संपादकीय


महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्षे..

महाराष्ट्र निर्माण झाल्याला पन्नास वर्षें लोटली. या काळात जग पूर्ण बदललं. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसून आले. मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं या पलिकडे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा कोणताही मोठा अजेंडा नव्हता. त्यामुळे त्या काळातील सांस्कृतिक संकेत जसे होते तशी त्यांची महाराष्ट्र राज्याशी घडण आखली गेली. त्यानंतरचे गेल्या पन्नास वर्षांतील समाजस्थितीतील क्रांतिकारी बदल कसे रिचवायचे याचा कोणताही आराखडा नसल्याने त्या त्या वेळी छोटी-मोठी पावलं उचलली गेली त्यात धरसोडवृत्ती होती. शिवाय महाराष्ट्राची एक अडचण अशी की, हे राज्य व ही संस्कृती स्थलांतरितांची घडलेली असल्यानं सर्वसमावेक्षक असा कोणताही कार्यक्रम घेणं मुश्किल होतं. त्यातल्या त्यात सबळ होता तो भाषिक दुवा परंतु तंत्रज्ञानाच्या झपाट्यात तो दुवा कच्चा बनत गेला आणि महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवाच्या टप्प्यावर विघटनाच्या आव्हानाला (स्वतंत्र विदर्भाची हाक!) सामोरा जात आहे.

‘थिंक महाराष्ट्र..’ नं या टप्प्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील चार– तरुणांना, महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाबाबत त्यांना काय वाटतं असं विचारलं. त्यांचे प्रतिक्रियात्मक लेख येथे प्रसृत करत आहोत. आशिष कुलकर्णी हे जमिन विकास उद्योगात आहेत. दुस-या मुक्ता पुणतांबेकर या कलावंत आहेत. उन्मेष झगडे हे विद्यार्थी आहेत. अविनाश सावजी हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. या चौघांचे वैशिष्ट असे की त्यांचा सामाजिक कार्याशी जवळचा संबंध आहे.

याच संदर्भात मानवी जिव्हाळ्याचा एक वेगळा लेख नरेंद्र काळे यांनी सादर केला आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यामध्ये सर्वांत शोकात्म कहाणी आहे अनंत गोलतकर यांची. ते पोलिसी लाठीहल्ल्याला बळी पडले तेव्हा त्यांचं लग्न होऊन वर्षं-दीड वर्ष झालं होतं आणि बायको गरोदर होती. आंदोलनातील त्या कन्येची कहाणी काळे यांनी कथन केली आहे.

महाराष्ट्राबरोबर गुजरात राज्य जन्मास आलं स्वाभाविकच पन्नास वर्षांनंतरच्या दोन्ही राज्यांच्या प्रगतीची तुलना होते. गुजरात येथील वडोदरा येथे गेली चाळीस वर्षं राहत असलेले आर्किटेक-लेखक प्रकाश पेठे यांची निरीक्षणं एका लेखात मांडली आहेत. त्यातून कदाचित वेगली दृष्टी मिळेल.

संयुक्त महाराष्ट्राबाबतची ऐतिहासिक माहिती ‘थिंक महाराष्ट्र...’ ही संकेतस्थळ सुरु झाल्यापासून आम्ही सतत मांडत आलो आहोत. ती संदर्भासाठी केव्हाही पाहता येईल त्यासोबत संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आचार्य अत्रे यांच्या संबंधातले विनोद देखील सतत सांगत आलो आहोत. त्यातून या महापुरुषाचं दर्शन व्हावं अशीच इच्छा आहे.

 

    दिनंकर गांगल

    संपादक, थिंक महाराष्ट्र

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.