माझी मराठी अस्मितेची कल्पना : उदार, सर्वसमावेशक


माझी मराठी अस्मितेची कल्पना:उदार, सर्वसमावेशक

- तारा भवाळकर

भौगोलिक दृष्टया, महाराष्ट्र हा भारताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला सांधणारा दुवा, सेतू आहे. महाराष्ट्राने प्राचीन काळापासून उत्तर व दक्षिण यांना सर्व पातळयांवर जोडण्याचे काम केले आहे. उत्तरेची संस्कृतपासून निर्माण झालेली भाषा व दक्षिणेची द्रविड भाषेपासून निर्माण झालेली भाषा या दोहोंचा संगम मराठी भाषेत झाला आहे, हे लोकसंस्कृतीची अभ्यासक म्हणून मला प्रथम सांगावेसे वाटते. त्यामुळे महाराष्ट्राची, मराठीची अस्मिता म्हणजे आपले दैवत पांडुरंग, मराठी माणसाचा मानदंड छत्रपती शिवाजी महाराज, आपली पुरणपोळी आणि आपली नऊवारी साडी ही आहे. इथला वारकरी संप्रदाय ही मराठी अस्मिता आहे. आपले दैवत, विठ्ठलाचे भक्त कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र या भागांत आहेत. आपला पोषाख, अर्थात नऊवारी साडी कर्नाटक व महाराष्ट्राशिवाय इतरत्र पाहायला मिळत नाही.

आपल्या मराठी भाषेच्या उद्भवाचा पहिला पुरावा दक्षिणेत मिळतो. मराठी भाषेचा उगम, त्याचा पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवण बेळगूळ इथे सापडतो. महाराष्ट्राची संस्कृती उदार, सर्वसमावेशक, समन्वय साधणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्व अस्मितांचा संगम आहे. मराठीचा इतिहास, आपले राजे शिवराय यांची जहांगिर दक्षिणेशी जोडली गेली आहे. मराठी भाषेत इतर अनेक भाषांचे शब्द प्राचीन काळापासून आले आहेत. त्यामुळे मराठीची अस्मिता व्यापक असून तिला संकुचित करू नका. आज केवळ मराठी भाषेत नाही तर सर्वच प्रादेशिक भाषांमध्ये उदासीनता, मरगळ आली आहे. जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेमुळे, विशेषतः अमेरिकेच्या तंत्रज्ञानामुळे इंग्रजी भाषेबद्दलचा जबरदस्त ओढा भारतीय माणसांमध्ये, खास करून मध्यमवर्गीयांमध्ये आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत आहेत. हीच स्थिती इतर प्रादेशिक भाषांचीही आहे; मात्र इतर भाषांमध्ये त्यांची प्रादेशिक भाषा सक्तीची आहे. अशी सक्ती महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे. कोणत्याही माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे. ('सकाळ'वरून)

- तारा भवाळकर

(तारा भवाळकर या मराठीच्या निवृत्त प्राध्यापक व लोककलेच्या अभ्यासक आहेत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.