वाचन व विकासाच्या प्रसारक!
अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’! त्या गावातील साध्या, सर्वसामान्य महिलेसारख्या दिसतात, पण बोलू लागल्या, की वाणी भल्याभल्यांना विचार करण्यास भाग पाडेल अशी – त्यांची वर्णनशैली बघा, हं – “वीरपत्नी कोण, तर जिच्या पतीने देशासाठी बलिदान दिले ती. तो सैनिक त्याला वीरमरण आले म्हणून थोर झाला, मात्र त्याच्या मागे आयुष्याला धैर्याने सामोऱ्या जाणाऱ्या वीरपत्नीला समाजात स्थान कसे दिले जाते? तिचे दागिने, तिला सन्मानाने दिलेली सरकारी मदत; सगळे काही हिसकावून घेतले जाते”... बेबीताई समाजातील एक हिडीस वास्तव पोटतिडिकेने मांडतात... “आपण वाचतो, शिक्षण घेतो, पैसा मिळवतो, त्याचा उपयोग काय? फक्त दोन वेळा खायला, की आपल्याच लोकांसाठी मार्ग दाखवायला?” त्या असे प्रश्नामागून प्रश्न धारदारपणे विचारत जातात.