साहित्य संमेलनाच्या अलिकडे - पलिकडे
बडोद्याचे 91 वे संमेलन यथास्थित पार पडले. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रागतिक बोलले. संमेलन संयोजनाला सरकारकडून दरवर्षी पंचवीस लाखांऐवजी पन्नास लाखांची कमाई हे बडोदा संमेलनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीचे यश मानले जाईल! ‘इव्हेंटवर असे खर्च करावे की स्थायी स्वरूपाच्या सांस्कृतिक कार्यावर’ अशा चर्चा झडत राहतील. अध्यक्षांची निवडणूक नववर्षासाठी पुन्हा जाहीर झाल्यावर मंद वाहणाऱ्या साहित्यप्रवाहात पाण्यात दगड फेकल्यावर उठतो तसा खंगळा उठेल! अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया, संमेलन माफियांनी हायजॅक केलेली निवडणूक, महामंडळाच्या सलग्न संस्थांची दादागिरी अशा मुद्यांवर चर्चा होईल. दरम्यानच्या काळात नेमाडे यांना एखादा पत्रकार पुन्हा तोच प्रश्न ‘लाईव्ह’ विचारील आणि नेमाडे तेच ते तडकफडक उत्तर देतील किंवा.... तेही ज्ञानपीठानंतर शांतावले आहेत. शो मस्ट गो ऑन. ती माणसाची सांस्कृतिक प्रकृती.