उग्रतारा चामुंडा देवी


chamundaचामुंडा हे देवीचे क्रूर रूप होय. ते सर्व भारतभर मान्य आहे. चामुंडेच्या त्या रूपात अमंगल, बीभत्स व भयानक यांचे जणू काही संमेलन आहे. कारण त्या देवीची उत्पत्ती कौशिकी देवीच्या भृकुटीपासून संहारकार्य करण्याकरता झालेली आहे. ती देवी हडकुळी, उभे केस असलेली, लोंबणाऱ्या कोरड्या स्तनांची, अट्टहास करणारी, जीभ बाहेर काढलेली, नरमुंण्डांच्या माळा-हाडांचे दागिने घालणारी, अंगावर साप आणि पोटावर विंचू बाळगणारी, वाघाचे कातडे नेसणारी, स्मशानात पिंपळाखाली राहणारी अशी दाखवतात. तिच्या वाहनाचे कार्य घुबड किंवा गाढव यांना दिलेले आहे. तिच्या ध्वजावर गिधाड असते. ती तिच्या डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना किंवा दोन्ही हातांनी स्वतःचे तोंड पसरताना बहुतेक दिसते. चामुंडेचे ते सर्वसामान्य स्वरूप आहे. पण प्रत्येक प्रतिमेत तशी सर्वच लक्षणे मिळत मात्र नाहीत.

चामुंडेचे काही विशेष प्रकारही आहेत. ते असे -

1. केरसुणी घेतलेली चामुंडा, 2. नवग्रह घेतलेली चामुंडा, 3. डोक्यावर शव घेतलेली चामुंडा, 4. स्मशान वासिनी चामुंडा

‘चामुंडा देवी’ची थोडक्यात माहिती काही ग्रंथांत नमूद आहे. त्यांपैकी एक म्हणजे ‘काश्यपशिल्पम्. ‘काश्यपशिल्पम्’ या संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुभव आहे. त्या ग्रंथात चामुंडा देवीचे काही संस्कृत श्लोकांमधून मूर्ती कशी असावी आणि तिचे प्राकृत स्वरूप कसे असावे याबद्दलची माहिती दिली आहे. ती अशी-

दशर्भुजा त्रिनेत्राच रक्तवर्षा(र्णो)र्ध्वकेशिनी |
कपालशूलहस्ता च वरदाभयपाणिनी ||
शिरोमालापरिता च पद्मपीठोपरि स्थिता |
व्याघ्रचर्माम्बरधरा नागच्छादितत्सनी ||
दंष्ट्राकरालवदना वटवृक्षसमाश्रिता |
चामुण्डालक्षणं ह्वेव मेकबेरं च तद्भवेत ||
दक्षपादस्थिताः सर्वा वामपादं तु लम्बितम् |
एवं वै सप्तमातृणां लक्षणं कथितं मया ||

त्याचा भावार्थ असा, की दहा हात, तीन डोळे व तांबड्या रंगाची, वर नेलेले केस असलेली, कपाल व शूल धारण केलेली, वरद व अभय (मुद्रेत) हात असलेली, (नर) मुंण्डांची माळा धारण करून पद्मपीठावर बसलेली, वाघाचे कातडे वस्त्र म्हणून नेसलेली, स्तनभाग नागेंद्राने आच्छादलेली, दाढा मोठ्या व बाहेर आलेली, भयंकर चेहऱ्याची, वडाच्या झाडासमीप असलेली अशी चामुंडेची लक्षणे आहेत. तिचा पाय उजवा मुडपलेला (घडी घातलेला) व डावा (खाली) लांबवलेला असे असतात.

‘कथासरीतसागर’ या ग्रंथामध्ये चंडिका देवी ही मुख्य धारणा असून त्यानंतर इतर देवींचा उल्लेख आहे.

नमस्ते चण्डि चामुण्डे मण्डले त्रिपुरे जये |
एकानंशे शिवे दुर्गे नारायणि सरस्वति ||
भाद्रकालि महालक्ष्मि सिध्दे रुरुविदारिणि |
त्वं गायत्री महाराज्ञी रेवती विन्ध्यवासिनी ||
उमा कात्यायनी च त्वं शर्वपर्वतवासिनी |
इत्यादिभिर्नामभिस्त्वां देवि ||

टी. ए. गोपीनाथराव यांनी अखंड भारत भ्रमण करून त्याची योग्य ती टिपणे काढून त्या त्या मूर्तींची परिपूर्ण माहिती देणारे Elements Of Hindu Iconography हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी चामुंडेबद्दल काही _chamunda_deviमाहिती नमूद केलेली आहे, ती अशी -

चामुंडेला तीन डोळे आहेत. तिची जीभ लाल रंगाची आहे. तिचे केस मुबलक आणि दाट आहेत. ते वरील दिशेने चमकतात. त्या देवीचे पोट रिकामे (भुकेली) आहे हे स्पष्टपणे जाणवते. तिचे वस्त्र वाघाच्या कातडीचे आहे. तिचे डोळे खोलगट, म्हणजे आत गेलेले आहेत. तिला दहा हात आहेत. तिच्या एका हातात ‘कपाला’ आणि दुसर्‍या हातात ‘सुला’ आहे. तसेच, दुसर्‍या हातांना अनुक्रमे ‘वरदा’ आणि ‘अभय’ या मुद्रा आहेत. इतर हातांत मुसाला, कवचा, बाण, अंकुश, खडग, पासा, धनुस, दांडा आणि परशु अशा वस्तू आहेत. अशी तिची मूर्ती पाहणाऱ्याला खूप विचलित करते. तिने कानात शंखापासून (शंखपत्र किंवा कुंडला) बनवलेले ‘कुंडलस’ परिधान केले आहेत.

एन.एन. भट्टाचार्यलिखित ‘इंडियन मदर गॉडेस’ या ग्रंथातसुद्धा चामुंडेची माहिती नमूद केलेली आहे. मध्ययुगीन काळात शक्तिपूजा इतकी पराकोटीला गेलेली दिसते, की त्याकाळी काही वेळेस शक्तिपूजेत बळीप्रथामध्ये शाक्तपंथीय म्हणवणारे स्वतः त्यांचे नरमुंड शक्तीला अर्पण करायचे. नंतर नरबळी न देता पशुबळी दिला जाण्याची प्रथा आली.

-चंद्रशेखर पिलाणे 98215 20775 
 chandrashekharp45@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.