जीआयएफनी गणित झाले सोपे
गणिताशी गट्टी असलेला विद्यार्थी तसा विरळाच; अनेकांसाठी तर अभ्यासातील मोठा शत्रू म्हणजे गणित असतो. अनेकांचे शिक्षण थांबते, ते केवळ गणिताशी असलेल्या कट्टीमुळे. शमशूद्दिन अत्तारसरांनी नेमके ते पाहिले आणि ठरवले, की मुलांची दोस्ती गणिताशी करून दिली पाहिजे. ते विविध उपक्रम त्याच भावनेतून राबवत आहेत. त्यांनी उपक्रमांची आखणी तंत्रज्ञानाचा वापर करून साधली आहे व त्यामुळे त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर जास्त होतो असा त्यांचा अनुभव आहे.
शमशूद्दिन हे राहतात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील शिरगावला. ते तेथील शाळेत आठवी-नववी-दहावी या इयत्तांना गणित विषय शिकवतात, पण त्यांचे ज्ञान, त्यांची प्रयोगशीलता आणि कळकळ साऱ्या जगाला व्यापून उरणारी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी याकरता गेली दोन दशके जो खटाटोप चालवला आहे तो थक्क करून सोडतो. त्याचे फळ म्हणजे त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या मोठ्या अभ्यासक्रमांना जगभरच्या विद्यापीठातून शिकत आहेत.