नक्षत्रवाती


_nakshatra_vatiभारतातील चालीरीती, व्रते, पूजा या परंपरेने, प्रांतानुरूप, जाती-समुदायनिहाय चालत आलेल्या आहेत. त्या बहुतेक सर्व निसर्गाच्या बदलांशी निगडित आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फुले, फळे तसेच संबंधित विधींचे स्वरूप हे निसर्गाच्या त्यावेळी असलेल्या स्थितीला अनुरूप असे  असते. पावसाळ्यात कुटुंबांतील सर्व माणसे शेती-बागायतीमध्ये अडकलेली असायची. शेत-बागायत पिकून तयार झाली, उत्पन्न हाताशी आले, की ती माणसे निवांत होत असत. त्यानंतर त्यांचे सगळे महत्त्वाचे सणवार सुरू होतात. म्हणून श्रावणापासून मार्गशीर्ष महिन्यापर्यंत आगळीवेगळी व्रतवैकल्ये आहेत. कालौघात त्यातील अनेक प्रथा, रूढी खूप वेगळ्या रूपात पुन्हा अवतरलेल्याही दिसतात. फक्त कार्तिकातील ‘नक्षत्रवाती लावणे’ हे व्रत असेच एक पूर्ण विस्मृतीत गेलेले. 

कार्तिकात, दिवस उशिरा उजाडला जातो; तसाच, तो लवकर मावळतो. पहाटे काळोख असतो. थंडी बऱ्यापैकी स्थिरावलेली असते. ‘नक्षत्रवाती’ व्रत तशा वातावरणात कार्तिक महिनाभर केले जात असे. त्यात महिन्यातील चार रविवारी किंवा सोमवारी फक्त करण्याची सूट असेच. भारतीय स्वास्थ्य रक्षणात आवळ्याला खूप महत्त्व आहे. ‘नक्षत्रवाती’ व्रतात एका तांब्याच्या ताम्हनात किंवा केळीच्या पानावर, आवळ्याच्या एकोणतीस चकत्या मांडल्या जातात. त्यावर सत्तावीस नक्षत्रांच्या सत्तावीस वाती अधिक चंद्र-सूर्यासाठी दोन वाती अशा शुद्ध तुपातील एकोणतीस वाती मांडल्या जातात. पूर्वी आकाशात जोपर्यंत नक्षत्रे दिसत असत तोपर्यंत त्या वाती उजळून (पेटवून) त्या अंगणातील तुळशीजवळ ठेवल्या जात असत. त्यामुळे नक्षत्रदोष, राशींमधील ग्रहांची पीडा दूर होते, स्थैर्य लाभते अशी श्रद्धा सांगितली जाई. तो अंधत्वाचा भाग बाजूला, पण वीज नसल्याच्या काळात ते सुंदर दृश्य मस्त काळोखात किती रम्य असेल! नुकतीच संपलेली दिवाळी आणि पहाटे ज्योतींनी उजळलेले अंगण! धार्मिक व्रत आणि वातावरण यांचा सुंदर मिलाप!

माझ्या संग्रहात त्या कल्पनेशी संबंधित असे दोन सुंदर दिवे आहेत. ‘आवळीभोजना’चा उल्लेख पूर्वीच्या मराठी साहित्यात आढळतो. चिं.वि. जोशी यांच्या चिमणराव-गुंड्याभाऊ यांच्या एका गोष्टीत तो आहे. आवळीभोजन आणि वनभोजन म्हणजे विद्यमान ट्रेकिंग, हायकिंग, पिकनिक यांच्या पूर्वप्रथा म्हणायला हरकत नाही. आवळीभोजनाचा कार्यक्रम कार्तिक महिन्याच्या अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत केला जात असे. मंडळी भाजून तयार केलेले खाद्यपदार्थ सोबत घेऊन, आवळ्याच्या झाडाखाली जमत असत. भगवान विष्णूची आणि आवळ्याची पूजा करून मग गप्पाटप्पा, हास्य- विनोद, बैठे खेळ, उखाण्यांतून कोडी घालणे अशा तत्कालीन शिष्टसंमत प्रकारांनी मनोरंजन केले जात असे. त्यात लहान मुलांचा सहभाग नसायचा. महिलांमध्ये हे आवळीभोजन अधिक लोकप्रिय होते. धार्मिक महिलांच्या कार्यक्रमात मंगळागौरीमध्ये खेळले जात तसे विविध खेळ, बैठे खेळ, नवऱ्याचे नाव घेणे-गाणी म्हणणे असे कार्यक्रम होत असत. खास आवळी भोजनासासाठी रचलेली गीतेही आहेत. नंतर सहभोजन हा महत्त्वाचा भाग असे. पण आवळीभोजन हा महिला आणि पुरुष यांचा एकत्रित कार्यक्रम मात्र होत नसे.

_avala_pujanखरे तर, आवळ्याच्या झाडाखाली फारशी सावली मिळत नाही. तरीही त्या झाडाखाली भोजनाचा कार्यक्रम करण्यामागे आरोग्यासंबंधित पार्श्वभूमी आहे. पित्त होणे, दृष्टी सुधारणे, कांती निरोगी राहणे, केस गळणे-पिकणे याला प्रतिबंध, हृदयक्रिया नीट ठेवणे, कोलेस्टेरॉल नियंत्रण, मधुमेह नियंत्रण, इन्फेक्शन प्रतिबंध अशा अनेक गोष्टींसाठी आवळा हा गुणकारी, त्या हंगामात सहज उपलब्ध आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्तिक अष्टमीनंतरच्या पूर्ण वाढ झालेल्या/पिकलेल्या आवळ्यामध्ये सर्वात जास्त सी व्हिटॅमिनचा ( ascorbic acid ) साठा आढळतो. आवळे हे वंध्यत्व दूर करण्यासाठी  गुणकारी ठरतात असे आयुर्वेद मानतो.

- मकरंद करंदीकर 9969497742
makarandsk@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.