‘निर्माण’: ‘मी कोण’, ‘मी कशासाठी?’


अभय व राणी बंग यांचा ‘निर्माण’हा युवा पिढीसाठी नवा प्रकल्प. या ‘समुदाया’ने ‘धान्यापासून दारू’ विरूद्धची मोहीम यशस्वी राबवली. ‘निर्माण’ला जूनमध्ये चार वर्षे झाली, त्या निमित्ताने...

निर्माण’:

मी कोण’, ‘मी कशासाठी?’

अभय आणि राणी बंग या डॉक्टर दांपत्याचा ‘निर्माण’ हा नवा प्रकल्प आहे. त्याला जून 2010मध्ये चार वर्षे झाली. त्या निमित्ताने मुंबईच्या रूइया कॉलेजमध्ये या प्रकल्पावरील अभिजित देसाई यांनी बनवलेला पन्नास मिनिटांचा माहितीपट दाखवण्यात आला. त्याला माहितीपट, लघुपट असे काही म्हटले तरी तो कल्पकतेने बनवण्यात आला आहे. ती जयदीप देसाई या ‘निर्माण’मध्येच गुंतलेल्या तरुणाची कलाकृती आहे.

चित्रपट प्रदर्शनानिमित्ताने ‘निर्माण’मधील युवासमुदाय आणि हितचिंतक यांचा मेळावा हार्दिक वातावरणात घडून आला. ही किमया अमृत बंग आणि चारुता गोखले यांची. त्यांनी महिन्याभराच्या तयारीने हा घाट जमवून आणला. तेथे कुमार केतकर व अभय बंग यांची विचारपरिप्लुत भाषणे झाली आणि त्यामुळे दोन तांसाचा कार्यक्रम संपवून ‘प्रेक्षक’ भारल्या अवस्थेत बाहेर पडले तो ‘निर्माण’ समुदायाचा स्नेह मनी ठेवून.

तरुण पिढीला समाजाभिमुख व समाजकार्यप्रवृत्त करायचे हा ‘निर्माण’ प्रकल्पाचा हेतू. अभय व राणी बंग यांनी आपल्या कारकिर्दीत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी स्त्रिया व बालके यांचा आरोग्यविषयक अभ्यास करुन, त्याबाबत काही सिद्धांत मांडले, त्यांना जगन्मान्यता मिळाली. त्यांनी उपचारपद्धतीचा जो नमुना तयार केला त्याचा स्वीकार जागतिक आरोग्य संघटनेने केला असून ती पद्धत आफ्रिकेत उपयोगात आणली जाते. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना जागतिक मानसन्मान मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला आहे. तेव्हापासून अभय बंग आरोग्यस्वराज हा त्यांचा स्वायत्त आरोग्याचा सिद्धांत माडंत असतात.

‘निर्माण’ हे त्यांचे नवे लाडके अपत्य. त्यांचा धाकटा मुलगा अमृत ह्या प्रकल्पाचा समन्वयक आहे. तो देखील त्यात पूर्ण रमला आहे व ‘या कामामुळे आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला’ असे त्याने नमूद केले आहे.

‘निर्माण’ची मूळ कल्पना व्यक्तीने स्वत:ची स्वत:ला ओळख पटवणे ही आहे: त्याबाबतचा नेमका खुलासा अभय बंग यांनी चित्रपटात योग्य रीत्या केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की सिद्धार्थ जोपर्यंत राजमहालात राहात होता, तोपर्यंत त्याला (सर्व विद्या येत होत्या परंतु ) काहीच कळत नव्हते. तो राजमहालातून बाहेर पडून समाजात मिसळला, त्याने दु:खदारिद्रय पाहिले व त्याला मानवी जीवनार्थ उमगून चुकला आणि त्याचा ‘बुद्ध’ झाला. ही प्रक्रिया महत्त्वाची आहे.

बंग यांनी भाषणात सांगितले, की मी कोण आहे? मी कशासाठी आहे? हा मानवाला पडलेला सनातन प्रश्न आहे, त्याचे उत्तर शोधता शोधता प्रत्येक व्यक्तीने समाजाला भिडावे, समाजोपयोगी राहावे असा दुहेरी हेतू ‘निर्माण’मध्ये आहे.

माहितीपटामध्ये पाच ‘फेलो’ तरुणांच्या कहाण्या दाखवून त्या माध्यमातून ‘निर्माण’ची प्रक्रिया उलगडून सांगितली आहे. ‘निर्माण’प्रकल्पात येणारे हे डॉक्टर, इंजिनीयर असे उच्चशिक्षित तरुण आहेत. त्यांची शिबिरे, कार्यशाळा अशांमधून ‘फेलो’ म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यावर जबाबदारी अशी, की त्यांनी प्रत्येकी एक सामाजिक प्रश्न निवडायचा आणि ते आव्हान पार करता करता येणा-या अनुभवातून शहाणे व्हायचे. त्या दरम्यान, त्यांच्या नेतृत्वगुणाची कसोटी लागतेच व अशा त-हेने नेतृत्व घडण्याची शक्यता तयार होते.

