आठवा स्वर


आठवा स्वर

- सरोज जोशी

संगीतक्षेत्रात पदार्पण करण्याच्या हेतूने अनेक आल्बम प्रकाशित होत असतात. पण ७ जून २०१० ला रवींद्र नाट्यमंदिरात वाजतगाजत प्रकाशित झालेला ‘आठवा स्वर’ हा आल्बम अनेकांपैकी एक असा, अलबत्या गलबत्या नाही तर रसिकांच्या कानांचा विषय झालेला ‘तो एकला’ आहे. ‘सारेगमप’च्या ‘लिटिल चॅम्पस्’नी सर्वांची ह्रदये जिंकलेली आहेत. ह्या बालकलाकारांच्या सांगितिक कौशल्याला, त्यांच्या विकासाला वाव देण्याच्या उद्देशाने ‘कलांगण’ संस्थेच्या चालक वर्षा भावे आणि गेली पंच्याऐंशी वर्षे संगीतवाद्यांच्या व्यवसायात कार्यरत असणा-या हरिभाऊ विश्वनाथ कंपनीचे मालक उदय दिवाने ह्या दोघांनी एकत्र येऊन ‘आठवा स्वरा’ची निर्मिती केली आहे. कंठसंगीताला वाद्यसंगीताने सुरेल साथ दिली आहे. स्पर्धेच्या मर्यादित वातावरणाच्या पलीकडच्या अफाट जगात – नवी, कोरी, ताजी गाणी गाण्याची सुवर्णसंधी संगीत दिग्दर्शक ‘ वर्षा भावे ’ ह्यांनी ‘लिटिल चॅम्पस्’ना प्राप्त करून दिली आहे.

मुळात ‘आठवा स्वर’ हे नाव कुतूहल चाळवते. संगीतात सप्तसूर असतात ! मग हा आठवा सूर कुठून अवतीर्ण झाला? प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, अवंती पटेल, शमिका भिडे, शाल्मली सुखटणकर, मुग्धा वैशंपायन, ह्या आठ ‘लिटिल चॅम्पस्’नी गाणी गायली. म्हणून ह्या आल्बमला आठवा स्वर हे नाव देण्यात आले. त्याचे स्पष्टीकरण असे करता येईल, की “ज्यांना आपल्या अंतरंगातला अंतस्वर सापडला आहे अशा आठ स्वर्गीय बालगंधर्वांनी गायलेली आल्बमधली गाणी आहेत.’’ खरं तर ‘कलांगण’च्या वर्षा भावे ह्यांच्या वत्सल मनाला ह्या बालकलाकारांची उत्स्फूर्त दैवी गुणवत्ता भिडली असावी, म्हणून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याची कल्पना सुचली असावी.

निसर्गदत्त आवाज ह्या वास्तवातून प्रयत्नपूर्वक सिद्ध केलेला स्वर आणि लय-तालात पकडलेला काळ ह्या दोघांच्या मिलाफातून संगीत सिद्ध होते. भावगीतांच्या शब्दप्रधान गायकीमध्ये तर शब्दांमधून झिरपणा-या रसमयी भावावस्थेला खूपच महत्त्व असते.

झी चॅनेलवर ‘लिटिल चॅम्पस्’ची स्पर्धा चालू असताना सुरुवातीच्या काळात समुपदेशकाच्या भूमिकेत वर्षा भावे ह्या मुलांच्या सोबतीला होत्या. त्यामुळे प्रथमेश लघाटेपासून अवंती पटेल पर्यंत ह्या सर्वांची बलस्थाने आणि मर्मस्थाने वर्षाताईंना माहीत होती. वर्षा भावे यांनी अनेक बालगीतांना चाली लावलेल्या आहेत. अडगुलं मडगुलं(फाऊंटन बालगीते ) एक मुंगी, नेसली लुंगी (कृणाल-बालगीते) जंगल गाणी (मनसा), भावतरंग (मनसा), हल्लागुल्ला रसगुल्ला (सागरीका) हे त्यांचे आधीचे आल्बम त्यांनी विशेष कार्यक्रम, तर पुष्कळ दिले आहेत. मुख्य म्हणजे लहान मुलांना संगीत शिकवण्यात त्या रमतात. त्यांनी प्रत्येक मुलासाठी गाण्याची निवड करून ठेवली आहे. गीते वेगवेगळ्या कवींकडून जाणीवपूर्वक लिहवून घेतली आहेत. बा.भ.बोरकरांची ‘सरीवर सरी’ ही कविता आणि मंगेश पाडगावकरांची ‘आता उजाडेल’ ही कविता वगळली तर बाकीची गाणी कोरी करकरीत, घडी न मोडलेली आहेत.

