एफ टी आय आय नावाचे गोत्र


दादासाहेब फाळके यांच्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'पेक्षा अधिक सुसज्ज, अधिक तंत्रकुशल अशी प्रभात कंपनी होती. मात्र अवघ्या दहा वर्षांत ही परंपरा खंडित झाली. स्वातंत्र्यापूर्वीच, 'प्रभात'चा अस्त झाला आणि पुढील दशकात कंपनीचे दिवाळे निघाले! 'प्रभात'च्या याच कर्मभूमीत 'फिल्म इन्स्टिट्यूट'ची उभारणी झाली.

एफ टी आय आय नावाचे गोत्र
अर्थात 'उसकी रोटी' का 'हलवा'

- सतीश जकातदार

'फिल्म इन्स्टिट्यूट' या संस्थेने यंदा पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील ही महत्त्वपूर्ण घटना आहे. जगात सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश म्हणून भारताची ख्याती असली तरी, 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात चित्रपटनिर्मितीचे शास्त्रशुध्द शिक्षण देणारी कोणतीच व्यवस्था उपलब्ध नव्हती.

मुंबई, मद्रास, कलकत्ता येथील सुसज्ज 'स्टुडिओ'च्या बहुआयामी वातावरणात कधी अनुकरणातून, कधी 'ट्रायल आणि एरर'मधून उस्फूर्तपणे चित्रनिर्मितीचे अंकुर फुटत होते... त्यातूनच चित्रपट कला म्हणून उदयास येत होती... व्यवसाय म्हणून बहरत होती. न्यू थिएटर्स, बॉम्बे टॉकिज, बिमल रॉय अशा अनेक 'स्कूल'चा चित्रपटांवर, चित्रपटशैलीवर व विशेषत: चित्रपटांच्या आशयावर प्रभाव होता. त्या प्रभावांचा सूचक वेध घेत नवे दिग्दर्शक, तंत्रज्ञ आपापले चित्रपट निर्माण करत होते. शास्त्रीय संगीताप्रमाणे, प्रेक्षकही त्या त्या घराण्याचे म्हणून ते चित्रपट बघत होते आणि त्या त्या घराण्यांच्या आदर्श चित्रपटांशी तुलना करत जोखत होते. मात्र स्वातंत्र्यापूर्वी पुण्यात निर्माण झालेल्या 'प्रभात' स्टुडिओचा बोलबाला देशभर होता. शांताराम, दामले, फत्तेलाल यांची ही किमया. या स्टुडिओने सामाजिक-ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा निर्माण केली. 'प्रभात'ने आध्यात्मिक व वाड:मयीन मूल्ये असलेले 'नैतिक' चित्रपट निर्माण करून सा-या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'पेक्षा अधिक सुसज्ज, अधिक तंत्रकुशल अशी प्रभात कंपनी होती. मात्र अवघ्या दहा वर्षांत ही परंपरा खंडित झाली. स्वातंत्र्यापूर्वीच, 'प्रभात'चा अस्त झाला आणि पुढील दशकात कंपनीचे दिवाळे निघाले! 'प्रभात'च्या याच कर्मभूमीत 'फिल्म इन्स्टिट्यूट'ची उभारणी झाली.

स्वातंत्र्योत्तर आधुनिक समृध्द राष्ट्र निर्माण करण्याचा नेहरुयुगाचा मनसुबा जसा सर्व क्षेत्रांत उमटत होता तसा तो 'चित्रपट संस्कृती' क्षेत्रात उमटण्यास वेळ लागत होता. 'चित्रपट संस्कृती' रुजवण्यास एकांड शिलेदारांनी प्रारंभ केला असला तरी त्याला (सरकारी पातळीवरून) खरा वेग आला तो 'स. का. पाटील समिती'च्या व्यापक धोरणाने व शिफारशींनंतर. सरकारने 'चित्रपट संस्कृती'ची निर्मिती व योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच 'फिल्म इन्स्टिट्यूट'स्थापना झाली. पुढे, 20 मार्च 1971 रोजी दूरदर्शन आल्यानंतर 1974 मध्ये त्याचे 'फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये (एफ.टी.आय.आय.) रूपांतर झाले.

