करूणार्द्र कातळ : शंकरराव पापळकर


करूणार्द्र कातळ : शंकरराव पापळकर

- मनोहर नरांजे

परतवाडा शहर पार करून धारणी मार्गाने उत्तरेकडे निघाल्यास दुरूनच सातपुड्याच्या गगनचुंबी रांगा दृष्टीस पडतात. गौरखेडा, कुंभी, मल्हारा अशी गावे पार करत आपण पर्वतरांगांच्या पायथ्याशी वझ्झर फाट्याशी येऊन उभे ठाकतो. समोर, उघड्या-बोडक्या डोंगररांगा आपल्या स्वागताला उभ्या असतात. मेळघाटच्या मुलुखास येथून सुरूवात होते. हे जणू मेळघाटचे दक्षिण प्रवेशद्वार. मेळघाटचा मुलूख तेथील घनदाट अरण्यासाठी प्रसिद्ध असला तरी त्याची सुरुवात मात्र ही अशी विराण होते. सुरूवातीची पाचेक किलोमीटरची पर्वतराजी अशीच उजाड, वैराण झाली आहे. मेळघाटच्या मुखावरील या वैराण मुलुखात आयुष्याचे वाळवंट झालेल्या अंध-अपंग-मूकबधिर-मतिमंद-विमनस्क वेड्यांच्या जीवनात नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न गेल्या वीस वर्षांपासून एक वेडापीर करतोय, पंचक्रोशीतील लोक त्या वेड्यापीरास शंकरराव पापळकर या नावाने ओळखतात.

विदर्भातील अमरावती जिल्ह्याचा हा मुलूख म्हणजे गाडगेबाबांची कर्मभूमी. येथील जनमानसावर राष्ट्रसंत तुकडोजी व संत गाडगेबाबा यांचा विलक्षण प्रभाव आहे. ‘गोपाला गोपाला...’हा गाडगेबाबांनी दिलेला महामंत्र. त्यांच्या क्रांतिकारी कीर्तनातून या मंत्राचा जप करत लाखो लोकांनी स्वत:च्या आयुष्याला वळण दिले. ‘अध अपंगांवर दया करा,त्यांना सहाय्य करा’ असा संदेश गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून कळकळीने देत. याच महामंत्राचा जागर आपल्या जीवनात जागवत ‘गोपाला’ संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या अनास्थेमुळे पशुतूल्य, जीवन जगण्यास बाध्य झालेल्या अंध, अपंग, वेड्यांच्या जीवनात शंकरराव एक आधारवड म्हणून उभे ठाकले आहेत. त्यांना ‘राम शेवाळकर स्मृती’ हा पहिला आधारवड पुरस्कार देऊन त्यांचा अलिकडेच गौरव करण्यात आला. त्यामुळे शंकरराव पापळकरांसारख्या कृतार्थ जीवनाचा यथार्थ गौरव झाला.

घाटाच्या मुखाशी डावीकडून पर्वतरांगांच्या पायथ्याने एक वाट वझ्झर गावाकडे जाते. याच वझ्झर वाटेवर मुख्य रस्त्यापासून उजव्या बाजूस साधारण अर्ध्या किलोमीटर अंतरावर शंकररावांनी  हे नंदनवन फुलवले आहे. शासनाने दिलेली डोंगराच्या उतरणीवरील पन्नास एकर खडकाळ भूमी शंकररावांनी आपल्या लेकरांच्या मदतीने सस्यश्यामल केली आहे. सभोवतीच्या वैराण मुलुखात हा हिरवा टापू आपले लक्ष वेधून घेतो. कमानदार प्रवेशद्वारातून आश्रमात प्रवेश करताच, वाटेच्या दुतर्फा जीवनाचे सार सांगणा-या काव्यपंक्ती आपल्या दृष्टीस पडतात. यात हिंदी शेरोशायरीचे प्रमाण विपुल आहे. शंकररावांचा हिंदी साहित्याचा व्यासंग आणि त्यांच्यावरील आचार्य रजनिशांचा प्रभाव हा या आश्रमभर विखुरलेल्या काव्यफलकांतून सतत जाणवत राहतो.

वाटेवरच, डावीकडे शंकररावांची चंद्रमौळी झोपडी आहे. आगंतुकची पहिली झाडाझडती घडते ती इथे. त्या पलीकडे उतारावर आश्रमाची मुख्य इमारत आहे. उंच उंच भिंती, भव्य लोखंडी दरवाजा असे चिरेबंदी बाह्य स्वरूप या वास्तूचे आहे. अंतरंगात बहुधा प्रवेश नसतोच. पुरूष व स्त्रिया अशी स्वतंत्र विभागणी असून दोन्ही मिळून अंदाजे सव्वाशे लेकरांचा संसार इथे मांडला गेला आहे.

शंकररावांनी या आश्रमाची चालकमंडळीसुद्धा आपल्या या लेकरांमधून निवडली आहे. मल्लिका, गांधारी या त्यांच्या मानसकन्या. त्यांपैकी गांधारी अंध आहे. आश्रमातील शंकररावांनंतर जबाबदार व्यक्ती म्हणजे मल्लिका. आश्रमाच्या व्यवस्थापनावर तिची जागरूक नजर असते. इतर जाणत्या सदस्यांचीही मदत असतेच.