पहिली बंदिश स्वत: वर्षा भावे यांची अहिर भैरव रागातली आहे. ‘आज सब मंगल गाओ’ अशी शब्दरचना आहे. दुसरी, रचना ऋषीकेश परांजपे ह्यांची असून ती ‘गण’ ह्या स्वरूपाची आहे. अनुराधा नेरुरकर, वैभव जोशी, प्रसाद कुलकर्णी, शैलजा चरेगावकर, स्पृहा जोशी ह्या कवींच्या रचना आल्बममध्ये आहेत.

संगीत संयोजन कमलेश भडकमकर ह्यांचे आहे. गायकांच्या नैसर्गिक शैलीचा अचुक वापर केल्यामुळे हा आल्बम वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे. आठ जणांनी सांघिकपणे गायलेली बंदिश, नंतर गण, गवळण, भक्तिगीते, भावगीते, लावणी, ठुमरी व पाश्चिमात्य सुरावटीच्या गीतांचा यात समावेश असून शेवटी, मराठी भाषेवर लिहिलेल्या भारुडाचा अंतर्भाव या आल्बममध्ये करण्यात आला आहे.

‘आठवा स्वर’ ह्या आल्बमच्या प्रकाशनाचा कार्यक्रम म्हणजे रसिकांना लाभलेली सांगितिक मेजवानी होती. नवी नवखी गीते गाताना मुले खूश होती. रुपाली देसाई आणि वैशाली भडकमकर ह्यांनी केलेले नृत्यदिग्दर्शन व ‘कलांगण’च्या कलावंतांनी केलेले सादरीकरण, योगेश कुंभार आणि समीर खांडेकर ह्यांनी विनोदी संवादाची केलेली पखरण ह्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे गायन, नृत्य आणि नाट्य ह्यांचा त्रिवेणी संगम ठरला. स्पृहा जोशी हिने सूत्रसंचालन केले. युनिव्हर्सल कंपनीने हा आल्बम काढला आहे.

कार्यक्रमाला शंकरराव अभ्यंकर, अशोक पत्की, आशा खाडिलकर, सुचिता भिडे-चाफेकर, उल्हास बापट, अच्युत गोडबोले, वैशाली सामंत, मंजरी असनारे-केळकर व संपदा जोगळेकर-कुलकर्णी ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

हरीभाऊ विश्वनाथ कंपनीच्या उदय दिवाणे ह्यांनी ‘आठवा स्वर’ हा कार्यक्रम प्रायोजित केला. उदय दिवाणे हे हरिभाऊ विश्वनाथ कंपनी-‘दादर’चे मालक आहेत. पण त्यांची खरी ओळख संगीत साधनेचा आणि संगीत पंढरीचा वारकरी अशी आहे. गेली तेहतीस वर्षें ते ह्या संस्थेत काम करत आहेत. त्यांच्या काकांनी म्हणजे हरीभाऊंनी १९२५ मध्ये पत्र्याच्या लहानशा शेडमध्ये वाद्यदुरूस्तीचा व्यवसाय सुरू केला. पेटी दुरूस्त करणे ही त्यांची हातोटी होती. हरिभाऊंचे दुकान म्हणजे त्या काळातील संगीतक्षेत्रातील दिग्गजांचा अड्डाच होता. आजही वैशाली भैसने-माडेपासून कार्तिकी गायकवाडपर्यंत कितीतरी कलाकार, गायक, संगीतकार त्यांच्या दुकानात येत जात असतात. स्वत: उदय पं.प्रभाकर पंडित ह्यांच्याकडे व्हायोलिन शिकले, तर वडिलांकडे हार्मोनियम शिकले.

