दुसरे साहित्य संमेलन - 1885


_krushnaji_rajwadeदुसरे ग्रंथकार संमेलन 1885 साली, म्हणजे पहिल्या ग्रंथकार संमेलनानंतर सात वर्षांनी भरले. मधील सहा वर्षें काहीही घडले नाही! दुसरे संमेलनही पुण्यात सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात भरले. ते पुण्यात 28 मे 1885 रोजी भरले. त्या संमेलनास अडीचशेच्यावर ग्रंथकार उपस्थित होते. त्या संमेलनासाठी पुन्हा पुढाकार घेतला तो महादेव गोविंद रानडे यांनीच. त्यानिमित्त एक विनंतिपत्रक प्रसिद्ध झाले होते. त्या पत्रकावर रानडे यांच्या बरोबरीने गोपाळ गणेश आगरकर, का.बा. मराठे आदी मान्यवरांच्या सह्या होत्या. पत्रकात संमेलनाचा उद्देश पुन्हा त्याच प्रकारे लिहिला गेला आहे - मराठीतील सर्व ग्रंथकारांनी एकत्र यावे आणि मराठी भाषेचा विचार साकल्याने व्हावा, ग्रंथकारांची एकमेकांशी ओळख व्हावी. त्या संमेलनासाठी लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. सूचना करणाऱ्यांत महात्मा फुले, जंगली महाराज, डॉ. कान्होबा रामछोडदास कीर्तिकर, महादेव चिमणाजी आपटे आदी मान्यवरांचा समावेश आहे. त्या संमेलनाचा वृत्तांत ‘केसरी’मध्ये आला होता- “गेले रविवारी जोशीबाबांचे दिवाणखाण्यात ग्रंथकर्त्यांची सभा भरली होती. शे-सव्वाशे ग्रंथकार आले होते. मराठी ही सर्वांस अवगत भाषा करण्याची खटपट करणे इत्यादी सूचनांचा विचार करून पुढे काय करावे, हे ठरवण्याचे पुढील वर्षावर ठेवून सभा विसर्जन झाली.” 

दुसऱ्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष कृष्णाजी केशव ऊर्फ कृष्णशास्त्री राजवाडे होते. कृष्णशास्त्री हे वेदशास्त्रसंपन्न, शास्त्री परंपरेतील व्युत्पन्न असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट 1820 रोजी झाला. कृष्णशास्त्री यांनी पुण्याच्या विश्रामबाग संस्कृत पाठशाळेत न्याय, अलंकार, वेदान्त व धर्म ह्या शास्त्राचे अध्ययन केले. ते वयाच्या एकविसाव्या वर्षी उपगुरू म्हणून तेथेच 1841 साली साहित्य व अलंकारशास्त्र ह्या विषयांचे अध्यापक झाले. त्यांची नेमणूक शिक्षण खात्याच्या भाषांतर विभागात 1856 साली झाली. त्यांना संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी भागवत सप्ताह पुण्यात सुरू केला. ते वेदशास्त्र सभेचे परीक्षक अनेक वेळेस होते. त्यांनी अनेक सभासंमेलनांत भाग घेतला; पण प्रामुख्याने ज्ञानमार्गी वाट चोखाळली. राजवाडे हे मराठी ग्रंथकार होते. राजवाडे ह्यांचा ‘अलंकारविवेक’ (1853) हा _suresh_lotalikarविशेष उल्लेखनीय असा ग्रंथ होय. त्यात संस्कृतातील अलंकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. त्यांनी अलंकारांची उदाहरणे मुक्तेश्वीर, वामन इत्यादी मराठी कवींच्या रचनामंधून दिली आहेत. तो संस्कृत साहित्यविचार मराठीत आणण्याचा आंरभीचा प्रयत्न होता. त्यांनी चार संस्कृत नाटके - मालतीमाधव, मुद्राराक्षस, शाकुंतल आणि विक्रमोर्वशीय - भाषांतरित केली. त्यांच्या भाषांतरांना दक्षिणा प्राइझ कमिटीची बक्षिसे मिळाली होती. त्यांचा महावीरचरित्राचा अनुवाद अप्रकाशित आहे. 

कृष्णशास्त्री राजवाडे यांचे ‘ऋतुवर्णन’ (1871) आणि ‘उत्सवप्रकाश’ (1874)  हे काव्यग्रंथ होते. त्यांनी ‘ऋतुवर्णन’ हे कालिदासकृत ‘ऋतुसंहारा’च्या अनुकरणातून रचले आहे. अठरा हिंदू सणांचे वर्णन ‘उत्सवप्रकाशा’त आहे. ते 6 ऑगस्ट 1901 साली पुणे येथे निवर्तले.

-वामन देशपांडे 
(व्यंगचित्रकार - सुरेश लोटलीकर)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.