भूतखांबचा लोकलढा
गोव्याच्या शांत, सुशेगात भूमीत गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात पर्यावरणासाठी एक उग्र आंदोलन घडून आले. त्यात एका सत्याग्रहीचा बळी गेला, परंतु ड्युपाँटसारख्या बलाढ्य अमेरिकन कंपनीला गोव्यातून पळ काढावा लागला. लोकशक्ती काय चमत्कार करू शकते याचे ते उत्तम उदाहरण आहे. आंदोलन सर्वसामान्य गावकऱ्यांनी, विशेषत: महिलांनी चालवले. त्यांचा निर्धार असाधारण दिसून आला. त्यांना साथ व मार्गदर्शन मिळाले ते स्थानिक बुद्धिजीवी वर्गाचे – डॉक्टर, आर्किटेक्ट अशा व्यावसायिकांचे. त्या लढ्याच्या, त्यास पंचवीस वर्षें उलटून गेल्यानंतर, दोन स्मारकांखेरीज खुणा काही शिल्लक राहिलेल्या नाहीत. पैकी एक आहे तो स्थानिक बंडखोर तरुण निलेश नाईक यांच्या नावाचा चौथरा. निलेश एका निर्णायक प्रसंगी गोळीबारात मरण पावले. सत्याग्रहींनी त्यांचे दहन फॅक्टरीच्या गेटसमोर रस्त्याच्या कडेला केले. अंत्ययात्रेला तीन-चार हजार लोक जमले. दहनासाठी बांधलेला चौथरा म्हणजेच त्यांचे स्मारक. ते तेथेच रस्त्यावर उभारण्याचा निर्णय केला. त्या स्मारकाची उभारणी हा त्या आंदोलनाचाच भाग होऊन गेला.