस्था केली. पालखीसाठी त्यावेळच्या औंधचे राजे पंतप्रतिनिधी त्यांच्याकडून हत्ती-घोडे मागवले. तसेच, त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे सरदार शितोळे ह्यांच्याकडून घोडे, तंबू, सामान वाहण्यासाठी बैलगाडी, नैवेद्य वगैरेंसाठी सेवेकरी हा सारा लवाजमा मिळवला. त्यामुळे पालखी सोहळयाला वैभव प्राप्त झाले. हैबतबाबा लष्करातील अनुभवी असल्यामुळे त्यांनी वारी सोहळ्याला जी शिस्त घालून दिली ती आजही पाळली जाते.

मृदंग


मृदंगवाद्याच्या चामड्याच्या आवरणावर बोटाने, छडीने, काठीने किंवा हाताने आघात करून वाजवतात तेव्हा ते वाद्य 'आनध्द' ह्या प्रकारात मोडते. वेदकाळात आनक, आलंबर, आलिंग्य, कुंभचेलिका, घटदद्दर, डिंडिम, ढक्का, तोमर, दुर्दर, दुंदभी, नंदी, नंदीमुख वगैरे वाद्ये होती. त्यामानाने मृदंग हे बरेच आधुनिक वाद्य म्हणावे लागेल.

मृदंग हा शब्‍द संस्‍कृतमधील मृदा (माती अथवा पृथ्‍वी) आणि अंग (शरीर) या शब्‍दांपासून तयार झालेला आहे. शंकर तांडवनृत्‍य करत असताना नंदीने हे वाद्य वाजवल्‍याचा पुराणात उल्‍लेख आढळतो. पुराणाप्रमाणेच हिंदू शिल्‍पकला आणि चित्रकलेत मृदंगाचे स्‍थान आढळते.

मृदंग हे पखवाज म्हणून ओळखले जाते. त्याखेरीज त्याला माची, मादुला, मुरजा, पणवातक अशीही नावे आहेत. मृदंगाचे जड व हलका मृदंग असे दोन भाग आहेत. भजन-कीर्तनासाठी खैर व सिसम ह्यांचे जड मृदंग वापरतात; तर दिंडीसाठी जांभुळ, शिवण, बाभळ व बिबला ह्यांच्या लाकडापासून बनवलेला हलका मृदंग वापरतात.

मृदंगाचे दोन भाग चामड्याने मढवलेले असतात. त्यांना पुड्या म्हणतात. डावी बाजू म्हणजे मोठी पुडी. तिला धीम, धुमा म्हणतात. तिला कणीक लावतात. उजवी लहान बाजू शायपूड म्हणून ओळखली जाते. तिला तबल्याची शाई लावतात.

पखवाजाच्या सांगाड्यास नाल म्हणतात. ओंडका पोखरलेला मृदंगाचा भाग म्हणजे खोड किंवा डेरा. तसेच पखवाजाच्या शाईच्या पुडीबाहेरचा भाग म्हणजे चाट किंवा टाकणी होय.

आरती - ओवाळणी


प्रज्वलित निरांजन, पणती किंवा दिवा तबकात ठेवून त्याने देव व गुरू यांना ओवाळण्याचा विधी व तसेच, त्यावेळी देवाच्या किंवा गुरूच्या स्तुतिपर गीत म्हटले जाते, त्याला आरती म्हणतात. अरात्रिक ह्या संस्कृत शब्दापासून आरती हा शब्द तयार झाला आहे. बंगाली भाषेत अरात्रिक हा शब्दच त्यासाठी रूढ आहे.

आरत्यांचे काही प्रकार आहेत. प्रमुख देवस्थानात प्रात:काळी काकडारती आणि रात्री शेजारती करतात. काकडा म्हणजे कापडाची जाड वात. काकड्याने केलेली ती काकडारती होय. पहाटपूर्व काळोखात काकडारतीने उजेड केला जात असावा.

