भोगी - आनंदाचा आणि उपभोगाचा सण
पौष महिन्यात येणा-या मकरसंक्रांतीच्या सणाच्या आदल्या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. तो आनंदाचा आणि उपभोगाचा सण अशी लोकधारणा आहे. त्या दिवशी घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जातो. पूर्वी स्त्रीया भल्या पहाटे उठून घराला शेणाने सारवून घेत असत. घरासमोर रांगोळ्या काढत. त्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.
स्त्रिया भोगीच्या दिवशी नवे अलंकार परिधान करतात. त्या दिवशी सासरी गेलेल्या स्त्रिया सणाकरता माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन तो सण साजरा करतात. दुपारच्या जेवणात तिळ लावलेल्या बाजरीच्या भाक-या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, मूगाची डाळ, चटणी आणि तांदूळ घालून केलेली खिचडी असा खास भोगीचा बेत असतो. या दिवशी एक खास भाजी केली जाते. त्यात चाकवत, बोरे, गाजर, डहाळ्यावरील ओले हरभरे, ऊस, वांगे, घेवड्याच्या शेंगा आणि तीळ अशा विविध गोष्टी टाकल्या जातात. त्या भाजीस खिंदाट असे म्हटले जाते. बाजरीच्या भाकरीसोबत खिंदाट खाल्ले जाते. जोडीला राळ्याच्या तांदळाचा भात तयार केला जातो.