 

‘कलांगण’चा भावे प्रयोग

- सरोज जोशी

वर्षा भावेया संगीताची आराधना अनेक वर्षांपासून करत आहेत, परंतु ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप....लिटिल चॅम्पस्’ कार्यक्रमासाठी २००८-२००९ मध्ये संगीत समुपदेशक म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्या प्रकाशझोतात आल्या. ‘लिट्ल चॅम्पस्’नी अनेकांची आयुष्ये या प्रकारे उजळून टाकली. वर्षा भावे यांना तर जीवनध्येयपूर्तीची सार्थकता लाभली.

वर्षा भावे या स्वतः संगीत, नाट्यभिनय यांमधील कर्तबगार व्यक्ती. त्यांनी या दोन्ही कलांमधील कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनापासून अनेक संस्थांचे पुरस्कार मिळवले आहेत. तथापि त्यांनी लहान मुलांचे संगीतशिक्षण व त्यांचा सांस्कृतिक विकास हा मुख्य ध्यास मानला. मुलांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी अभिनव अभ्यासक्रम तयार केले. त्यात वेणू, संतुर, सनई आणि सारंगी यांचा उपयोग केला. त्यांच्या एकूण कामासाठी ‘संवर्धिनी’ हा अभ्यासक्रम आणि ‘कलागंण’ही संस्था त्यांनी निर्माण केली. ‘लिटिल चॅम्पस्’च्या अभूतपूर्व यशानंतर वर्षा भावे यांचे आधीचे सर्व कार्य नजरेत भरले. त्यांतील दोन गोष्टींचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. एक म्हणजे ‘ईटीव्ही’वरील ‘गुणगुण गाणी’या संकल्पनेसाठी मार्गदर्शन आणि दुसरे म्हणजे लंडन येथील महाराष्ट्र मंडळाच्या ‘प्रभात दर्शन’ या कार्यक्रमाचे सादरीकरण. ‘प्रभात फिल्मस’च्या इतिहासावर व गीतांवर आधारित हा कार्यक्रम त्यांनी लंडनमधील मुलांकडून बसवून घेतला होता. मात्र त्यांचे हे सारे ‘भावे प्रयोग’ ‘लिटिल चॅम्पस्’च्या यशानंतर प्रसिद्धीच्या अग्रभागी आहे. तेच सूत्र पकडून ठेवून त्यांनी ‘लिटिल चॅम्पस्’चा ‘आठवा स्वर’ हा नवीन आल्बम सादर केला आहे.

मुलांच्यासाठी एक मोकळे अंगण उपलब्ध करून द्यावे असे ठरवून, मुलात मूल होऊन रमणारे एक सह्दय कलासक्त, हसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे वर्षा भावे!

