मराठवाड्यातील पुरातन - श्री सिंदुरात्मक गणेश


sinduratmak_ganeshसिंधुरासुराचे मंदिर शेंदुरवादा या गावी (तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) आहे. सिंधुरासुराचा वध व गणेशाचे स्वतःचे वाहन मूषक/उंदीर यास दिलेली मुक्ती या दोन प्रमुख पौराणिक घटनांचा संदर्भ शेंदूरवादा या गावाशी आहे. सिंधुरासुराच्या वधाची कथा गणेश पुराणाच्या उत्तरार्धात क्रीडाखंडामध्ये अध्याय 127 ते 138 दरम्यान आहे. शंकरांनी ब्रह्मदेवाला झोपेतून उठवले. तेव्हा ब्रह्मदेवाने रागाने दिलेल्या जांभईतून एक पुरुष निर्माण झाला. त्याचे पूर्ण अंग शेंदरी रंगाचे होते. त्याने स्वतःसाठी नाव, स्थान व कार्य द्यावे अशी मागणी ब्रह्मदेवांना केली तेव्हा ब्रह्मदेवांनी ‘तू ज्याला रागाने मिठी मारशील तो तत्काळ मृत्यू पावेल’ असा वर त्याला दिला. त्याने त्या वराचा खरेखोटेपणा पाहण्यासाठी थेट ब्रह्मदेवाकडेच धाव घेतली. ब्रह्मदेवाने संतापून ‘तू दैत्य होशील’ असा शाप त्याला दिला, म्हणून त्याचे नाव सिंधुरासुर असे पडले. ब्रह्मदेव अशी शापवाणी उच्चारून वैकुंठात विष्णूकडे गेले. त्यांच्या मागोमाग उन्मत्त झालेला सिंधुरासुरही वैकुंठात दाखल झाला. त्याने खुद्द विष्णूंना युद्ध करण्याचे आव्हान दिले. तेव्हा विष्णूंनी त्याला शंकराकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याने कैलासाला गेल्यावर ध्यानस्थ बसलेल्या शंकराला पाहून त्याच्याशी काय युद्ध करावे असा विचार केला. पण दरम्यान, त्याच्या नजरेस पार्वती पडली. त्याने पार्वतीवर मोहित होऊन तिला पळवून नेले. शंकरांना त्यांचे ध्यान संपताच घडलेली घटना समजली. शंकरांनी सिंधुरासुराला गाठले.

इकडे पार्वतीने गणेशाचे स्मरण करताच तो ब्राह्मणरूपाने तेथे आला. गणेश पुढे होऊन त्याला म्हणाले, “तुमच्या भांडणात त्या स्त्रीचे हाल कशाला करता? तुम्ही तिला माझ्यापाशी ठेवा आणि युद्ध करा. ती ज्याचा जय होईल त्याला मिळेल.” सिंधुरासुराने ते मान्य केले व शंकराशी युद्ध आरंभले. युद्ध लांबले, तेव्हा तो ब्राह्मण सिंधुरासुराला म्हणाला, “तुला या त्रैलोक्य नायकाला पराभूत करणे कदापीही शक्य नाही, तरी तू घरी जा.” ते ऐकून सिंधुरासुर भूलोकी निघून गेला. त्यावेळी गणेशाने पार्वतीला सांगितले, की “मी द्वापरयुगात तुझ्यापोटी येऊन सिंधुरासुराचा अंत करेन.” सिंधुरासुराने भूलोकातही सर्वाना त्रास दिला. तेव्हा सर्व देव तपश्चर्येस बसले. गणेश प्रसन्न झाले व त्यांनी ते पार्वतीच्या पोटी अवतार घेत असल्याचे त्यांना सांगितले. पुढे पार्वती गर्भवती राहिली व गणेशाचा जन्म झाला. गणेशाने वरेण्य राजालाही ‘मी तुझा पुत्र होईन’ असा वर दिलेला असल्यामुळे गणेशाने शंकरास सांगितले, की ‘मला नुकत्याच प्रसूत झालेल्या त्याच्या पत्नीकडे नेऊन ठेवा.’ शंकराने ते कार्य त्याचे वाहन नंदीकडे सोपवले. वरेण्य राजाची पत्नी पुष्पिका महिष्मती नगरीत प्रसूत होताच तिचा पुत्र कोण्या राक्षसाने पळवला. नंदीने गुणेशास त्या जागी नेऊन ठेवले.

वरेण्य राजा व पुष्पिका राणी चतुर्मुखी, रक्तवर्णी, गजमुखी बालकास पाहून भ्याले. त्यांनी त्या बालकास वनात नेऊन सोडले. पराशर ऋषींनी त्या बालकाचा सांभाळ वनात केला. कालांतराने, वरेण्य राजास गुणेशाच्या खऱ्या स्वरूपाची वार्ता कळली व तो हर्षित झाला. गजानन पराशर ऋषींचा आशीर्वाद घेऊन निघाला. तो घृष्णेश्वराजवळ नऊ वर्षांनंतर आला. त्या जवळ सिंदूरवाड नावाचे एक स्थान होते. त्याच ठिकाणी सिंधुरासुराची राजधानी होती. गजाननाने सिंधुरासुरास तेथे जाऊन युद्धाचे आव्हान दिले. दोघांचे बोलणे झाल्यानंतर, गजाननाने विश्वरूप प्रकट करून, सिंधुरासुराचा गळा दोन्ही हातांनी दाबून त्याचा प्राण घेतला. गजाननाचे शरीर सिंधुरासुराच्या रक्ताने माखले गेले, त्यामुळे गजाननास ‘सिंदूरवदन’, ‘सिंदूरप्रिय’, ‘सिंदुरान्तक’ अशी नावे मिळाली. सर्व देवांनी हर्षोल्हासित होऊन, जयजयकार करून त्याची स्तुती केली.