संध्याकाळची आरती सूर्यास्त होता होता करतात. ऋषीकेशला गंगेच्या घाटावर अनुभवलेली संध्याकाळची आरती आठवली, तरी प्रसन्न वाटते. त्यावेळी घाटाच्या पाय-यांवर प्रज्वलीत केलेल्या अनेक दीपमाळा आणि दीपदान म्हणून पाण्यात सोडलेले दूरवर तरंगत जाणारे दिवे आणि बरोबर साग्रसंगीत आरतीचा घोष!

पूजोपचारात वेगवेगळ्या क्रियांच्या वेळी वेगवेगळ्या आरत्या, उदाहरणार्थ - नैवेद्यारती वगैरे, मोठमोठ्या मंदिरांमध्ये रात्री शेजारती करून, देवालयाच्या कार्यक्रमाची सांगता होऊन मग देवाला विश्रांती मिळते. (आरत्‍यांचे विविध प्रकार खाली नमूद केले आहेत.)

अग्निपुराण


     अठरा पुराणांपैकी एक पुराण. अग्नीने वसिष्ठाला सांगितलेले विद्यासार अशा अर्थाने ह्या पुराणाला ‘अग्निपुराण’ असे म्हटले आहे.

     वेद व त्यांची षडांगे, मीमांसादि दर्शने इत्यादी सर्व विद्यांना ‘अग्निपुराणा’त ‘अपरा विद्या’ असे  म्हटले असून, जिच्यामुळे ब्रह्मज्ञान होते त्या अध्यात्मविद्येला पराविद्या म्हणून गौरवले आहे. मात्र अध्यात्माविषयी अल्पसे विवेचन असल्यामुळे ह्या पुराणाला तामसकोटीत घातले आहे.

वारकरी


     महाराष्ट्र व कर्नाटक ह्या दोन राज्यांत प्रचलित असलेला एक वैष्णव संप्रदाय. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचे उपास्य दैवत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतश्रेष्ठ त्या पंथात होऊन गेले.

     वारी करणारा तो वारकरी. प्रतिवर्षी किंवा प्रत्येक महिन्यात नियमितपणे एखाद्या पवित्र स्थळाच्या यात्रेला जाण्याची प्रथा असा 'वारी' या शब्दाचा रूढार्थ आहे. वारकरी आषाढी,  कार्तिकी, माघी व चैत्री अशा पंढरपूरच्या मुख्य वार्‍या करतात. ह्या चार महिन्यांपैकी एका महिन्याच्या शुध्द एकादशीस जो पंढरपुरास जातो, त्यास पंढरपूरचा वारकरी म्हणतात.

पालखी


संस्कृतमधील 'पर्थंकिंका'वरून प्राकृत 'पल्लंकिआ' असे रूप झाले व त्यावरून 'पालखी ' हा शब्द आला.
 

पालखी लाकडी असून तिला दोन दांडे असतात. हे दांडे खांद्यावर घेऊन भोई पालखी वाहतात. तिला कापडाचे लाल रंगाचे रेशमी छत व गोंड्याची झालर लावलेली असते. मधोमध, हात धरण्यासाठी गोंडा सोडलेला असतो. पालखी व मेणा ह्यांच्या अर्धवर्तुळाकृती दांड्याच्या शेवटच्या दोन्ही टोकांना हत्ती, वाघ, सिंह किंवा घोडा ह्या प्राण्यांची धातूची तोंडे बसवलेली असतात.
 

एकच माणूस बसेल ती लहान पालखी आणि अनेक बसतात ती शिबिका असे पालख्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. मोठ्या पालख्यांना खिडक्या असून त्यांना पडदे लावलेले असतात. शिबिका चौकोनी असून ती भरजरी कपड्यांनी सजवतात. तिच्या शेंड्यावर चवरी बसवलेली असते.
 