कमलेश भडकमकरवर्षा भावेवर्षा भावे म्हणजे पूर्वाश्रमीची वर्षा खा़डिलकर. प्रख्यात गायिका इंदिराबाई खाडिलकर यांची नात. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खा़डिलकर ह्यांची पणती. त्यामुळे नाट्य व संगीत यांचा पिढीजात वारसा लाभलेला. त्याचे शिक्षण सांगलीमध्ये मनोहर पोतदार, प्रभाकर शेंडे (इचलकरंजीकर) आणि चिंतुबुवा म्हैसकर ह्या गुरुजींकडे कधी गुरुकुल पध्दतीने तर कधी शिकवणी स्वरूपात झाले. संगीताचे उच्चशिक्षण इचलकरंजीचे काणेबुवा आणि विवाहानंतर माणिकराव ठाकुरदास व नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे. त्यांनी १९८३ साली एस.एन.डी.टी.विद्यापीठाची पदवी मिळवली. नीळकंठबुवांनी शास्त्रीय संगीत आणि भावसंगीत, दोन्ही बारकाव्यांसह शिकवले. गाण्यांचे कार्यक्रम मिळत होते. उत्तम गायिका होण्याच्या दृष्टीने प्रवास चालू होता. पण खूप निर्मितीक्षम असे काही घडत नव्हते. त्यांनी त्यांच्या वयाच्या एका बाईला त्यांच्या घरी जाऊन गाणे शिकवायला घेतले. पण ती शिकवणी टिकली नाही. त्याच दरम्यान, त्यांनी त्यांची छोटी भाची राधिका आणि तिच्या पाच-सहा मैत्रिणींना शिकवायला सुरुवात केली. त्या बॉम्बे स्कॉटिशच्या मुलांनाही शास्त्रीय संगीत शिकवत होत्या! याच ओघात त्यांनी स्वतः छोटीशी बंदिश लिहिली, चाल लावली आणि मुलींच्या मुखातून चीज ऐकली. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. त्यांना जाणवले, की त्या ज्या शोधात होत्या ती गोष्ट त्यांना सापडली आहे! मग त्या छोटी-छोटी बालगीते शोधून ती स्वरबध्द करू लागल्या. मुलांच्या तोंडून ती गाणी ऐकताना त्यांना सुख वाटू लागले. या क्लासचे नाव त्यांनी  ‘संवर्धिनी’ असे ठेवले. संगीताच्या माध्यमातून मुलांचे वर्धन करणारा गायनवर्ग! त्यांनी उद्यान गणेश मंदिरात ‘गाऊ देवाची गाणी’ हा स्वत:च्या रचनांचा कार्यक्रम सादर केला व तो गाजला. वर्षा भावे यांनाही जीवितध्येय गवसले.

वर्षाताईंनी सुरूवात केली गुणी मुलांना हुडकून काढण्याची. गुणनिधी संगीत स्पर्धेतून हुशार मुलांचा शोध त्यांना लागला. वर्षाताईंकडे शिष्यपरिवार इतका मोठा की वेणु-१ वेणु-२ संतुर-१ संतुर-२ स्वराली १-२-३ अशा सात बॅचेस् कराव्या लागतात. छंदोव्रती ग्रूपच्या मोठ्या ताया म्हणजे रसिका जोगळेकर, केतकी भावे, अनन्या, भौमिक, वैदही तारे, दिप्ती लोखंडे, गीता, पूर्वी, भैरवी, अभिजित, हनुमंता, ह्या सर्वांच्या मदतीने वर्षाताई विद्यादानाचे काम करतात. कमलेश भडकमकर हे संस्थेसाठी भक्कम खांबच आहेत. शिबिर नावाचा उपक्रमही राबवला जातो. स्वरांगी मराठे, गौरी वैद्य, आनंदी जोशी, अनघा ढोमसे, सायली महाडिक, वैभव लोंढे अशा अनेक कलावंतांनी संगीतक्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. अशा प्रयत्नांतून एखादा तरी रविशंकर, भीमसेन, केसरबाई किंवा तिरखवॉ निर्माण व्हावा एवढीच त्यांची इच्छा आहे आणि आपल्या त्यांना आहेत सदिच्छा...!

‘कलांगण’चा भावे प्रयोग हा असा आहे. मला तो मनोभावे भावला.....!

- सरोज जोशी

भ्रमणध्वनी: 9833054157
दूरध्वनी : 022-25222317

एका देशातील लहान मुलांचा बंदुका, चाकू, सुरे चालवण्याचा खेळ खेळतानाचा फोटो पाहिला होता. उलट, आपली मुले सुरांशी खेळत असतील तर त्यामुळे मोठेपणी ती खूप मोठी संगीतज्ञ किंवा गायक होतील किंवा होणार नाहीत, पण चांगली माणसे नक्की होतील!

‘सारेगमप...’