सत्यजित रे यांच्या 1955च्या 'पथेर पंचाली'द्वारे भारतीय सिनेमात ख-या अर्थाने नवसिनेमाचा प्रवाह झिरपू लागला. खरे तर, तीच नवसिनेमाची प्रभात होती. जागतिक सिनेमाचे भान ठेवत आपल्या मातीत घट्ट रुतलेला, बावन्नकशी आशयाशी-चित्रपटकलेशी सुडौल सांगड घालणारा हा सिनेमा नवप्रवाहाचे ठोस पाऊल उचलू लागला. या सिनेमाच्या प्रभावाने बंगालमधला नवसिनेमा बहरत असतानाच 1961 मध्ये 'फिल्म इन्स्टिट्यूट'ची उभारणी झाली. देशातील नव्हे तर आशियातील ही पहिली इन्स्टिट्यूट.. तिच्या स्थापनेने 'नवसिनेमा निर्मिती'ची धुळाक्षरे
गिरवणा-या पिढया तयार होऊ लागल्या. या गोष्टीने यंदा पन्नाशीत पदार्पण केले आहे.

पन्नास वर्षांच्या कारकिर्दीवर धावती नजर टाकल्यास 'एफ.टी.आय.आय.'च्या शिदोरीत बरेच काही दडले आहे हे ध्यानी येते. 'दादासाहेब फाळके' हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा अदूर गोपालकृष्णसारखा दिग्दर्शक हा या संस्थेच्या पहिल्या काही विद्यार्थ्यांपैकी आहे. त्याने केवळ मल्याळीमध्ये नव्हे तर भारतासह जागतिक सिनेमात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले. केरळमधील फिल्म सोसायटी चळवळीस प्रेरणा व आकार दिले. त्यातूनच केरळमध्ये 'नवसिनेमाचा' प्रेक्षक व त्यांना समाधान देणा-या चित्रपट निर्माण करणा-या नव दिग्दर्शकांची पलटण तयार झाली. सत्यजित रे चा खरा वारसदार असा हा दिग्दर्शक, अदूर बालकृष्ण या इन्स्टिट्यूटमध्ये शिकून तयार झाला.

गजानन जागीरदार या पहिल्या प्रिन्सिपॉलसह ॠत्विक घटक, गिरिश कर्नाड या चित्रपट दिग्दर्शकांच्या व सतीश बहादूर, भास्कर चंदावरकर यांच्यासारख्या जाणकार प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली 'नवसिनेमा'च्या प्रयोगात, प्रशिक्षणात विद्यार्थ्यांच्या अनेक पिढया सामील झाल्या. त्यांतील मणी कोल व कुमार सहानी यांनी जागतिक स्तरावर कुतूहल निर्माण केले आणि भारतीय सिनेमाला 'प्रायोगिकते'ची चव दिली. 1970 च्या दशकात मृणाल सेन व श्याम बेनेगल यांनी उजागर केलेली 'समांतर सिनेमाची वाट' एफ.टी.आय.आय.चे गोत्र असणा-या विद्यार्थ्यांनी अधिक रुंद केली. बंगाली, मल्याळी, गुजराथी, तामीळ, तेलुगू, आसामी, कन्नड अशा अनेक प्रादेशिक सिनेमाला 'ओळख' देणारे आणि सिनेमाचे जागतिक भान देत त्या त्या प्रदेशाची संस्कृती व समकालीनत्व टिकवणारे अनेक चित्रपट दिले. 'भवनी भवाई', 'स्वयंवरम', 'पिरावी', 'घटश्राध्द', 'संध्या रामान', हलविया चोरिया', 'बावधन खाई' अशा काही प्रादेशिक चित्रपटांचा उल्लेख अटळ आहे. कुंदन शहा, केतन मेहता, जानू बरूआ, गिरिष कासारवल्ली, शासी करुप, बाळू महेंद्र, उमेश कुलकर्णी ही काही ठळक नावे सांगता येतील. या वाटेवरचे हे माईलस्टोन!