ते मंदिर खाम नदीच्या तीरावर आहे. नदी पूर्वी दुथडी भरून वाहत असे. आता, ती सदोदित कोरडी ठाक असते. मंदिर साध्या स्वरूपातील अष्टकोनी असून त्याला आठ दरवाजे आहेत. मंदिराला आठ दरवाज्यांची केलेली व्यवस्था पाहता मंदिर नदीच्या पुराच्या तडाख्यातही न सापडता सुरक्षित राहवे, अशी योजना दिसून येते. बाहेर डाव्या बाजूस भागीरथी कुंड व समोर दीपमाळ आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस एका दरवाज्यावर शिलालेख कोरला असून त्यावर ‘श्री गजानन चरणी सरभोजराज विश्वंभर शके 1706 क्रोधी नाम’ अशी नोंद आहे. त्याचा अर्थ मंदिराची निर्मिती अथवा जीर्णोद्धार इसवी सन 1785  मध्ये झाला असावा.

मंदिरातील श्रींची मूर्ती सहा फूटांहून उंच, महाकाय अशी डाव्या सोंडेची, सिंदुरचर्चित, दक्षिणाभिमुख आहे. गणेश सिंधुरासुराला गाडून त्यावरच बसलेले आहेत. त्या मूर्तीच्या डाव्या अंगास आणखी एक मूर्ती कोरलेली आहे. स्थानिक त्याची पूजा म्हसोबा म्हणून करतात. पण, जाणकार त्यास सिंधुरासुराची प्रतिमा म्हणून ओळखतात. त्या मूर्तीस केवळ चांदीचे डोळे आहेत, म्हणून ती वेगळेपणामुळे सिंधुरासुराची मूर्ती ओळखून येते. _mandir त्यास बऱ्याच वेळेस सामिष नैवेद्य दाखवलेले आढळून आले आहे.

श्री गणेशाची मूर्ती सहा फुटांहून जास्त उंच असल्यामुळे दैनंदिन नित्योपचारासाठी बैठकीच्या खाली दर्शनी बाजूस पूजेची छोटी मूर्ती आहे. तेथील गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य असे, की त्या ठिकाणी गणेशासमोर इतर ठिकाणी आढळणारा मूषक नाही. उत्सवमूर्तीची पूजा-अर्चा, नित्योपचार तेथील जोशी परिवाराकडून दररोज केले जातात. तेथे नैमित्तिक उत्सव म्हणजे दर संकष्टीस, अंगारकीस गणेशास सोवळे नेसवून सालंकृत पूजा केली जाते. तेथे त्या दिवशी स्थानिक ब्रह्मवृंद सहस्रावर्तने करतात. भाविकांकडून दिवसभर साबुदाणा खिचडीचे व चंद्रोदयानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते. मंदिराच्या समोर प्रसिद्ध संतकवी मध्वमुनीश्वर यांचा मठ असून, तेथेच त्यांची समाधी आहे. तसेच, त्यांच्या मुलाची व इतर दोन शिष्यांच्याही समाधी आहेत.

शेजारी जहागीरदार परिवाराची पुरातन वास्तू असून त्याच्या दगडी भिंती सुमारे वीस फूट उंचीच्या आहेत. तेथील गणेशमूर्तीसमोर मूषक नाही याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता एक पौराणिक आख्यायिका समोर आली. ती अशी, सौभरी नावाचे एक तपस्वी ऋषी होते. त्यांना मनोमयी नावाची सुस्वरूप, सुंदर अशी पत्नी होती. देवही सौभरी ऋषींच्या दर्शनार्थ येत असत. एकदा क्रौंच नामक एक दुष्ट गंधर्व सौभरी ऋषींच्या आश्रमात आला. त्या वेळेस सौभरी ऋषी समिधा आणण्यासाठी जंगलात गेले होते. क्रौंचाने कामातुर होऊन एकट्या असलेल्या मनोमयीचा हात धरला. ती त्यामुळे भीतीने रडू लागली. इतक्यात सौभरी ऋषी जंगलातून परत आले आणि त्यांनी त्या गंधर्वाला ‘तू मूषक होशील’ असा शाप दिला. परंतु नंतर त्यांनी कृपाळू होऊन उ:शापही दिला, की जेव्हा द्वापरयुगात पराशरमुनींच्या आश्रमात गजानन अवतार घेतील, तेव्हा तू त्यांचे वाहन होशील व तुझा उद्धार होईल. त्या पौराणिक कथेप्रमाणे शेंदुरवादा येथे सिंदुरात्मक अवतारानंतर क्रौंच गंधर्वाचा उद्धार झाला. म्हणून त्या मंदिरानंतर स्थापन झालेल्या गणेशमूर्तीसोबत मुषक आहे. येथे मात्र मूषक नाही. 
ते मंदिर औरंगाबादपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंदुरवादा या गावी आहे. औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक येथून शेंदुरवादा येथे जाण्यासाठी सकाळी आठ वाजता तसेच, दुपारी चार वाजता सावखेडा ही बस उपलब्ध आहे. औरंगाबाद - नगर रोडवर दहेगाव बंगला फाट्यावरूनही शेंदुरवादापर्यंत ऑटो उपलब्ध आहेत. औरंगाबाद -पैठण रोडवरून बिडकीनपासून शेंदूरवादा सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे.

- चिन्मय शेवडीकर 9890119605
chinmayshewdikar@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.