सुरेल स्वप्न

- ज्योती शेट्ये

जाहीर कार्यक्रमात लिटिल चॅम्पस्संगीत म्हणजे सात सुरांचे महाविश्व! हे विश्व निर्माण होताना बाराखडीतून फक्त सात अक्षरे निवडली गेली. सा रे ग म प ध नि ह्या सप्तसुरांतून संगीत उभे राहिले. ह्या उगमातून मग चित्रपटसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत, गजल वगैरे अनेक समृद्ध दालने निर्माण होत गेली. अनादी काळापासून माणूस संगीताबरोबर जगत आहे. सर्व गोष्टी परिवर्तनशील असतात, संगीतही काळानुरूप बदलत राहिले. पण सात सुरांचे साम्राज्य अबाधित आहे. मग ‘सारेगमप’च्या ‘लिटिल चॅम्पस्’नी आठवा सूर कोठून आणला? त्यांची ‘आठवा सूर’ नावाची सी.डी. बाजारात आली आहे.

‘सारेगमप’ हा झी मराठी ह्या टीव्ही चॅनेलवर चालणारा रिअँलिटी शो आहे. या कार्यक्रमाची उद्याचा आवाज, कालचा आवाज, ता-यांचे युध्द, आजचा आवाज, लिटिल चॅम्पस् अशी अनेक पर्वे होऊन गेली. पैकी ‘लिटिल चॅम्पस्’ने सर्वांत जास्त लोकप्रियता मिळवली. या छोट्या गायकांनी आबालवृद्धांना वेड लावले. फायनलचे पाच स्पर्धक पाच रत्नेच ठरली. त्यांचे झळाळणे अजून चालू आहे. ते या वयात कार्यक्रमास प्रत्येकी लाखभर रुपये घेतात असे ऐकिवात आहे. त्यांच्या वाट्याला अमाप प्रेम, प्रसिद्धी आणि लोभ आले. सध्या, अगोदरच्या स्पर्धेत अंतिम टप्प्यावर स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या निवडक दहा स्पर्धकांचे पर्व चालू आहे.

पल्लवी जोशी : सूत्रसंचालनाचा नवा मानदंडझी मराठीने स्पर्धा सुरू झाल्यापासून आतापर्यंत स्पर्धकांच्या निवडीपासून त्याच्या सादरीकरणापर्यंत उच्च स्तर राखला आहे. झी मराठीची टीम प्रत्येक एपिसोड छान सादर करते. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जिल्ह्यांतील स्पर्धेक, वेगवेगळ्या केंद्रांवर होणा-या निवडचाचण्यांत भाग घेतात. हजारो स्पर्धंकांतून चाळीस ते पन्नास स्पर्धक प्रेक्षकांसमोर पोचतात आणि खरी ‘लढाई’ सुरू होते. त्यासाठी खूप लोक खूप तयारी करतात.

‘झी’ वाले अंतिम टप्प्यात पोचलेल्या सर्वांकडून कसून तयारी करून घेतात. त्यांच्या ‘दिसण्या’त व ‘गाण्या’त खूप बदल होत जातो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, ओळख, लोकप्रियता हे जरी अळवाच्या पानावरचे थेंब असले तरी त्यासाठी गायकांना खूप कष्ट करावे लागतात; खूप शिकावे लागते. स्पर्धंकांना स्वत:चा अभ्यास किंवा व्यवसाय, नोकरी सांभाळावी लागतेच.

‘सारेगमप’ हा मूलत: ‘शो’ आहे. त्यात गाणे हे प्रमुख असते, परंतु बाकी ‘करमणूक’ महत्त्वाची असते. म्हणून प्रेक्षक टिकून राहतात आणि त्यामुळेच ‘सारेगमप’ने संगीत थिल्लर पातळीवर आणले अशी टीका होते. तरीही ह्या स्पर्धा गायकांना संगीतसाधना करायला उद्युक्त करतात. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. काहीतरी ‘टारगेट’ समोर ठेवूनच प्रत्येक गोष्ट केली जाते. फक्त साधना करत राहुया ही मानसिकता दुर्मीळ आहे. ‘सारेगमप’ चे व्यासपीठ मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. संगीत शिक्षकांना त्यामुळे महत्त्व आले आहे. संगीताच्या अभ्यासाला, रियाझाला महत्त्व आले आहे.

वैशाली सामंत, हृदयनाथ मंगेशकर, अवधूत गुप्ते ह्यांच्या समवेत 'चॅंपियन्स'ह्या सर्व पर्वांमध्ये सादर होणारी गाणी ही श्रोत्यांना आनंद देणारी असतात. पहिल्या भागापासून ते अंतिम भागामध्ये गायली जाणारी गाणी ही जास्त करून जुनी असतात. सतत पर्वे होत राहिल्यामुळे गाणी रिपीटही होतात, पण त्यातून सूक्ष्म पातळीवर गाण्याची तुलना श्रोत्यांच्या मनी कोरली जाते व ब-यावाईटाची पारख सुधारते. संगीताच्या बाबतीत तरी जुने ते सोनेच आहे. ह्या सगळ्या खोल खोल विहिरी आहेत आणि कितीही उपसल्या तरी आटत नाहीत.

स्पर्धेत प्रत्येक गाण्यानंतर होणारे विश्लेषण चांगले असते. त्यातून स्पर्धक आणि श्रोते, सगळ्यांना माहिती मिळते. म्हणजे श्रोते ऐकून ऐकून इतके तयार होत आहेत, की गायकाचे काही चुकले तर, काय चुकले हे ते सांगू शकतील. निदान ते नोटिस करतात.

‘सारेगमप’ची टीम म्हणजे संशोधन करणारे, वाद्यवृंद, संगीत संयोजक, संगीत समन्वयक हे खूप छान काम करतात आणि प्रत्यक्ष सादरीकरणात पल्लवी जोशी सगळ्यांना सूत्रबद्धतेने पकडते व गायकांना त्यांच्या गाण्यातून श्रोत्यांपर्यंत पोचवते.

शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावगीत ही आपली ठेव आहे. शास्त्रीय संगीतात दोन पद्धती मानल्या जातात. एक उत्तर भारतीय संगीत आणि दुसरे कर्नाटक संगीत. त्यांतले उत्तर भारतीय संगीत दक्षिणेजवळ असलेल्या महाराष्ट्राने सांभाळले आहे. अंतिम टप्प्यात पोचणारी काही मंडळी ही शास्त्रीय संगीतसंपन्न घराण्यातील आजचे प्रतिनिधी असतात. त्याचबरोबर लोकसंगीताचा वारसा जपणा-यांचे प्रतिनिधीसुद्धा य़शस्वी झाले आहेत.

‘झी’ची टीम कधी स्वतंत्र संकल्पना घेऊन तर कधी एखाद्या कवीचा, संगीतकाराचा जन्मदिवस, स्मृतिदिन आणि काही दिनविशेष असा योग साधून विविध गाणी सादर करत असते. यांतील औचित्य महत्त्वाचे ठरते. संगीत म्हणजे फक्त गाणी नाहीत तर त्यांचे कवी, संगीतकार, गायक, चित्रपट, नाटक, संयोजक (अरेंजर), कलावंत ह्यांपैकी जुने आणि नवीन, विस्मृतीत गेलेले ह्या सर्वांची आठवण ‘झी’ची टीम करून देते. नामवंत, यशवंत, दिग्गज मंडळी पाहुणे परीक्षक म्हणून हजेरी लावतात. त्यांची प्रत्यक्ष भेट होणे आणि त्यांच्यासमोर गायला मिळणे आणि त्यावर त्यांचे मार्गदर्शन मिळणे ही होतकरू स्पर्धकांसाठी मोठी संधी असते आणि या सोहोळ्याला साक्षी असण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना लाभते.

स्पर्धंकांना त्यांची गुणवत्ता आणि मर्यादा, उणिवा, सगळे माहीत होत जाते आणि ते घडत राहतात. देवकी पंडित ह्यांचा ‘पण’ खूप अर्थपूर्ण ठरला. ‘पण’ नंतर त्या जे बोलत ते मोलाचे आणि मार्गदर्शक असे. हृदयनाथ मंगेशकरांचा अनुभव व बहुश्रुतपणा सर्वांना भावला होता. त्यांचे निरूपण आवडणारे होते.

नवीन पिढी गाणारी आणि ऐकणारीही, बहुतेक इंग्रजी माध्यमात शिकते. इंग्रजीत बोलते आणि इंग्रजीत विचारही करत असेल – पण त्यांना ‘सारेगमप’मुळे जुन्या आणि नवीनही मराठी गाण्यांशी नाते जोडता आले. त्यांनी ही गाणी सहज गाण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यात अमराठी स्पर्धकांनीही प्रभुत्व मिळवले आहे.

‘लिटिल चॅम्पस्’नी अमराठी लोकांनाही वेड लावले होते. लहान मुलांचा संगीतातला वाढता सहभाग ही लक्षणीय गोष्ट आहे. जेवढ्या लहान वयात त्यांच्यावर संगीताचे सहज-संस्कार होतीत तेवढे चांगलेच आहे. रूढ शिक्षणाएवढेच कलेचे शिक्षणही महत्त्वाचे आहे. कोणतीही कला ही स्वत:ला व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम असते. कला त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व संपन्न करत असते. संगीतकला स्वत:बरोबर दुस-यालापण सहजानंद देते.

लहान वयात एक विलक्षण क्षमता मुलांमध्ये असते. त्या क्षमतेचा आविष्कारच ‘लिटिल चॅम्पस्’मध्ये दिसून आला. वयाने सगळ्यात लहान असणारी मुग्धा वैशंपायन एके दिवशी “हूरहूर असते हिच उरी...” ही गजल इतकी सुदंर गाऊन गेली की ती गजल त्या दिवशी तिचीच झाली! उगाच नाही, अवधुत गुप्ते तिच्या गाण्यांना मुग्धागीते म्हणे. भावगीते, नाट्यगीते... तशी मुग्धागीते! ‘लिटिल चॅम्पस्’ना हा सर्वात मोठा कौतुकोद्गार!

‘सारेगमप’च्या मंचावर शास्त्रीय संगीताचे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे आणि म्हणून लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनीही संगीत शिकायला सुरूवात केली आहे. त्यांपैकी काहीजण फक्त सुगम संगीत शिकत असतील, पण असे झाले तरी कानसेन निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. रियाजाचे महत्त्वही वेळोवेळी सांगितले जाते. मनापासूनची इच्छा आणि कष्ट करण्याची तयारी महागायिकापदापर्यंत घेऊन जाते हे वैशाली भैसने-माडे हिने दाखवून दिले.

आता, परत ‘लिटिल चॅम्पस्’ येऊ घातले आहे. त्यांच्या निवड चाचण्या गर्दीत चालू आहेत. खूप गर्दी झाली म्हणजे प्रसार झाला. यामुळे दर्जा वाढेल किंवा घसरेल असे नाही. संगीतप्रेमी मुले, त्यांचे पालक, त्यांचे संगीतशिक्षक सर्वजण शाळेच्या एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यापासून ‘सारेगमप’च्या ‘ऑडिशन’साठी तयारी करत होते! एकेकजण दहा-बारा गाणी तयार करतो. हा केवढा खटाटोप आहे! असे हजारो जणांचे एखाद्या उपक्रमात सहभागी होणे म्हणजे यज्ञच होय! ती लहान मुले आहेत म्हणून ही घटना जास्त महत्त्वाची आहे. आपला वारसा टिकवण्याचा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडूनच होऊ शकतो.

एका देशातील लहान मुलांचा बंदुका, चाकू, सुरे चालवण्याचा खेळ खेळतानाचा फोटो पाहिला होता. उलट,आपली मुले सुरांशी खेळत असतील तर त्यामुळे मोठेपणी ती खूप मोठी संगीतज्ञ किंवा गायक होतील किंवा होणार नाहीत, पण चांगली माणसे नक्की होतील!

- ज्योती शेट्ये

भ्रमणध्वनी : 9820737301
jyotishalaka@gmail.com

लेखी अभिप्राय

मला पण संगित शिकायच आहे.

vicky badabe13/04/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.