विठ्ठल


ह.भ.प.वै. विष्णुबुवा जोग ह्यांनी संत तुकारामाच्या अभंगांचा आधार घेत विठ्ठलाची व्युत्पत्ती सांगितली, 'वीचा केला ठोबा'. 'वि' म्हणजे 'विद्' म्हणजे जाणणे; ठोबा म्हणजे मूर्ती'. त्यांनी विठोबा म्हणजे ज्ञानमूर्ती असे रूपक मांडले. ही ज्ञानमूर्ती संतांच्या भावदर्शनाने शोभिवंत झाली. ज्ञानाच्या सखोलतेला भावाच्या सौंदर्याची जोड मिळाली आणि  

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटावरी ठेवोनिया।

असा विठ्ठल 'युगे अठ्ठावीस विटेवरी' उभा आहे. ह्याचा अर्थ काय? ह्याची दोन प्रकारे फोड करता येते. चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे ह्यांच्या अठ्ठावीस विटा रचून त्यावर परब्रह्म उभे राहिले आहे. दुसरा अर्थ असा लावला जातो. 'अष्टविंशतितमे युगे' अशी कालगणना मानली जाते. कृत, त्रेता, द्वापर व कली अशा चार युगांची चौकड मानली तर सात चौकड्या विठ्ठल विटेवर उभा आहे.

संदर्भ :1. देखणे, रामचंद्र, 'माहेर पंढरी' सकाळ, 2. दाते य.रा., व कर्वे चिं.ग., महाराष्ट्र वाक्संप्रदाय

 

पंढरीची वारी
विषय : वारी, पालखी, दिंडी

‘अमृतवेल’ बहरत आहे!

प्रतिनिधी 04/07/2011

- अनिल बळेल

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उच्च अभिरुचीच्या साहित्य -नाटक -भावसंगीतामध्ये रमणारा मराठी रसिक माणूस हा संस्कृतिकारणापासून दुरावल्यासारखा झाला आहे. अशा वेळी प्रेक्षकांना-वाचकांना साहित्यविश्वाची ओळख होणे, त्यांना वाचनाची गोडी लावण्याचे प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे, हे ओळखून रविराज गंधे यांनी ‘अमृतवेल’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. सुरूवातीपासूनच स्‍वतःचे वेगळेपण जपणा-या या कार्यक्रमाला ‘सह्याद्री माणिक सन्मान’ आणि ‘गदिमा चैत्रबन’ पुरस्काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

- अनिल बळेल

नव्या शतकावर नव्या तंत्राची हुकूमत कशी चालणार आहे आणि त्यात जुने ते सारे कसे ‘जुनाट’ होणार आहे याबाबत चर्चा सतत चालू असते. त्यात ग्रंथव्यवहार तर जवळजवळ बंद पडणार असे सांगितले जाते. त्याच्या पाऊलखुणा जाणवूही लागल्या आहेत. अशा वेळी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीचे वेगळेपण नमूद केले पाहिजे. दर बुधवारी रात्री साडेआठ वाजता ‘सह्याद्री’ वाहिनीकडे वळले तर पाहायला मिळेल ‘अमृतवेल’ आणि अर्धा तास कसा गेला ते कळणार नाही – ही आहे मराठी साहित्यासाठीची ‘अमृतवेल’!

बाकी सारे ‘चॅनेल्स’ मनोरंजनाच्या नावाखाली वाट्टेल तसा वेळ घालवत असले आणि ‘रिअॅलिटी शो’च्या नावाखाली प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी ‘दूरदर्शन ’वर उदबोधक व उपक्रमशील काही कार्यक्रम होत असतात.

‘वाचू आंनदे’

प्रतिनिधी 01/07/2011

वाचक निव्वळ बघे नव्हेत!

