गोव्यातील नाताळ : ख्रिस्तजन्माचा उत्सव प्रतिनिधी 17/06/2014

मला सगळ्या भारतीय सणांत नाताळचा सण आवडतो. मी गोव्यात नाताळच्या सणापासून नव्या वर्षापर्यंत छोटीशी सुट्टी घेतो. स्थलांतरित पक्षी थव्याथव्याने यावेत तसे परदेशस्थ सगेसोयरे आणि मित्र-मैत्रिणी त्या वेळी गोव्यात परततात.

दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होण्याची ती वेळ आहे. आता रात्री छोट्या आणि दिवस मोठे होणार. आभाळ कसे नितळनिवळ झाले आहे. रात्री ते नक्षत्रांनी कुचकुचून भरून जाणार आहे. पहाटेचा सायसाखरेचा उजेड वस्त्रगाळ होऊनच क्षितिजावर पसरणार आहे. उजेडाचे दिवस येणार. पानगळ संपणार. सृष्टीचा गर्भवास संपून तिचा सृजनसोहळा सुरू होणार! इगर्जीच्या घांटी वाजल्या की न परतलेल्या इष्टमित्रांच्या आठवणी असह्य होणार. आता पाण्याचे रंग होणार. आता बोटांचे ब्रश होणार. साखर आता अधिक गोड होणार. आता शब्द मऊ-मुलायम होणार. गीतांचे संगीत होणार. आता पायांत नाच येणार आणि आता वस्त्रांचे पिसारे फुलणार. आता जीवनाचाच केक होणार. नाताळ त्याच्या नाजूक बोटांनी त्यावर आयसिंग घालणार.

येसू ख्रिस्ताचा जन्म खरेच २४ डिसेंबरला झाला की काय याबद्दल गूढच आहे. खरी गोष्ट ही, की पॅगन लोक ख्रिस्त जन्मापूर्वीपासून शेकडो वर्षें, २४ डिसेंबरला उत्तरायण सुरू होत असल्यामुळे तो उजेडाचा दिवस म्हणून साजरा करत होते. त्यामुळे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस कधी का असेना, त्याच्या जन्मदिवसाचा उत्सव त्याच दिवशी साजरा करण्याची रीत पडली असावी.