आपल्या समोरील आदर्श


आपल्या समोरील आदर्श

- विश्वास काकडे

आपल्या आयुष्यात अडचणीच्या वेळी, निर्णयाच्या वेळी पदोपदी, आपल्याला असा प्रश्न पडतो, की आपण करत आहोत ते बरोबर करतो काय? आपला निर्णय बरोबर आहे का? आपण वागलो ते बरोबर वागलो का? काही वेळा, आपली खात्री असते, की आपण केले ते योग्यच केले, पण त्याचे परिणाम अपेक्षित असतीलच असे नाही.

ज्याप्रमाणे यंत्र दुरुस्त करण्यासाठी पुस्तिका उपलब्ध असते, विषय समजून घेण्यासाठी पुस्तके अथवा शिकवण्या उपलब्ध असतात, त्याप्रमाणे आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी अथवा योग्य निर्णय घेण्यासाठी सोपे मार्ग उपलब्ध नसतात. अशा वेळी नैसर्गिक प्रवृत्ती अशी असते, की आपण ज्यांना आदर्श समजतो अशा व्यक्तींचे अनुकरण करावे!

बिल गेट्सवॉरेन बफेप्रत्येकाच्या आयुष्यात असे एक किंवा एकापेक्षा अनेक आदर्श असू शकतात. ते मानवी मनाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. लहानपणी, आपले जे आदर्श असतात त्यामध्ये आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य नसते. आई-बाप, शिक्षक अथवा इतर व्यक्ती, की ज्यांचा प्रभाव आपल्यावर मोठा असतो अशा व्यक्तींना आपण आदर्श मानतो. पण जेव्हा आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य प्राप्त होते, आपली विचारशक्ती प्रगल्भ होते, त्यावेळेस आदर्श तपासून पाहणे हे गरजेचे ठरते.

ज्या व्यक्तींना आयुष्याबद्दल सारासार विचार करण्याची सवय नाही अथवा अनुभवांचा अर्थ लावण्याची सवय नाही, त्या व्यक्तींना खूप मोठ्या अडचणी येतात, त्यांचा विकास थांबतो. त्या व्यक्ती धर्म, अध्यात्म, गुरू अशा कोणाचा तरी आधार घेतात व आयुष्य जगायचा प्रयत्न करतात.

समाज हा गतिशील असतो. त्यात सतत बदल होत असतात. पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत सामाजिक बदल हे राजवट बदलणे, क्रांती होणे (चीन, क्युबा, फ्रान्स, रशिया), स्वातंत्र्य मिळणे अशा दृश्य स्वरूपातील घटनांमुळे घडत असत. आता, बदल हे एकाच राष्ट्रातील अंतर्गत बदल, अर्थव्यवस्थेतील बदल, जागतिकीकरण, प्रसिध्दी माध्यमांची भूमिका अशा व अन्य अनेक घटकांमुळे घडत आहेत. मैत्री, त्याग, सहृदयता, ज्ञानी व्यक्तींबद्दल आदर अशा महत्त्वाच्या अनेक मूल्यांना तिलांजली मिळत आहे. असे का घडत आहे?

जगाच्या इतिहासातील प्रकर्षाने जाणवणारे एक वास्तव असे आहे, की प्रत्येक काळात प्रस्थापित वर्गाची सांस्कृतिक मूल्ये हीच समाजात रुढार्थाने स्वीकारली गेलेली आहेत. याची उदाहरणे पाहणे फारसे अवघड नाही. गुलामगिरी, जातीयवाद, सरंजामशाही, भांडवलशाही अशा सर्व कालखंडांत हेच घडत आलेले आहे. जेव्हा प्रस्थापित सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक मूल्ये वस्तुस्थितीशी विसंगत ठरतात तेव्हा त्यांच्यामध्ये बदल घडतो. रशियन, फ्रेंच, चिनी क्रांती ही ठळक उदाहरणे आहेत.
म. गांधींचा विशेष म्हणजे त्यांनी आधी मूल्ये बदलली, ती चळवळीतून रुजवली व त्याद्वारे बदल घडवून आणला.

चीनमध्ये माओने क्रांती होऊन, त्याच्याकडे सत्ता आल्यावर मूल्ये बदलण्यासाठी सांस्कृतिक क्रांती केली. रशियामध्ये नवीन समाजरचना आली पण मूल्ये बदलली नाहीत. त्यामुळे समाजवाद अयशस्वी ठरला.

