प्रत्येक स्वप्नाला जगण्याचा अधिकार आहे! – तेजगढची स्मृतिशिला
राजन खान प्रणीत ‘अक्षर मानव’ या संस्थेने तेजगड येथे योजलेली सहल विचारांनी श्रीमंत करणारी व बौद्धिक आनंद देणारी, अशी अविस्मरणीय होती. सहल जून 2018 मध्ये तीन दिवस आयोजित केली गेली होती. त्यात महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमधून चारशे जणांनी भाग घेतला होता. तेजगड हे ठिकाण गुजरात राज्यात बडोदा ते छोटा उदेपूर हमरस्त्यावर आहे. ठिकाण गुजरातमध्ये असले तरी तेथून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांच्या सीमेवरील गावे काही तासांच्या अंतरावर आहेत. ती बरीचशी आदिवासी गावे आहेत.
‘आदिवासी अकादमी’ ही संस्था गणेश देवी यांच्या प्रयत्नांतून तेजगड येथे उभी आहे. ती वीस एकर जागेवर असून आदिवासींसाठी विविध स्तरांवर काम करते. भारतातील लोप पावत चाललेल्या सर्व बोली भाषा तेथे ऑडिओ व पुस्तक रूपात जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. आदिवासी भाषांसंदर्भात जास्तीत जास्त लेखनसाहित्य उपलब्ध करून देणारे सुसज्ज ग्रंथालय तेथे आहे. ‘आदिवासी अकादमी’ व ‘भाषा केंद्र’ या संस्था संलग्न आहेत. संग्रहालय ग्रंथालयाच्या जवळच आहे. आदिवासींची कलापूर्ण व सांस्कृतिक जीवनरहाटी उलगडून दाखवणारी साधने, चित्रे संग्रहालयात पाहण्यास मिळतात. त्यांतील अनेक वस्तू आदिवासींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. आदिवासींचे जगणेच त्यातून जिवंत झालेले आहे.