शासकीय अनाथालयाच्या नियमाप्रमाणे वयाच्या फक्त अठरा वर्षांपर्यंत अशा अनाथांना आश्रमात आश्रय मिळू शकतो. त्यानंतरची जबाबदारी शासन स्वीकारत नाही. आश्रमास अनुदानसुद्धा अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांमुलींचे मिळते. या अंध, अपंग, मतिमंद, मूकबधिर, विमनस्क जनांनी पुढे कुठे जावे? हे कुणीच सांगत नाही. शासन ही जबाबदारी नाकारते, पण शंकररावांसारखा कनवाळू पिता ती नाकारू शकत नाही. मुलींच्या बाबतीत तर हा प्रश्न आणखी बिकट होऊन बसतो. वयात आलेल्या या निराश्रित मुलींनी कुठे जावे? कुठे आश्रय घ्यावा? रस्त्यावर? कुंटणखान्यात? की भावी अनाथांची पैदास करत उघड्यावर जीवन जगावे? शंकररावांना या सामाजिक प्रश्नाची भयावहता जाणवत होती. त्यामुळे त्यांनी अठरा वर्षांनंतरही गरजूंना आश्रमातच आश्रय देण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेणे सोपे होते, पण त्याची अंमलबजावणी करणे तितकेच कठीण, आपल्या उदार दात्यांच्या बळावर ते हा प्रश्न सोडवत आले आहेत. अमरावती येथील ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा’चे प्रभाकरराव वैद्य यांचे या कामी त्यांना वेळोवेळी सहकार्य लाभत असते. वैद्य यांनी आपल्या (कै. अंबादासपंत वैद्य) वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या अनाथाश्रमाच्या उभारणी व संचालनासाठी भरीव योगदान दिलेले आहे.

आश्रमाच्या अनाथांमधूनच कार्यकर्ते तयार करून, त्यांच्याच साहाय्याने या अनाथाश्रमाचा डोलारा शंकरराव सांभाळत आहेत. त्यांपैकी अनेक कार्यकर्त्यांना संस्थेच्या सेवेत त्यांनी सामावूनही घेतले आहे. आश्रमातील मुलामुलींमधून काही जणांचे विवाह जुळवून त्यांनी संस्थेच्या आवारातच त्यांची घऱकुलेसुद्धा फुलवली आहेत. स्वत: चंद्रमौळी झोपडीत राहून आश्रमातील या अनाथांना मात्र सुसज्ज घरकुले उभारून देऊन त्यांच्या जीविताची काळजी वाहणारे शंकरराव खरोखरच निस्पृहतेचा आदर्शच म्हणावे! संस्थेच्या आवारात अशी अनेक घरकुले नांदत आहेत.

कमालीची प्रसिद्धीपराड. मुखता अंगी बाणवून एकांत साधना करणे हा शंकररावांचा मनोधर्म. त्यामुळे त्यांच्या स्वभावात रोखठोकपणा आहे. आश्रमात येणा-या आगंतुकांनाही कठोर परीक्षणानंतरच ते आश्रमपरिसरात प्रवेश देतात. त्यांच्या मनाचे प्रवेशद्वार उघडून त्यांच्याविषयी त्यांच्याकडून काही जाणून घेणे तर त्याहून अवघड. आश्रमात येणा-यांनी केवळ स्थलदर्शनासाठी येऊन आपल्या वेळेचा अपव्यय करणे त्यांना पसंत नसते. ‘प्राणिसंग्रहालयातील जनावरे न्याहाळावीत तसे तुम्ही या अंध-अपंगांकडे पाहणार का?’ असा त्यांचा सवाल असतो. आश्रमात यायचे असेल तर उत्क्रांतीच्या टप्प्यात इतरांपेक्षा मागे राहिलेल्या या मानवांसाठी काहीतरी घेऊन या अशी त्यांची रोकडी अपेक्षा असते. या अर्थाचे फलकही आश्रमपरिसरात वाचता येतात.
शे-सव्वाशे लेकरांचा संसार सांभाळणा-या या बापास असा रोखठोकपणा अंगी बाणवणे आवश्यकच आहे.

आश्रमाच्या खडकाळ भूमीवर केलेले वृक्षारोपण हे शंकररावांचे आणखी एक मोलाचे कार्य. आपल्या लेकरांच्या साहाय्याने त्यांनी या उजाड, वैराण भूमीवर वनश्री आणलेली आहे. कडुनिंबाची पंधरा हजार झाडे आश्रमपरिसरात डुलताना दिसतात. इतर वृक्षांची संख्याही शेकड्यांत आहे. त्यांनी डोंगरउतारावर पाऊलवाटेच्या दोन्ही बाजूंस रोपे लावून त्या रोपांच्या संवर्धनाचीही व्यवस्था केलेली आहे.

सावळा वर्ण, साडेपाच फुटांहून जास्त उंची, कणखर शरीर, डोक्यावरील पांढरेफेख भरदार केस, पायजमा व त्यावर अंगरखा, पायात टायरची चप्पल असे बाह्यदर्शन असलेली शंकररावांची देहमुद्रा लगेच काळजावर उमटते. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांचा कणखरपणा शब्दागणिक जाणवत राहतो. परंतु कातळाच्या या अंतरी करुणेचा झराही वाहत आहे. या करुणार्द्र कातळाच्या जीवनदायी ओलाव्याने ‘गोपाला’ संस्थेच्या रूपाने, समाजाने नाकारलेल्या अनेक अनाथांच्या जीवनात थोडीशी हिरवळ डुलताना दिसत आहे.

- डॉ. मनोहर नरांजे

बहादुरा फाटा, सरस्वतीनगर, पो. विहीरगाव, ता. जि. नागपूर

भ्रमणध्वनी : 09767219296

संबंधित लेख :

मतिमंदाचे ‘ घरकुल’ 

समस्या मतिमंदांची नव्हे; पालकांची!

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.