रंगभूमीचे मामा - मधुकर तोरडमल
प्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध मामा तोरडमल. त्यांचा जन्म 24 जुलै 1932 रोजी झाला. मधुकर तोरडमल यांच्या नाट्याभिनयाची सुरुवात ही त्यांच्या मुंबईतील शाळेपासून झाली. ते दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे काका मुंबईत सांताक्रुझ पोलिस ठाण्यात अधिकारी होते. काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणले. ‘शेठ आनंदीलाल पोद्दार’ ही त्यांची शाळा. त्यांनी शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना, त्यांना नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षक जयकरबार्इंना सांगितले. बार्इंनी गणेशोत्सवात एका नाटकाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. त्यांनी चिं.वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक बसवले. त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनयही केला. पुढे, शाळेचे स्नेहसंमेलन आणि अन्य कार्यक्रम यांतून नाटक बसवण्याची जबाबदारी ओघानेच तोरडमल यांच्याकडे आली. त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली.