स्वप्न आणि वास्तव


स्वप्न आणि वास्तव

- विश्वास काकडे

असं म्हटलं जातं, की स्वप्न आणि वास्तव यांचा जेव्हा संघर्ष होतो तेव्हा वास्तवाचाच विजय होतो. स्वप्न आणि वास्तव या दोन्ही गोष्टी इतक्या जटिल आहेत की त्या समजल्याशिवाय असे सरळसोट विधान करणे योग्य नव्हे.

सिग्मंड फ्रॉइडसिग्मंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाने दीडशे वर्षांपूर्वी असा सिध्दांत मांडला, की आपल्याला झोपेत पडणारी स्वप्ने ही बहुतांशी आपल्या अतृप्त इच्छा असतात. त्यांची पूर्ती आपल्या नकळत स्वप्नातच करण्याचा मार्ग निसर्गाने निवडलेला आहे. स्वप्न पाहणे हा काही फक्त मनुष्याचा खास हक्क नाही. चिंपाझी, गोरिला या माकडांनासुध्दा स्वप्ने पडतात. आधुनिक शास्त्रज्ञांच्या मते, व्यक्तीने जागेपणी जे वर्तन केलेले असते, विचार केलेला असतो, नियोजन केलेले असते त्या सर्वांची सुसंगती लावण्यासाठी स्वप्न ही मज्जासंस्थेची गरज आहे. ज्या व्यक्तींना काही कारणांमुळे स्वप्ने पडत नाहीत त्या व्यक्तींची स्मरणशक्ती कमकुवत होते. हे झाले शास्त्रीय विवेचन.

प्रत्यक्षात, स्वप्न हा शब्द आपण ढिसाळपणे वापरतो. स्वप्न हा त्या व्यक्तीचा आत्मनिष्ठ अनुभव असतो. ते त्या व्यक्तीच्या मनोव्यवहारातील वास्तव आहे. 'मी हवेत उडायला लागलो आहे', 'मी मोठा शास्त्रज्ञ झालो आहे व मला नोबेल प्राइझ मिळाले आहे', 'टारझनप्रमाणे मला सर्व प्राण्यांची भाषा समजते व बोलता येते' हा कल्पनाविहार होय. याला वस्तुनिष्ठ पाया असेलच असे नाही, पण स्वप्न पाहणा-या व्यक्तीच्या दृष्टीने तो आत्मनिष्ठ अनुभव आहे.

मनुष्यप्राण्याला दोन प्रकारचे अनुभव येत असतात. वस्तुनिष्ठ व आत्मनिष्ठ. आत्मनिष्ठ अनुभव हे त्या व्यक्तीला निसर्गाने बहाल केलेल्या जैविक संरचनेमुळे येत असतात. प्रत्येक व्यक्तीचे आत्मनिष्ठ जग हे वेगवेगळे असते. याउलट, वस्तुनिष्ठ सत्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते. प्रकाशाचे गुणधर्म, विश्वाचे स्वरूप, जनुकशास्त्र ही वस्तुनिष्ठ सत्याची उदाहरणे.

सामाजिक वास्तव हे जरा वेगळ्या प्रकारचे असते. मनुष्य जगतो, प्रगती करतो ते त्याच्या सामाजिक अस्तित्वामुळे. प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये जगताना समाजाच्या चालीरीती, रुढी, परंपरा यांच्याशी जुळवून तरी घ्यावे लागते किंवा सामना तरी करावा लागतो. काही वेळेस, काही युगपुरूष सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी नवीन समाजव्यवस्थेचे स्वप्न पाहतात व त्यासाठी झगडतात. ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करतात. त्या स्वप्नांचा प्रकारच वेगळा असतो. युगपुरूष आपली स्वप्ने सामाजिक, राजकीय वास्तवाचे भान ठेवून नियोजनबध्द पध्दतीने साकारतात. त्यांची स्वप्ने वस्तुनिष्ठ सत्यांना नाकारणारी नसतात; तर सत्ये समजावून घेऊन, त्यांचाच वापर करून त्यांची उद्दिष्टे साकार करणारी असतात.

आळशीपणे, पलंगावर पडून राहून नुसती दिवास्वप्ने पाहणा-या व्यक्तींची स्वप्ने वास्तवाला धरून नसल्यामुळे त्यांचा चक्काचूर होतो. दिवास्वप्न पाहणे ही बाब मनोरंजक असली तरी ती पूर्णपणे निरुपयोगी आहे.

यावरून एक कल्पना स्पष्ट होते, की दूरदृष्टी (Vision) आणि मनोरंजक स्वप्ने (दिवास्वप्ने ) पाहणे यांत खूप मोठे अंतर आहे.

आल्बर्ट आईनस्टाईनकोणती व्यक्ती कोणते स्वप्न पाहील हे व्यक्तीच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली नसते. आपल्याला रोज रात्री पडणारी स्वप्ने ही आपल्या नियंत्रणाखाली नसतात.

प्रसिध्द शास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन लहान वयापासून एकाच कल्पनेने (विचाराने) पछाडलेला होता. त्याने भौतिक जगाचा सखोल अभ्यास केला. निरनिराळ्या प्रयोगांची व त्यांच्या परिणामांची माहिती करून घेतली. त्यांचा परस्पर संबंध काय याचा अभ्यास केला. त्याने आपण जर प्रकाशकिरणांवर स्वार होऊन जगाचा प्रवास केला तर जग कसे दिसेल? याचे उत्तर स्वप्नात शोधले नाही किंवा त्यावर साहित्यिक अथवा विज्ञानकथा लिहिली नाही; तर सापेक्षतावादाचा शोध लावला. नारायण मूर्ती म्हणतात, ''स्वप्ने पाहा आणि ती प्रत्यक्षात आणा''. ही स्वप्ने दिवास्वप्ने नसतात तर व्यावहारिक जगाच्या नियमांचा अभ्यास करून मांडलेली भावी योजना, नियोजन, कठोर परिश्रमांचा पाठपुरावा व आराखडा असतात.

जे द्रष्टे असतात त्यांच्या Vision स्वप्नांची काही वैशिष्ट्ये असतात. ती सृजनशीलता व व्यवहार, अशा दोन्हींना लक्षात घेऊन आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ अनुभवांचा आधार घेऊन मांडलेली असतात. गांधीजी, डॉ. आंबेडकर, आब्राहम लिंकन यांची स्वप्ने स्वत:पुरती मर्यादित नव्हती तर अनेकांची स्वप्ने सामावून घेणारी होती.

थोडक्यात म्हणजे व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल तर Vision हवे, दिवास्वप्न नव्हे. Vision जेवढे वस्तुनिष्ठ नियमांवर आधारित असेल तेवढे ते वास्तवात येऊ शकते.

रात्री पडणारी स्वप्ने ही क्षणभंगुर असतात. दिवास्वप्ने ब-याच वेळेला कल्पनाविहार असतात; पण Vision हे क्रांती घडवणारे, जग बदलणारे असते.

- विश्वास काकडे

vishwas1000@gmail.com

भ्रमणध्वनी : 9822509682 /  सोलापूर : 2627324, 2729144

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.