दोष देणे बंद करा

प्रतिनिधी 18/07/2011

     मुंबई बॉम्‍बस्‍फोट झाल्‍यानंतर सर्वसामान्‍य माणसापासून मोठमोठ्या मंत्र्यांपर्यंत सर्वांच्‍याच प्रतिक्रिया या इतरांवर दोषारोपण करणा-या आहेत. सरकारी कर्मचारी दुस-या खात्‍यातील व्‍यक्‍तीवर, मंत्री दुस-या मंत्र्यावर, पोलिस जनतेवर... असे सगळेच स्‍वतःला वगळून दुस-यावर काही ना काही टिका करतच आहेत. महाराष्‍ट्रापुरतं हे प्रकर्षांने जाणवतं. मात्र आपल्‍याला दुस-यांना दोष देऊन चालणार नाही. कारण आपण सगळेच या समाजाचा आणि व्‍यवस्‍थेचा भाग आहोत.

     आमच्‍या इथे पार्ल्‍यात सिग्‍नल बसवून 10 वर्षे झाली. अद्याप ते सुरू झालेले नाहीत. ते सुरू का होत नाहीत अथवा त्‍यासाठी खर्च झालेले 5 – 10 लाख रूपये कुठे गेले? याबद्दल कुणीच काही विचारलेले नाही. यामध्‍ये मी देखील आलो. आपल्‍या विभागात रस्‍त्‍यांवर खड्डे पडतात, मात्र या रस्‍त्‍याचे कंत्राट कुणाला दिले होते? असा जाब आपण कधी नगरसेवकाला विचारायला जात नाही. मीही गेलो नाही. प्रत्‍येकाने तोडं उघडले पाहिजे, जाब विचारला पाहिजे. राज ठाकरे म्‍हणाले, की हे सगळं परप्रातियांच्‍या येण्‍यामुळे घडले. पण हे परप्रांतिय मुंबईत येतात त्‍या वेळी त्‍यांना वसविण्‍यासाठी कोण मदत करतं? आज नेपियन्‍सी रोडनजीकच्‍या टेकडीवर झोपड्या बांधल्‍या जात आहेत. ही गोष्‍ट तेथील अधिकारी, आमदार, खासदार आणि राज ठाकरे यांना आणि मलाही दिसत नाही का? शेवटी आपलंच नाणं खोटं! सर्वसामान्‍य माणसांचा राजकर्ते आणि लोकप्रतिनिधींवर दबाव असणे आवश्‍यक आहे.

     जर प्रत्‍येकाने आपापले व्‍यवहार सचोटिने केले, बेकायदेशीर गोष्‍टींना प्रोत्‍साहन दिले नाही तर हे घडणार नाही. समाजातील सहसंवेदना शून्‍यवत झाली आहे. शिस्‍त शोधूनही सापडत नाही. आपले सामाजिक जीवन सुसह्य करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या या गोष्‍टी समाजातून लुप्‍त होताना दिसतात. जर त्‍या जागृत झाल्‍या तर हा गलथानपणा निश्चितपणे कमी होऊ शकेल.

-   कुमार नवाथे, 02226118309

 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.