कुंभ मेळा


कुंभमेळा

हरिद्वारचा कुंभमेळा 28 एप्रिलला संपला. या कुंभमेळयाची एक-दोन वैशिष्टये होती. उत्तराखंड राज्य झाल्यानंतर प्रथमच बारा वर्षांनी येणारा हा महोत्सव घडून येणार होता. त्या दृष्टीने उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल'निशाक' यांना ती मोठी जबाबदारी वाटत होती. शिवाय, रमेश पोखरीयाल हे कवी असल्यामुळे अधिक हळवे आहेत. त्यामुळे त्यांना मोठेच दडपण वाटत होते. दुसरे म्हणजे हरिद्वारच्या या कुंभमेळयाला अफाट गर्दी होईल अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे एकशेचाळीस देशांमधील सहा कोटी लोक या पर्वकाळात हरिद्वारला येऊन गेले आणि त्यांनी गंगास्नान केले! मुख्यमंत्री म्हणाले, की गेल्या अडीचशे वर्षांत या त-हेने विविध धर्म-पंथ-आखाडे यांचे लोक प्रथमच एकत्र हरिद्वारच्या चांदीघाटातील होर्डिंगची गर्दीआले. शांतता आणि सद्भाव यांचे एवढे मोठे दुसरे उदाहरण मिळणे शक्य नाही.

मुख्यमंत्र्यांनी पुढे कोपरखळी मारली, की ओबामांना जर शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळतो तर तो हरिद्वारच्या महाकुंभ मेळयास का मिळू नये?

उत्तराखंड राज्य दोन हजार साली जन्मास आले, तेव्हा पोखरीयाल त्याचे अर्थमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे घेतल्याला लवकरच एक वर्ष पूर्ण होईल.

यावेळच्या कुंभमेळयास सर्वत्र साधुबाबांची मोठमोठी होर्डिंग लावण्यात आली होती. त्यावर 'हिंदू धर्म धोक्यात आहे!', 'ग्लोबल वॉर्मिंग थांबवणं हे माझं कर्म आणि धर्म आहे' अशा त-हेच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. गॅलॅक्सी ऍडर्व्हटायझिंग एजन्सीकडे कुंभमेळयातील होर्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट होते. या एजन्सीचे मालक रिशी सचदेव म्हणाले, की हरिद्वारचे क्षेत्रफळ फक्त आठ चौरस किलोमीटरचे आहे. एवढया लहान शहरात सुमारे पंधराशे होर्डिंग लावण्यात आली होती आणि त्यासाठी गेले चार-सहा महिने कामगार व कलाकार खपत होते.

साधारणपणे चार ते आठ कोटी रुपये या एक महिन्याच्या अवधीत निव्वळ होर्डिंगवर खर्च झाले असावेत असा अंदाज आहे.

 

पोलिओवर मात अशक्य?

भारतात सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सर्वांत यशस्वी मोहीम मानली जाते ती पोलिओविरुध्द लस टोचण्याची. अमिताभ बच्चनपासूनचे सारे नट-नटया या मोहिमेच्या प्रचारासाठी सिध्द असतात. महापालिकांपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्व स्वराज्य संस्थांची आरोग्य खाती या मोहिमेसाठी तत्पर असतात. त्यामुळे देवीच्या रोगाचे जसे उच्चाटन झाले तसे पोलिओचे होईल असा विश्वास वाटू लागला आहे. या यशाचे प्रमुख कारण बिल गेट्स यांनी या मोहिमेसाठी कोटयवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला हे होय. परंतु बिल गेट्स यांना अलिकडे मोठा धक्का बसला तो त्यांनी आफ्रिकेमधील पोलिओविरोधी मोहिमेला सत्तर कोटी डॉलरची मदत केली; तरीसुध्दा त्या खंडात पोलिओ झपाटयाने पसरत असल्याच्या बातम्या आहेत, त्यामुळे. ताजिकीस्तानमध्ये तर गेल्या एकोणीस वर्षांत पोलिओचा एकही रोगी नोंदला गेला नव्हता, परंतु तेथेही पोलिओ उद्भवत आहे!

सध्या बिल गेट्स आणि जागतिक आरोग्य संघटना पोलिओच्या पुनरूद्भवाचा शोध घेत आहेत. भारताच्या ईशान्य भागातदेखील पोलिओविरोधी मोहीम हवी तेवढी यशस्वी झालेली नाही असे आढळून येत आहे.

 

द इसेन्शिअल मराठी कुक बूक

महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना कौमुदी मराठे यांनी 'द इसेन्शिअल मराठी कुक-बूक' सादर केले असून त्यामध्ये मराठी पाककृतींची माहिती करून दिली गेली आहे. मराठे या आडनावाला साजेल त्याप्रमाणे पुस्तकात कोकणस्थांच्या पाककृती अधिक आहेत. परंतु देशस्थ, सारस्वत, चां.का. प्रभू, मालवणी, मुस्लिम वगैरेंच्या स्वयंपाकपध्दती वर्णन केल्या आहेत. त्यात अंबोळी, हळदीकुंकू-कॉफी अशांसारख्या जुन्या आठवणी जागवणार्‍या कृतीदेखील पाहून-वाचून मजा वाटते.

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.