जागरण


जागरण

संकलन : राजेंद्र शिंदे

महाराष्ट्राचे खंडोबा हे दैवत आहे. जेजुरीचा खंडोबा हा अठरा पगड जातींचा कुलस्वामी आहे. जागरण हे देवासाठी एक दिवस जागण्याचे व्रत असते. भक्तलोक स्वत:च्या ऐपतीनुसार वाघे-मुरळीचे जागरण घालतात. खंडोबाचे जागरण म्हणजे सांसारिक यज्ञ! जागरण हा धर्मविधी कुटुंबावर सुसंस्कार घडवण्यासाठी आहे असे मानले जाते. त्यामधून सांगितलेल्या समाजप्रबोधनात्मक कथा, माणसाच्या मनाला गवसणी घालणारी पारंपरिक पदे लोप पावत चालली आहेत. वाघे-मुरळी गायन, वादन, अभिनय या आपल्या कलेतून जागरण सादर करतात.

जागरणविधी दोन प्रकारे करता येतो. जागरण विधीसाठी यजमान आपल्या पत्नीसह खंडोबाच्या नावाने दिवसभराचा उपवास करतो. सगेसोयरे, नातलग, स्नेही यांना निमंत्रित करतो. विधी सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन वाजता संपतो. संपल्यावर अन्नदान केले जाते, तर रात्रीचे जागरण सुरुवातीला ‘पाचपाऊली’ झाल्यानंतर अन्नदान करून रात्री दहा-अकराला सुरू होऊन पहाटे पाच वाजता संपते. जागरणाआधी ‘पाचपाऊली’ आणि कोटुंबपुजा करायची असते. आपल्या देव्हा-यातील देवाचे टाक एका ताम्हनाच्या ताटात ठेवून बरोबर पूजेचे सामान घ्यायचे व गावाबाहेर किंवा घरापासून थोड्या अंतरावर जायचे असते. याला ‘पाचपाऊली’ म्हणतात.

मूळ जागरण रात्री सुरू होण्याच्या अगोदर चौक भरला जातो. तो अशा प्रकारे, पाच ऊस किंवा ज्वारीची ताटे एकत्र बांधून त्यावर पाच तळलेल्या चाणक्या (कडाकण्या) लटकावून ठेवतात. पाटावर नव्या कापडाच्या गादीवर गहू किंवा तांदळाच्या धान्याने रांगोळीसारखे भरले जाते. त्यामध्ये सुपारी, हळकुंडे, खारीक, बदाम, खोबरे वाटीत घालून ठेवतात. चौकाच्या खाली पाण्याने भरलेल्या कलशावर श्रीफळ ठेवतात. गादीवर घरातील खंडोबाचे टाक ठेवतात.

पाच ऊस हे 1. विश्वास, 2. संयम, 3. कर्तृत्व, 4. प्रामाणिकपणा व 5. कष्ट या पाच विचारांचे प्रतीक समजले जातात. हे पाच विचार जे कुटुंबात चांगल्या प्रकारे राबवतील त्यांना समाधान प्राप्त होईल. पाच तळलेल्या चाणक्या (कडाकण्या) पाच ऊसांना बांधतात. अन्नामध्ये समाधान आहे. भरलेल्या कलशावर नारळ याचा अर्थ शेराचा सव्वाशेर होणे असा आहे.

पाच नामांचे जागरण

पहिले नाम - देव आळवणी - आपल्या कवनातून स्वतःस माहीत असणा-या देवाचे नाव घेऊन देवास निमंत्रण

दुसरे नाम - गण-गणपतीची स्तुती, गणाचे महत्त्व

तिसरे नाम - खंडोबाचे महत्त्व

चौथे नाम - ढोंगी, खोट्या भक्तांच्या भक्तीचे विडंबन

पाचवे नाम - खंडोबा या दैवताला अनुसरून समाजप्रबोधनात्मक, रात्रभर चालणारी कथा.

खंडोबा हा स्वाभिमानी आणि वीरांचा देव आहे. खंडोबा हे नाव खड्ग म्हणजे तलवार यावर प्रभुत्व असणारा वीर यावरून तयार झाले आहे. खड्गधारी म्हणजे खंडोबा. त्यास मल्हारी हे नाव मल्लदैत्याचा वध केल्यामुळे पडले.

( संकलन : राजेंद्र शिंदे )

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.