दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती
तमाम महाराष्ट्रातील परस्परविरोधी (आणि परस्पर पूरकही!) विचारांच्या लोकांचे विराट सांस्कृतिक संमेलन जर कोठे पाहण्यास मिळत असेल तर ते फक्त मराठी दिवाळी अंकांमध्ये! साहित्य हे जीवनाचे प्रतिबिंब या उक्तीचा दिवाळी अंकांच्या संमिश्र भट्टीत अचूक प्रत्यय येतो. दिवाळी अंकांतील याच समाजदर्शनाचा अर्थ असाही होऊ शकतो, की दिवाळी हा सण महाराष्ट्रातील पुरोगामी आणि प्रतिगामी विचारांच्या समर्थकांस मान्य आहे! म्हणून दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मराठी संस्कृतीकडे सहजपणे (चिकित्सकपणे नव्हे) टाकलेला हा एक दृष्टिक्षेप –
शिकले-सवरलेले, उच्च अभिरुचीसंपन्न मराठी लोक दिवाळी साजरी करताना दिसतात; मात्र नरक चतुर्दशीला आंघोळ का करतात? नरकासुराला मारल्याचा आनंद कारंटासारखे फळ पायांनी चिरडून साजरा का करतात? लक्ष्मीपूजन, बलिप्रतिप्रदा... सगळे यथाविधी पार पाडतात. ‘इडा पिडा टळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे’ असे म्हणून बळीराजाचे पूजन करतात. मात्र, तेच लोक नरकासुराला का मारले? बळीराजाला का आणि कोणी मारले? हा विचार करताना दिसत नाहीत. बहुतांश भारतीय सण कोणाच्या तरी हत्येशी संबंधित आहेत.