वाचकसमूह, वाचकगट हे नवी मानसिक-सामाजिक-नैतिक ऊर्जाकेंद्रे बनू शकतात का? वाचक होणे म्हणजे त्या काळापुरते स्वत:भोवती कोष विणणे, इतरांपासून वेगळे होणे. असे होत असले तरीदेखील वाचक नुसतेच बघे नसतात. त्यांची साहित्यव्यवहारासंबंधी काहीएक भूमिका असते. दुर्दैवाने, त्यांना आजच्या घडीला साहित्यजगतात चालणा-या सा-या व्यवहारांशी जोडून घेतले जात नाही. हे व्यवहार सत्ताधारी, कंपुवादी अशा हितसंबंधींच्या जाळ्यात अडकले आहेत. वाचकांनी एकत्र येऊन, जात-पात-धर्म-वंश ह्यांच्या पलीकडे जाऊन निव्वळ ‘वाचक’ म्हणून त्यांचे समूह निर्माण होणे ही साहित्य आणि लोकशाही यांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ठरेल.’ प्रसिध्द साहित्यिक मिलिंद बोकील ह्यांची ही भूमिका.

बाजारीकरणाच्या विळख्यात अडकलेल्या साहित्य-संमेलन आणि इतर साहित्य-व्यवहारांपासून दूर ठेवल्या गेलेल्या वाचकांचे ‘प्रबोधन करताना’ त्यांनी ती मोकळेपणाने व्यक्त केली.
 

ऋतुसंहार

प्रतिनिधी 01/07/2011

षांताराम पवार ह्यांनी आपल्‍या शोकाकुल अवस्थेतही पर्यावरणबिघाडाविरुद्धच्या ‘कँपेन’चा ध्यास आर्ततेने व आवेगाने घेतला. त्यांच्‍या एका होर्डिंगवाल्‍या मित्राला त्यांनी सोबतची कविता देऊन, शक्य तेथे प्रदर्शित कर असे सुचवले; दुस-याला ह्या कवितेचा आधार घेऊन पथनाट्य लिहिण्यास व करण्यास सांगितले आणि तिस-याला कवितेची हॅंडबिले तयार करून ती वाटण्याचा कार्यक्रम दिला. पवारांनी आपल्या दु:खाचे उन्नयन असे साधले आहे.! आम्ही ‘थिंकमहाराष्ट्र'तर्फे ती कविता येथे सादर करत आहोत.

 

मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात ज्या दुस-या पिढीने चैतन्य आणले त्यात नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे व चित्रकार-कवी षांताराम पवार ही दोन महत्त्वाची नावे. कॉलेजचे तास संपले की ह्या दोन प्राध्यापकांच्या केबिन जाग्या व्हायच्या. तो काळ प्रायोगिक नाटकांचा होता. त्यामुळे त्या दृष्टीने धमाल असायची. आर्टजत्रेसारखे वेगळे उपक्रम म्हणजे तर विद्यार्थ्यांना आव्हानच वाटे! ह्यामधून पवार ह्यांचे एक पीठ तयार झाले. ह्यातूनच त्यांचा मोठा विद्यार्थिगण बनून गेला. तो आजही ‘पवारसरां’कडे आदराने पाहतो. हे नाते संगीतातील गुरुशिष्यांच्या नात्यासारखे जाणवते..
 

पवारांनी कलेच्या क्षेत्रात अनेक गोष्टी साधल्या तरी त्यांचे प्रयोगशील व सामाजिक मन सतत सजग राहिले. ते ब-याच वेळा त्यांच्या कवितांमधून व्यक्त होई. परंतु गेल्या वर्षीपासून, त्यांच्या चिंतेच्या व चिंतनाच्या विषयांत ‘पर्यावरणा’स प्रमुख स्थान आले. त्यांनी ‘ऋतुसंहार’ ही कविता लिहिल्यानंतर तर त्यांचा तो ध्यास बनला. त्यांच्या मनात ह्या विषयावर ‘कॅंपेन’ कशी करता येईल हेच सतत येई.