सारांश असा, की मूल्ये काळाप्रमाणे, परिस्थितीनुरूप बदलतात व त्याप्रमाणे नवीन आदर्श प्रस्थापित होतात. जागतिकीकरणामुळे व साम्राज्यवादामुळे अमेरिकेची सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय मूल्ये जगात प्रभावी आहेत. चंगळवाद, स्वयंकेंद्रितपणा, कोणत्याही वैध-अवैध मार्गाने पैसा मिळवणे, घटस्फोट हे परिणाम म्हणजे त्याचेच प्रतीक आहे.

पूर्वी, काही व्यक्तींना आदर्श मानले जायचे. सध्या, प्रस्थापित संस्कृतीची जीवनपध्दत आदर्श मानली जाते. हाही याच समाजव्यवस्थेचा परिपाक आहे.

या बदलात आणखी एक वेगळा पैलू आहे. जुन्या आदर्श संदर्भांचे कालानुरूप अर्थ लावणे. श्रीकृष्णाने गीता सांगून अर्जुनाला कुरूक्षेत्रावर युध्दास प्रवृत्त केले तर
म. गांधींना त्याच गीतेत अहिंसा सापडली, टिळकांना कर्मयोग सापडला आणि आता, व्यवस्थापनतज्ञांना व्यवस्थापनाचा गुरूमंत्र सापडतो!

थोडक्यात म्हणजे जुन्या संदर्भांचे बाह्य स्वरूप न बदलता त्यांचा आशय बदलणे (काळाच्या गरजेप्रमाणे) ही प्रत्येक काळात घडलेली घटना आहे. सध्याच्या जनगणनेची पध्दत योग्य का अयोग्य हा मुद्दा असाच आहे. जाती नष्ट व्हाव्यात या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, पण काही राजकीय नेते त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी जातिनिहाय जनगणना हा मूलभूत हक्क मानतात.

शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर इत्यादी आदर्श आजचे राजकारणी स्वत:चा सुप्त कार्यक्रम राबवण्यासाठी वापरतात. नाहीतर या थोर पुरूषांची तत्त्वे, शिकवणूक अंमलात आणली गेली असती!

आधुनिक काळातील मानसशास्त्राप्रमाणे आदर्श व्यक्ती आदर्श ठरतात, कारण त्यांची मूल्ये, त्यांचे विचार व त्यांच्या जीवनपध्दती आदर्श असतात. त्यांचे जीवन वैश्विक, चिरंतन मूल्ये अंगिकारणारे असते. त्यामुळे आता आदर्श व्यक्तींची जागा विचारपूर्वक निवडलेल्या मानवतावाद, सद्भाव, निसर्गाशी मैत्रीपूर्ण संबंध, विवेकबुध्दी अशा मूल्यांवर आधारित ठेवणे संयुक्तिक ठरेल. आदर्श व्यक्तींचे आदर्श हे कालसापेक्ष असतात. वैश्विक मूल्ये चिरंतन असतात.

भारतातील मध्यम व उच्च वर्गीयांना चंगळवादाचे प्रचंड आकर्षण आहे. गंमत म्हणजे बिल गेट्स या धनाढ्य माणसाने व त्याच्या पाठोपाठ त्याचा स्पर्धक गुंतवणूकदार वॉरेन बफे याने, त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी देणगी म्हणून दिला आहे. पैसा मिळवणे हा त्यांचा व्यवसायातला हेतू नव्हता, तर उत्कृष्ट काम करणे हा त्यांचा आदर्श होता हे त्यावरून सिध्द होते. हा आदर्श मात्र आपली आजची पिढी समोर ठेवत नाही!

साध्य-साधन हा चिरंतन चर्चेतला मुद्दा आहे. उद्दिष्ट कोणत्याही मार्गाने साध्य करणे म्हणजे दु:खाला, एकटेपणाला, नकारात्मक जीवनपध्दतीला कवटाळणे होय. संपत्ती मिळवण्यासाठी आरोग्य, मानवतावाद, निसर्ग यांचा बळी दिला जातो व संपत्ती हाती आल्यावर त्याच गोष्टी मिळवण्यासाठी ती खर्च केली जाते. आयुष्याला योग्य दिशा असणे व जगण्याच्या प्रक्रियेला तितकेच महत्त्व देणे हाच आयुष्याचा खरा आदर्श असला पाहिजे.

आयुष्याच्या प्रवासाला व दिशेला महत्त्व आहे, शेवटच्या मुक्कामाला नव्हे.

- विश्वास काकडे

Vishwas1000@gmail.com

भ्रमणध्वनी : 9822509682 /  सोलापूर : 2627324, 2729144

-

 

 

लेखी अभिप्राय

nice 1

Girija Sawant01/12/2013

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.