विलास शहा - कथा त्र्याऐंशी वर्षांच्या तरुणाची!
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण वाचनालय चळवळीचे अध्वर्यू , कत्तलखान्याला निघालेल्या तब्बल सतरा लाख मुक्या पशूंना त्यांच्या ‘टीम’च्या सहकार्याने जीवनदान देणारे गांधीवादी समाजसेवक, साने गुरुजींच्या सहवासात राहून 'राष्ट्र सेवा दला'चे विचार नसानसात भिनलेला कार्यकर्ता आणि खायच्या अन्नाची व गुंडाळायला कपड्यांची भ्रांत असणा-या देशातील गरिबांची पदोपदी आठवण राहवी म्हणून दररोज एकदाच अन्न घेणारा व वर्षातून केवळ चार पांढ-या बंड्या व पायजमे ही त्यांनी स्वत:ला घालून दिलेली मर्यादा... शिवाय, पदोपदी त्यांच्यातील धावून जाणारा लोकसेवक. शब्द कमी पडतील अशी ही ओळख!
जिल्हा सोलापूर. त्यात माढा नावाचे आटपाट गाव. विलास शिवलाल शहा हे या युवकाचे नाव. वय अवघे त्र्याऐंशी वर्षांचे! तुम्ही त्यांच्या वयावर जाऊ नका. कसलाही काठीचा आधार नाही, विश्रांती नाही, कोठली व्याधी नाही की कोठला आजार नाही. तरुणपणाचा तोच ठणठणीतपणा आणि तीच उमेद.