चौथे साहित्य संमेलन - 1906


chauthe_sahitya_sanmelanन्यायमूर्ती गोविंद वासुदेव कानिटकर हे चौथ्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते. ते संमेलन पुणे येथेच 1906 साली भरले. गोविंद वासुदेव कानिटकर यांचा नावलौकिक साहित्य, संगीत आणि विद्या या तिन्ही क्षेत्रांत होता. ते चित्रकलेचे चाहते होते. त्यांचा अभ्यास वेदांताचा व इंग्रजी वाङ्मयाचा होता. ते साक्षेपी विद्वान म्हणून ख्यातकीर्त होते, त्यांनी मासिक ‘मनोरंजन’ हे सुरेख मासिक1886 च्या दरम्यान सुरू केले. आधुनिक मराठी कथेचे जनक हरिभाऊ आपटे यांनी कानिटकर यांच्या ‘करमणूक’मधूनच कथालेखन सुरू केले. कानिटकरांच्या पत्नी काशीताई कानिटकर ह्यासुद्धा कथालेखिका होत्या. काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत असत. काशीबाई कानिटकर यांनी पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचे चरित्र लिहिले. मराठी कथेची जडणघडण ज्या ‘करमणूक’मधून झाली. ते ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष झाले हा उत्तम योग होता. बहुभाषी जाणकार, अफाट वाचन, सतार उत्तम वाजवणारे असा त्यांचा लौकीक होता. ते न्यायमूर्ती रानडे यांचे जवळचे स्नेही होते. ते कविता उत्तम लिहीत. कविता व विद्वत्ता असे परस्परविरोधी भासणारे गुण त्यांच्या ठायी होते. 

गोविंद वासुदेव कानिटकर यांचा जन्म 9 जानेवारी 1854 रोजी पुण्यात झाला. ते कवी आणि भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. कानिटकर यांचे शिक्षण पुण्यात आणि मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. ते बीए, एलएल बी होते. त्यांनी वकिली काही वर्षें केली; तसेच, मुन्सफ म्हणून नोकरी सरकारी न्यायालयात केली. ते फर्स्ट क्लास सब-जज्ज म्हणून निवृत्त झाले. त्यांनी कॉलेजमध्ये असताना काव्य-लेखनाला सुरुवात केली. त्यांचे चुलते नारायण बापुजी कानिटकर हे नाटककार होते. नारायण कानिटकर यांच्या सहवासात गोविंद कानिटकर यांनी ‘अजविलाप’ हे दीर्घकाव्य लिहिले; तसेच, ‘गीतांजली’चा अनुवाद केला. त्यांनी शेक्सपीयरच्या हॅम्लेट’चे नाट्यरूपांतर ‘वीरसेन किंवा विचित्रपुरीचा राजपुत्र’ ह्या नावाने 1883 साली प्रसिद्ध केला. त्यांचे भाषांतरित वा रूपांतरित वाङ्मयही प्रसिद्ध होते. त्यांचे ‘संमोहलहरी’, ‘नारायणराव पेशवे यांचा वध’, ‘कविकूजन’, ‘अकबर काव्य’, ‘कृष्णकुमारी’ यांसारखे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.  

_suresh_lotalikarत्यांनी मुंबई विश्वविद्यालयाने मराठी हा विषय सक्तीचा ठेवावा म्हणून ठराव चौथ्या संमेलनात आणला. त्याला इतिहासाचार्य राजवाड्यांनी विरोध केला. ती सभा साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांनी मध्यस्थी करून शांत केली. पण ह्याच संमेलनाची फलश्रुती म्हणजे पुण्याच्या ‘साहित्य परिषदे’चा जन्म झाला. ती तारीख 27 मे 1906. त्या संमेलनाला लोकमान्य टिळक हजर होते. वास्तविक, त्या संमेलनाचे तेच अध्यक्ष होणार होते. तो योग पुढे आलाच नाही! कानिटकर यांचा मृत्यू 4 जून 1918 रोजी झाला.

-वामन देशपांडे
(व्यंगचित्रकार - सुरेश लोटलीकर)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.