वैनगंगा नदी

Think Maharashtra 18/06/2019

-headingवैनगंगा नदीचा उगम मध्यप्रदेशात झाला असला तरी नदीला अनन्यसाधारण महत्त्व महाराष्ट्राच्या विदर्भ भागात आहे. नदीचा उगम मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यात मैकल पर्वतराजींमध्ये झाला आहे. नदीचे उगमस्थान समुद्रसपाटीपासून सहाशेचाळीस मीटरवर आहे. ती मध्यप्रदेशातील शिवनी व बालाघाट या दोन जिल्ह्यांतून प्रवास करून विदर्भात उतरते. ती महाराष्ट्राच्या भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतून प्रवास करून आंध्रप्रदेशात गोदावरी नदीला जाऊन मिळते. त्याआधी तिला वर्धा नदी मिळते व तेथे तिचे नाव बदलते. ते ‘प्राणहिता’ नदी असे बनते.

वैनगंगा नदीला उपनद्या अंधारी, कथनी, कन्हान, गाढवी, गायमुख, खोब्रागडी, पोटफोडी, बोदलकसा, वाघ व बावनथडी या आहेत. मध्यप्रदेशात त्या नदीपरिसरात घनदाट जंगल आहे. सुपीक जमिनीची मैदानेही काही ठिकाणी आहेत. नदीच्या तीरावर ग्रॅनाइट दगडाच्या खाणीपण आहेत. माणसे व माल यांची वाहतूक त्या नदीतून मोठ्या प्रमाणावर होते. सरकारचा मानस वाहतूक वाढवण्यासाठी ‘नॅशनल वॉटरवेज प्रोजेक्ट’च्या माध्यमातून भंडारा येथे मोठे वॉटर पोर्ट बांधण्याचा आहे.

रॉबर्ट किपलिंगची ‘जंगल बुक’ म्हणून कादंबरी आहे, ती याच नदीच्या पार्श्वभूमीवर लिहिण्यात आली आहे. मोगलीचे पात्र याच नदी परिसरात खेळले, बागडले व जगप्रसिद्ध झाले. विदर्भातील प्रसिद्ध व वादात अडकलेले गोसीखुर्द धरण बांधण्याचे काम त्याच नदीवर चालू आहे. भीमगढ नावाचे एक मोठे धरण या नदीवर सिवनी जिल्ह्यातही बांधले गेले आहे. नदी खोऱ्यात जेवढ्या नद्या वाहतात त्यांच्यावर एकशेएकोणपन्नास धरणे बांधण्यात आली आहेत. नदी जेव्हा मध्यप्रदेशात वाहते तेव्हा त्या परिसरात चौदाशे ते सोळाशे मिलिमीटर पाऊस पडतो, पण ती जेव्हा महाराष्ट्रात उतरते तेव्हा मात्र पर्जन्यमान कमी होऊन ते नऊशे ते बाराशे मिलिमीटर पर्यंत खाली येते.

नदीची लांबी पाचशेएकोणसत्तर किलोमीटर असून नदीच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ एकावन्न हजार चौरस किलोमीटर आहे. खोऱ्यात मध्यप्रदेशचे तीन जिल्हे आणि महाराष्ट्राचे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. नदीवर सिवनी, बालाघाट व भंडारा ही शहरे वसलेली आहेत. महाराष्ट्रात जी जंगलव्याप्त जमीन आहे त्याच्या पन्नास टक्के जमीन त्या नदीच्या खोऱ्यात आहे. धरणे बांधून सिंचनविकास करण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणचे जंगलांचे नियम मोठे अडथळे ठरत आहेत. त्यामुळे त्या नदीकाठावरील जैवविविधता आणि वन्यप्राणी यांच्यासाठी तेथील विकास धोकादाक ठरणार आहे अशी भूमिका पर्यावरणवादी घेतात.

हे ही लेख वाचा- 
‘मुठाई’ नदीला संजीवनी
कयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला

नदीच्या तीरावर दोन मोठे नॅशनल पार्क आहेत. त्यांपैकी एक मध्यप्रदेशात (पेंच नॅशनल पार्क) आणि दुसरा महाराष्ट्रात (ताडोबा नॅशनल पार्क) वसले आहेत. त्या ठिकाणी वाघ, हत्ती आणि इतर जंगली प्राणी मोठ्या संख्येने आढळतात. मध्य भारतात कान्हा, पेंच, सातपुडा, मेळघाट, नवेगाव, नागझीरा, बोर आणि ताडोबा हा जो सोळा हजार चौरस किलोमीटरचा पट्टा आहे तो त्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. प्रदेश घनदाट जंगली असल्यामुळे त्या परिसरात बैगा, माडिया, कोलम, मारिया आणि गोंड या आदिवासी लोकांची वस्ती तेथे आढळते.

महाराष्ट्र सरकार या खोऱ्यात आणखी दोनशेसत्तावन्न प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. पण सध्या जे प्रकल्प उभारण्यात आले त्यांच्या समस्याच अजून पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. त्यांच्यात कार्यवाहीच्या त्रुटी व आर्थिक अनियमितता मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. योग्य नियोजनाचा अभाव, हलक्या दर्ज्याचे काम, विस्थापितांचे न सुटलेले प्रश्न, वितरणीकांचा - लघु कालवे - अभाव, जंगलखात्याकडून परवानगी न घेता करण्यात आलेली कामे अशा गंभीर त्रुटी आढळतात. काही प्रकल्प तर तीस-चाळीस वर्षांपासून हाती घेतलेले असून ते अजूनही पूर्ण झालेले नाहीत. वैनगंगा नदीच्या एका उपनदीवर बावनथडी येथे 1975 पासून चालू असलेले धरणाचे काम अर्धवट आहे. पंचवीस कोटी रुपयांचा तो प्रकल्प आज एक हजार चारशेचार कोटी रुपयांवर जाऊन पोचला आहे. त्यामुळे दोन हजार दोनशेचौऱ्याण्णव कुटुंबे विस्थापित झालेली आहेत. त्या कामांमुळे वन्य प्राण्यांच्या मोकळेपणी हिंडण्यावर बरीच बंधने आलेली आहेत.

‘केळकर समिती’ महाराष्ट्राचा विकास कसा व्हावा याचा विचार करण्यासाठी 2013 साली स्थापण्यात आली होती. तिने मात्र जंगल कायदा हा त्या भागाच्या विकासासाठी मारक ठरत आहे असा शेरा मारला आहे.

गोदावरी जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर पडून आंध्रप्रदेशात प्रवेश करते तेव्हा प्राणहिता नदी तिला मिळते. त्या नदीचे खोरे अतिपाण्याचे खोरे असल्यामुळे महाराष्ट्रातून आलेली गरीब गोदावरी एकदम श्रीमंत बनते. नदीचे पाणी सरळ बंगालच्या उपसागरात विसर्जित होई. पण आता, तिला चाप बसत आहे. कारण ते पाणी आता आंध्रप्रदेशात वळवण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरी व कृष्णा यांचा जोडकालवा ते पाणी आंध्रप्रदेशाच्या शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवून देणार आहे.
 (जलसंवाद मे २०१९ वरून उद्धृत संपादित-संस्करीत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.