अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती...
‘हे नद्यांतील उत्तम, उत्तम माते आणि उत्तम देवी, आम्हा पामरांना ज्ञान आणि विवेक दे.’
भारतीय समाज आणि संस्कृती यांची पायाभरणी गंगा-यमुना-सिंधू या नद्यांच्या साक्षीने झाली. नदीच्या पात्रात होणारे बदल आणि प्रवाहाच्या सतत बदलत्या दिशा यांनी अनेक शहरांवर महत्त्वाचे परिणाम केले. भारतातील सर्वांत जुनी संस्कृती-सिंधू संस्कृती इसवी सनपूर्व 2700 च्या आसपास वायव्य भारत-राजस्थान-पाकिस्तान या भागांत उदयाला आली. थर वाळवंट, पंजाब, दक्षिण सिंध, सिंधू-घग्गर-हाक्रा नद्यांची खोरी आणि बलुचिस्तान येथे वसलेली पुरातन संस्कृती. त्यांची आखीवरेखीव नगरे, नदीच्या आसऱ्याने वाढलेला तो पहिला नागर समाज. भारताच्या सामाजिक जीवनाचा तो पहिला अध्याय. हडप्पा आणि मोहेंजोदारो यांची नगररचना पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की सिंधू संस्कृती ही खरेच नदीच्या आणि पाण्याच्या आसऱ्याने वाढली होती. मोहेंजोदारोमध्ये उत्खननात सुमारे सहाशे ते सातशे विहिरी सापडल्या. म्हणजेच, त्या शहरातील प्रत्येक व्यक्तीला दर तीस-पस्तीस मीटर अंतरावर पाणी मिळेल अशी सोय केली गेली होती. गुजरातमध्ये धोलवीरा येथे सापडलेल्या अवशिष्ट शहरात जवळून वाहणाऱ्या दोन नद्यांचे पाणी कालवे काढून शहरात आणले गेले होते.