'सदाशिव' त्रिमुखी मूर्ती'सदाशिव' त्रिमुखी मूर्ती;एक हजार वर्षांपूर्वीची..

ठाण्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिलाहारकालीन त्रिमुखी शंकराची मूर्ती सापडली आहे. खोपट-माजिवडा रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर गोल्डन पार्क परिसरात नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना खोदकामात ही मूर्ती सापडली. ही मूर्ती एक हजार वर्षांपूर्वीची असावी. त्रिमुखी शंकराला 'सदाशिव' म्हटले जाते.
मूर्तीला तीन तोंडे असून मधल्या मूर्तीला गोव्याच्या मंगेशीसारख्या मिशा आहेत. बाजूची दोन्ही मुखे दाढीमिशा नसलेल्या आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश त्रिमूर्ती सर्वांना परिचित आहे. पण फक्त शंकराची तीन तोंडे असणा-या मूर्ती सहसा पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे ठाण्यात सापडलेली ही मूर्ती दुर्मीळ असल्याची माहिती इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी दिली. मूर्ती चार फूट उंचीची असून मस्तकापासून छातीपर्यंतचा भाग अडीच फूट उंचीचा आहे. या ठिकाणी अधिक संशोधन केल्यास आणखी ऐतिहासिक वास्तू किंवा मंदिरांचे अवशेष सापडतील, असे टेटविलकर म्हणाले.
ठाण्यावर एकेकाळी राज्य करणा-या शिलाहार राजांच्या काळात शहरात अनेक मंदिरे उभारली गेली. शिलाहार राजे शिवभक्त होते. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणता येतील अशा त्या मंदिरांचे आणि मूर्तींचे अवशेष कुठेना कुठे सापडत असतात.

ही दुर्मीळ मूर्ती ठाण्यात होऊ घातलेल्या वस्तुसंग्रहालयात ठेवली जाईल अशी अपेक्षा आहे.

सदाशिवमूर्ती

डॉ. दाऊद दळवीठाणे व ठाणे परिसर नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत शिलाहार राजवंशाच्या आधिपत्याखाली होता. त्यांतील बहुतेक राजे हे शिवोपासक होते. ठाणे किंवा श्रीस्थानक ही त्यांची राजधानी होती. त्यांचे छोटसे राज्य दक्षिणेस रत्नागिरी जिल्ह्यातील प्रणालक किंवा सध्याचे पन्हाळेकाझी - रायगडमधील दिवेआगर ते ठाणे जिल्ह्याचा उत्तर भागात पसरलेले होते. शिलाहारांनी आपल्या दीर्घ शासनकाळात येथे समाजाची आर्थिक बांधणी व चोख आर्थिक व्यवस्था निर्माण केली. पौराणिक धर्माचे पुरस्कर्ते असल्यामुळे त्यांनी ठाणे परिसरात खुद्द श्रीस्थानक, मुंबईतील वाळुकेश्वर, अंबरनाथ, लोणाड, आटगाव, पेल्हाळ इत्यादी ठिकाणी शिवमंदिरे बांधली. त्यांतील अंबरनाथ, लोणाड व आटगाव येथील मंदिरे खंडित स्वरूपात निसर्ग व काळाशी झुंज देत अजूनही उभी आहेत.

प्रामु्ख्याने ही शैव मंदिरे होती. बहुधा प्रत्येक मंदिरासमोर तळे बांधलेले असायचे. ठाण्यातही शिलाहार काळातील अनेक तळी आहेत. शिलाहार राजे शिवोपासक असले तरी ते ब्रम्हा व विष्णू अशा इतर दैवतांचीही आराधना करत. त्यामुळे ठाणे परिसरात खोदकाम करत असताना शिव, गणपती, विष्णू व ब्रम्हाच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी सापडलेल्या श्रीधर व महिषासूरमर्दिनी यांच्या मूर्ती मुंबईच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत. ब्रम्हाच्या दोन सुंदर मूर्ती नालासोपारा इथे सापडल्या. ठाण्यातील सिद्धेश्वर तलावाजवळ सापडलेली ब्रह्म्याची मूर्ती पूर्णाकृती असून चौमुखी आहे. विष्णूची मूर्ती ओवळे येथील मोगलपाड्याच्या मंदिराजवळ ठेवलेली आहे. त्याशिवाय गणेशाच्याही अनेक मूर्ती सापडल्या व त्यांतील काही अदृश्यही झाल्या ( म्हणजे पळवल्या गेल्या )

ठाणे येथील शिवाची त्रिमुखी मूर्ती शिलाहारांच्या उत्कृष्ट शिल्पवैभवाची साक्ष देते. शिवाच्या तिन्ही मस्तकांवर जटामुकुट दाखवलेले असून, कानात भलीमोठी कुंडले आहेत. तिन्ही मुखांचा चेहरा तेजस्वी असून मधल्या चेह-याच्या ओठावर मिशा दाखवलेल्या आहेत. मूर्तीच्या एकंदर धाटणीनुसार ती 'सदाशिव'  शिवाची मूर्ती असावी असे अनुमान काढता येते. याचाच अर्थ मधले मुख हे महादेवाचे व बाजूची मुखे अनुक्रमे वामदेव व अघोर शिवाची असावीत. या मूर्तीचे घारापुरी येथील त्रिमूर्तीशी फार मोठे साम्य आहे. मूर्तीच्या गळ्याखालील भाग खंडित झालेला असल्यामुळे आभूषणे नेमकी काय होती हे कळण्यास मार्ग नाही. ही मूर्ती सध्या महापालिका कलादालनात ठेवलेली आहे. ठाण्यातील असे मूर्तिवैभव सर्वत्र गृहसंकुलांची निर्मिती झाल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक वाटते, कारण त्यातून प्राचीन ठाण्याच्या वा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते.

-डॉ. दाऊद दळवी
(022) 25345706
डॉ. दळवी हे इतिहास संशोधक असून त्यांची 'लेणी महाराष्ट्राची' व 'असे घडले ठाणे' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.