निसर्गमित्र वासुदेव वाढे
वासुदेव वाढे यांची जळगाव शहरात सर्पमित्र म्हणून ओळख आहे. वासुदेव बीएस्सी करत असताना ते लहान साप पकडत. तसे करत करत त्यांनी विषारी, बिनविषारी साप पकडले आणि त्यांना न मारता जंगलात सोडून देत. त्यांनी साप पकडण्याचे प्रशिक्षण सागर ढाके यांच्याकडे घेतले.
शहरात, ग्रामीण भागात कोठेही साप निघाला, की वासुदेव त्याला पकडण्यासाठी तयार असतात. ते सापाप्रमाणेच काही दुर्मीळ किंवा प्रवासी पक्षी-प्राणी यांचीदेखील काळजी घेतात. त्यांना दोन वेळा सर्पांनी दंश केला आहे, परंतु ते बचावले. मात्र त्यांनी सर्पमैत्रीचे कार्य सोडले नाही. वासुदेव यांनी त्यांच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांना देखील साप पकडण्याची आणि पक्ष्यांची काळजी घेण्याचे शिकवले आहे.
वासुदेव जळगावमधील ‘वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थे’सोबत 2008 पासून कार्यरत आहेत. त्यांचे संस्थेसोबत वन्यजीवांची काळजी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम, पर्यावरण शाळेतील ‘निर्माल्य संकलन अभियान’ यातही महत्त्वपूर्ण कार्य आहे. किंबहुना वासुदेव यांची सर्पमैत्री संस्थेबरोबरच्या कामात विस्तारत गेली व ते निसर्ग, पर्यावरण अशा व्यापक विषयांत रस घेऊ लागले.