बालगंधर्वांचे पत्र


माझ्या मुंजीत मला आशीर्वाद देण्यासाठी बालगंधर्व आले होते. माझी मुंज भरवस्तीतल्या ब्राह्मणसभेत होती. मी आठ वर्षांचा असल्याने मला काही कळत नव्हते. बालगंधर्व आले आहेत असे कळल्यावर त्यांना पाहणा-यांची अतिशय गर्दी जमली होती. ते माझ्या मुंजीला येण्याचे कारण म्हणजे माझे वडील विष्णुपंत मराठे हे गंधर्वांचे परमभक्त. ते स्वतःही गात असत. गंधर्व मंडळीचा बडोद्यात मुक्काम असला की विष्णुपंत प्रत्येक खेळाला हजर असत. त्यातून त्यांची ओळख झाली होती.

एकदा गंधर्वांचा चेहरा थोडा खिन्न असता विष्णुपंतांनी विचारले, 'नारायणराव, काय अडचण आहे ती मोकळेपणानं सांगा'. तेव्हा ते म्हणाले, की थोडी पैशांची गरज आहे. तेव्हा माझ्या वडिलांनी बालगंधर्वांना त्या काळात अकराशे रूपये दिले होते. माझे वडील निष्कांचन अवस्थेत मुंबईला आले होते. ते गिरगावातल्या माधव एजन्सीत नोकरी करत. तेथे बडोद्याचे अलेंबिक केमिकलचे मालक भाईलालभाई अमीन आले असता त्यांनी लहान असून चुणचुणीत असलेल्या माझ्या वडिलांना पाहिले आणि ते त्यांना घेऊन बडोद्याला आले. आम्ही आणि सबनीस सावंतवाडीचे. आम्ही दोघांनी मिळून 'मराठे ब्रदर्स' हे औषधाचे दुकान काढले. दुसरे दुकान नानासाहेब फडके यांचे होते. बडोद्यात ती दोनच दुकाने असल्याने दुकानात खूप गर्दी असे. आम्ही आर्थिक रीत्या सुखी होतो. त्यामुळे वडील बालगंधर्वांना पैसे देऊ शकले.

पुढे बालगंधर्वांना पक्षाघाताचा झटका आला. तेव्हा बडोद्याचे डॉ. किर्तने त्यांच्यावर उपचार करत असत. विकलांग गंधर्वांना किर्तने यांनी आपल्या घरीच ठेवून घेतले व ते म्हणाले, की 'आता माझ्या इथंच राहा. मी तुम्हाला बरं करीन'. किर्तने स्वतः बालगंधर्वांच्या गाण्यावर फिदा होते. त्यांना असं वाटत असे, की असा गायक यापूर्वी झाला नाही आणि पुन्हा होणारही नाही!

गंधर्व आजारी असून त्यांनी रोजचा रियाझ सोडला नव्हता. त्यांना तबलजींची साथ लागे. दोन-तीन तबलजी त्याच्या मनाप्रमाणे वाजवू शकत नव्हते. शेवटी, त्यांनी विष्णुपंतांना सांगितले, की तुमच्या मुलाला पाठवा. वडिलांनी मला पाठवले आणि माझा तबला त्यांना पसंत पडला. त्यानंतर दीड महिना मी रोज संध्याकाळी त्यांना साथ करायला जात असे. गंधर्वांच्या मनासारखी साथ करणे कठीण होते. पण मला माझ्या आईकडून तालज्ञान झालेले होते. ते मला गंधर्वांना साथ करताना उपयोगी पडले. त्‍यानंतर बालगंधर्व घरी परतले. काही दिवसांनंतर मला बालगंधर्वांच्‍या हस्‍ताक्षरातील पत्र मिळाले. त्‍यात त्‍यांनी माझे तबलावादन अवडल्‍याचे कळवले होते. एवढ्या महान कलाकाराला माझे तबलावादन पसंत पडलेले पाहून मला हर्षोल्‍हास झाला. ते पत्र इथे सोबत देत आहे.
बडोद्यात मला लक्ष्मणराव दाते, नाना गुरव, सोनबा गुरव आणि इमामअलिखान यांनी तबला शिकवला. तर मी मुंबईला जेव्हा माझ्या बहिणीकडे जात असे तेव्हा मे महिन्यात मला वसंतराव आचरेकर आणि कामोरा मंगेशकर यांच्याकडून तबला शिकायला मिळाला. आचरेकरांनी माझ्याकडून कधीही पैसे घेतले नाहीत.

आजवर मी ज्योत्स्ना भोळे, डी.व्ही.पलुस्कर, माणिक वर्मा, राम मराठे, व्ही.जी.जोग, कुमार गंधर्व व पं.भीमसेन जोशी यांच्याबरोबर साथ केली आहे. बसवराज राजगुरू यांच्याबरोबर मी बारा मैफली केल्या. एकदा भीमसेन जोशींबरोबर तबलजी येऊ शकले नव्हते तेव्हा मी त्यांच्याबरोबर साथ केली होती.

(बाळासाहेब विष्णुपंत मराठे यांचे बडोद्यातील रावपु-यात विक्रम फार्मसी नावाचे औषधांचे दुकान आहे. ते स्वतःही औषधोपचार करतात. बाळासाहेब हे बडोद्यात गेली पंचवीस वर्षे 'स्वरविलास' या शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करणा-या संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.)

- बाळासाहेब विष्‍णूपंत मराठे
शब्दांकन
: प्रकाश पेठे

लेखी अभिप्राय

Vachun Khup chan vatle. Balkrishna marathe maze mothe mama, vishnu pant marathe maze aai che vadil. Sarth abhiman vatla doghancha. Tyanchya Anushyabharachya mehenatibaddalche gaurav udgar vachun manala samadhan vatle.

Sau. Ashwini …07/04/2016

पत्र वाचून दादांची खूप आठवण आली. पत्र सर्वांना वाचायला मिळाल्याचा जास्त आनंद झाला. हा ठेवा जपून ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

मंजिरी परांजपे08/04/2016

Bala sahebana mi far javlun bhaghitle ahet. Ekach gallit rahato. Shahapuryat shri paradkaran kade dar rivivari balasaheb natyasangit mhanayche. Tyanchya Barobbar vel milel tasa Tabla vajbaycho. Tyanchya avaj ekdam khada hota.

Dr.Bhaskar Sha…15/04/2016

Bala saheb uttam tabla vadak hote. PT. Shamtaprasdjini tyanchya Tabla aiklyavar swatakade Tabla shiknyas bolavle hote.Tyani asnkhya mothya kalakaranna sath dili hoti. Badodya madhye tyanchya sathicha karyakram Jo Sanskar Bharti ne ayojit kelela PT. Madhusudan Joshi satkar samaroh tya madhye mastaran Barobbar tyanchi shevtchy mothi sath hoti. Te swata sangit kshetratle all-rounder hote.

Dr.Bhaskar Pendse15/04/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.