याशिवाय 'समांतर सिनेमा'तील अभिनयास व्यक्तिमत्त्व बहाल करून देण्याचे श्रेय नसीरुद्दीन शहा, ओम पुरी, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना जाते. हे सारे जण एफ.टी.टी.आय.आय प्रशिक्षित होते. तसेच, केवळ 'समांतर' नव्हे तर मुख्य प्रवाहातील सिनेमात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे दिद्गर्शक फिल्म इन्स्टिट्यूटच्या मुशीतून तयार झाले. डेव्हिड धवन, सुभाष घई, संजय लीला भन्साळी, विध्दु विनोद चोप्रा, प्रकाश झा, राजकुमार हिरानी, संतोष शिवन ही नावे हिंदी सिनेमातील ऐरणीवरची आहेत. सिनेमा मग तो मुख्य प्रवाहातील अथवा समांतर असो.. संकलन, ध्वनिमुद्रण व छायाचित्रण या तिन्ही क्षेत्रांत फिल्म इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा चित्रउद्योगातील तगडा सहभाग सर्वश्रुत आहे. संकलक रेणू सलुजा, ध्वनिमुद्रक कुलदीप सूद व हितेंद्र घोष, छायाचित्रकार अनिल मेहता, के.के.महाजन, ए.के.बीर, देबू देवधर आणि 'ऑस्कर' विजेता रसूल पोकट्टी या सा-यांचा वसा चित्रोद्योगातील एफ.टी.आय.आय.ची पताका उंच फडकावत आहे.

'फिल्म इन्स्टिट्यूट'च्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या 'डिप्लोमा फिल्म्स'नी अनेक वेळा राष्ट्रीय पारितोषिकेही मिळवली आहेत, शिवाय जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांत त्या लक्षवेधी ठरल्या आहेत. यांतील काही 'डिप्लोमा फिल्म्सं'ना स्वतंत्रपणे 'लघुपट' म्हणूनही मान्यता मिळाली आहे. प्रथितयश दिग्दर्शक असलेल्यांचे 'पहिले अपत्य' म्हणून त्यांचे स्मरण महत्त्वाचे आहे!

चित्रपटकलेची मर्मस्थाने दाखवून या कलेचे जागतिक भान व सौंदर्याची जाण देणारे प्रशिक्षण या संस्थेत दिले जाते. त्याचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांनी पुढील काळात तयार केलेल्या अनेक सिनेमांत दिसते. याशिवाय रसिक प्रेक्षक, चित्रपट समीक्षक व जाणकार यांना चित्रपट रसास्वादाचे महत्त्व व स्वरूप विशद करणारा 'फिल्म ऍप्रिसिशन कोर्स' इन्स्टि्यूटने गेली पस्तीस वर्षे आयोजित करून हजोरोंना चित्रपट आस्वादाची ओळख करून दिली आहे. सतीश बहादूर या कर्मवीराची ही किमया आहे.

गेली काही वर्षे फिल्म इन्स्टिट्यूट अनेक चित्रपटबाह्य उपक्रमांनी गाजत होती. कधी संचालकांची मनमानी तर कधी विद्यार्थ्यांची अरेरावी. सरकारच्या दुर्लक्षामुळे ही 'संस्था' 'आजारी उद्योगा'च्या स्वरूपात दाखल होत आहे की काय असे वाटत होते. मात्र सुवर्ण महोत्सवी वर्षांची चाहूल लागताच नव्या संचालकांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने कात टाकली आहे.

20 मार्च रोजीच्या उद्धाटन समारंभात झालेल्या परिसंवादात मणी कौलने त्या काळातील किस्सा सांगितला. एका पार्टीत तो राजकुमार या प्रथितयश हिंदी नटाला भेटलो होतो. त्याने मणी कौलला विचारले, 'अरे एफ.टी.आय.आय. ग्रॅज्युअट हो । फिल्म भी बना रहे हो क्या' मणी म्हणाला, 'हा, उसकी रोटी'. राजकुमार म्हणाला 'रोटी वो भी उसकी! और यहाँ आओ, हम अपना हलवा बनाएंगे!'

एफ.टी.आय.आय.चे गोत्र असणा-यांसाठी हा बराच सूचक किस्सा आहे. नव्या डिजिटल युगात 'रोटी' बरोबर 'हलवा' विकण्याचे तंत्र विकसित झाले आहे. आता एफ.टी.आय.आय.समोर हेच आव्हान आहे. समाजाचे सजग चित्रभान असणा-या कलाकृती निर्माण करणा-या पिढया तयार करायच्या का 'हलवा' विकणा-या पलायनवादी चित्रपटांची निर्मिती करणा-या पिढया! सुवर्णमहोत्सवी वर्षाची हीच कसोटी आहे!

 

- सतीश जकातदार

भ्रमणध्वनी: 9822975882

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.