गाडगेबाबांच्या... बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना
अमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876 ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. त्या रस्त्याने जात असताना कोठल्या तरी महाराजांची वारी आणि पालखी अशी दोन दृश्ये मला पाहण्यास मिळाली. दिंडीत शंभरेकजण होती. त्यात तरूण, तरूणी, वृद्ध पुरूष, स्त्रिया व काही लहान मुले यांचा समावेश होता. सर्वांच्या डोक्यांवर पांढऱ्या रंगाच्या टोप्या होत्या. दिंडीच्या मागे जेवणाची, आराम करण्याची साधनसामग्री भरलेला ट्रॅक्टर होता! एकंदरीत, ‘स्पॉन्सर्ड इव्हेंट’ वाटत होता! चमत्कारी बाबांची चलती असल्याने तशा ठिकाणी जास्त गर्दी आढळते. ती दिंडी मागे टाकत मी पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही कडांना शेतात हरभऱ्याचे पीक दिसत होते.
शेंडगाव जसे जसे जवळ येत होते, तसे माझे मन अधिक रोमांचित होत होते, मनात विचारांची दाटी झाली होती.