या पाच ‘फेलों’पैकी कोणी रोजगार हमी योजनेतील अन्यायाचा पाठपुरावा केला, कोणी जव्हारच्या आदिवासी मुलांमधील डायरिया थांबवण्यासाठी त्यांच्या जीवनात स्वच्छता आणण्याचे प्रयत्न केले,  कोणी गुणात्मक शिक्षणविषयक सुधारणांचा शोध घेतला, अशाच काही काही गोष्टी..

धान्यापासून दारू बनवण्याच्या सरकारी योजनेला अभय बंग यांचा सक्त विरोध आहे. ‘निर्माण’ने ती मोहीम घेतली व महाराष्ट्रभर यशस्वीपणे राबवली. याशिवाय, ‘निर्माण’चा फिल्म क्लब व आर्ट सर्कल आहे. ‘निर्माण’चा अर्थ निर्मिती! माणसाच्या संवेदनेला सर्व बाजूंनी भिडायचे व त्याचे व्यक्तिमत्त्व फुलू द्यायचे ही ‘निर्माण’ची धारणा आहे असे म्हणता येईल.

केतकर यांनी माहितीपटाचे कौतुक केलेच; ते म्हणाले की हा देखणा माहितीपट ‘निर्माण’ची संर्वांगपरिपूर्ण माहिती देतो. त्याचबरोबर प्रेक्षकांना समाजकार्यात सामील होण्याचे स्फुरण देतो. त्यांनी अभिजित देसाईच्या तंत्रकौशल्याची वाखाणणी केली. परंतु नंतर भाषणात, त्यांनी ‘निर्माण’चा जो मुख्य प्रश्न ‘मी कोण’ व ‘मी कशासाठी’ याबाबत  बरेच विवेचन केले. ते म्हणाले, की धर्म व राष्ट्र या मानवी समुहाला संघटित करण्यासाठी ज्या दोन कल्पना निर्माण झाल्या. त्यांच्या रक्षणासाठी आतापर्यंत पृथ्वीवरील साधनसंपत्तीचा विनाश झाला आहे. त्यामुळे जगभर जे अडीचशे कोटी (अडीच अब्ज) लोक भुकेने गांजलेले आहेत, त्यांना पुरेसे अन्न मिळायचे असेल तर मानवी इतिहासात घडून आलेल्या या दोन संकल्पनांची मोडतोड गरजेची आहे. जागतिकीकरण ही त्या दिशेने प्रक्रिया आहे.

त्यांनी निसर्ग आणि माणूस या नात्याचाही उहापोह केला. ते म्हणाले, की माहितीपटात महाराष्ट्राचा चारशे वर्षांचा इतिहास प्रकट होतो. त्यात चारशे वर्षांपूर्वी असावे असे आदिवासींचे मागासलेले जीवन आहे, तर ‘निर्माण’ फेलो लॅपटॉप घेऊन त्यांचे प्रश्न सोडवू पाहात आहे. तंत्रज्ञान या त-हेने त्यासाठी वापरले जाणे महत्त्वाचे आहे. मानवी विकास तंत्रज्ञानामधूनच घडून आला आहे. ते अव्हेरून चालणार नाही. त्यांनी जीवन ऐहिकतेने जगावे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, की मॉल्समध्ये श्रीमंत लोक येत नाहीत. सर्वसामान्य व मध्यमवर्ग यांचाच मॉल्संना आश्रय लाभतो. त्यांच्या जीवनात मॉल्संनी फुलबाग निर्माण केली आहे आणि कोणतीही आनंद देणारी गोष्ट स्वागतार्ह समजली पाहिजे

अभय बंग यांच्या भाषणातून ‘ड्रीम कम ट्रू’ असा विश्वास प्रकट होत होता. ते म्हणाले, की ‘निर्माण’शी सध्या पाचशे तरुण जोडले गेलेले आहेत, त्यांपैकी पाच जणांच्या कहाण्या प्रातिनिधिक स्वरूपात माहितीपटात येतात, पण या माहितीपटामुळे ‘निर्माण’ची कथा सा-या महाराष्ट्रभर पोचेल. तेवढी ताकद या कलाकृतीत आहे.

‘निर्माण’ :

संपर्क : nirmanites@gmail.com, http://nirman.mkcl.org

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.