मराठी अस्मिता !


मराठी अस्मिता आज महोत्सव साजरे करण्यात गुंतली आहे... तर अशा परिस्थितीत ‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ या सेनापती बापटांच्या उक्तीचे काय होणार? – सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राला पुरूषोत्तम रानडे यांनी विचारलेला नेमका प्रश्न..

सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र
 

मराठी अस्मिता !

- पुरुषोत्तम रानडे, संपादक, ‘ईशान्य वार्ता’

पुरुषोत्तम रानडेसध्या सर्वत्र महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणूस हा विषय चर्चेत आहे. अस्मिता म्हणजे ओळख, वैशिष्ट्य! मराठी माणसाचे वैशिष्ट्य कशात आहे? काळाच्या पुढचा विचार करणारा, विविध प्रकारच्या संस्था उभारणारा, त्या चालवण्यासाठी आयुष्यभर धडपड करणारा, सदैव संपूर्ण देशाचा विचार करणारा, आधुनिक पुरोगामी विचारसरणीचा इत्यादी. गेल्या शतकात वरील वैशिष्ट्ये असणारे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रात निर्माण झाले म्हणूनच सेनापती बापट

'महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले'

असे अभिमानाने म्हणू शकले!

जयवंत कोंडविलकरआज मात्र मराठी माणसाची अस्मिता वेगवेगळे महोत्सव साजरे करण्यातच खर्ची पडत आहे. सर्व चळवळी थंडावल्या आहेत. सामाजिक संस्थांना मरगळ आली आहे, तरुण माणूस तर अशा प्रकारच्या संस्थांमध्ये शोधूनही सापडत नाही. आपली जीवनशैली अशी झाली आहे, की मी सामाजिक काम करतो असे कुणी म्हटले तर कौतुक होण्याऐवजी त्याची कुचेष्टा आणि उपहास केला जाईल!

अशा विपरीत परिस्थितीत काही मराठी तरुणांनी एकत्र येऊन ‘ईशान्य वार्ता’ हे मासिक सुरू केले आहे.

हे दोन परिच्छेद आहेत ‘ईशान्य वार्ता’ मासिकाच्या ताज्या अंकातील संपादकीयामधील.

‘ईशान्य वार्ता’ हे मासिक ‘फ्रेण्डस् ऑफ नॉर्थ ईस्ट’मार्फत गेले वर्षभर चालवले जात आहे. त्याआधी ऑगस्ट ते डिसेंबर २००९ या काळात, ते प्रायोगिक तत्त्वावर प्रसिद्ध केले गेले. ही कल्पना पुरूषोत्तम रानडे यांची. ते स्वत: ईशान्य भारतात कधी गेलेले नाहीत. तथापि, तेथील असंतोष आणि अस्वस्थता त्यांना माहितीची होती. शिवाय, त्यांचे मित्र जयवंत कोंडविलकर हे गेली अनेक वर्षे ईशान्येकडील राज्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेला पूरक अशा त-हेचे काम करत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन रानडेदेखील या कामात ओढले गेले. त्यांचे स्वत:चे तिकडे जाणे झाले नाहीच. तथापि, मराठी तरुणांना तेथील वास्तव समजावे आणि प्रक्षुब्ध परिस्थितीवर  लोकांच्या संघटित प्रयत्नांमधून काही साधता येईल का? तसेच, ईशान्य भारताबरोबर दुवा जोडता येईल का? असा प्रयत्न करावा; त्यासाठी मासिकासारखे माध्यम उपयोगी ठरेल या विचाराने रानडे-कोंडविलकर यांनी हा उपक्रम चालवला आहे. असे प्रयत्न मुख्यत: वनवासी कल्याणाश्रम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामार्फत केले जातात, याची त्यांना जाणीव आहे, परंतु प्रश्न एवढा गंभीर आहे, की तेथे त्यांना सर्वांच्या अनेकानेक प्रयत्नांची गरज वाटते.

रानडे यांच्या ‘ईशान्य वार्ता’ या मासिकाच्या ताज्या अंकाच्या संपादकीयामधील येथे उद्धृत केलेले दोन परिच्छेद रानडे आणि मंडळींच्या विचारांची दिशा व्यक्त करतात.

- ईशान्य वार्ता

संपादक: पुरूषोत्तम रानडे
कृष्ण कुटीर, आयरे रोड, डोंबिवली (पू),
भ्रमणध्वनी : 9969038759 / 9220734105

प्रकाशक : जयवंत कोंडविलकर
भ्रमणध्वनी : 9619720212
ईमेल : friendsofne@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.