वसुबारस (Vasubaras)
वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्याप्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते.
आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात –
तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||
अर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.