‘मुठाई’ नदीला संजीवनी

Think Maharashtra 17/06/2019

-muthainadila-headingपुण्याचे निसर्ग स्थल-भूषण असलेल्या मुळा-मुठा नद्या दूषण झाल्या आहेत! त्यामुळे अस्वस्थ होऊन काही मंडळी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निग्रहाने एकत्र आली आहेत. शैलजा देशपांडे यांनी तो संकल्प त्यांचा मानला आहे आणि ‘जीवित नदी संस्थे’ची पालखी त्यांच्या खांद्यावर घेतली!

शैलजा यांच्या सोबत आहेत अदिती, कीर्ती, शीतल, प्रिया, मोनाली, मंजूषा, मनीष, धर्मराज आणि निरंजन. निरंजन यांची भूमिका खास उल्लेखली पाहिजे, कारण त्यांनी त्याच्या मुलाला त्याच्या पहिल्या वाढदिवशी वचन दिले, की तू जेव्हा दहा वर्षांचा होशील तेव्हा तू या बाजूच्या नदीत पोहशील! निरंजन तेथे थांबला नाही. त्याने त्याच्या इष्टमित्रांना इमेल केले आणि त्या सर्वांना मुठा नदी काठाच्या पक्षी अभयारण्यात बोलावून घेतले. ते सर्वजण पर्यावरणाशी संबंधित होते; पुण्याच्या प्रकाश गोळे यांच्या प्रसिद्ध इकॉलॉजिकल सोसायटीशी जवळून-दुरून संबंधित होते. ती बैठक त्या दिवशी अपुरीच राहिली. परंतु मंडळी मग दर मंगळवारी भेटू लागली. तोच तो विषय बोलू लागली. शैलजा सांगतात, की सगळ्यांचा एक गुण होता, की सगळ्यांना नदीबद्दल प्रेम होते आणि सगळे ‘अस्वस्थ आत्मे’ होते! नदीविषयीची माहिती वेगवेगळ्या मार्गांनी गोळा होऊ लागली. इकॉलॉजिकल सोसायटीतील जुना डेटा बाहेर आला. त्यावर विचारविनिमय होत राहिला आणि त्यातून कार्यक्रम ठरला, की लोकांना प्रथम नदीपर्यंत आणले पाहिजे आणि पहिला मुठाई महोत्सव 2015 साली 28 नोव्हेंबरला योजण्यात आला. तो भारतीय नदी दिवस असतो. शैलजा यांच्या साथीदारांपैकी प्रत्येकाचा कशा ना कशामध्ये अनुभव, अभ्यास आहे. प्रत्येकाचा त्याच्या/तिच्या कुवतीप्रमाणे प्रत्यक्ष कामात सहभाग असतो, पण त्या सगळ्यांना कोठेतरी जोडणारे, समन्वय करणारे जे सूत्र हवे होते ते झाले ‘शैलजा’. आणि त्या सर्वांना मिळून कार्यक्रमाच्या रूपाने पक्के उद्दिष्टही सापडले! शैलजा सांगते, त्या सर्वांच्या कोशात ‘जमेल तेवढे’ हा शब्द नाही; कितीही आणि कोणतेही काम करण्याची त्यांची तयारी असते. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याची त्यांची सवय बनून गेली आहे.

मुख्य म्हणजे त्यांच्याकडे पर्यावरणीय दृष्टिकोन आहे - नदी ही एक स्वतंत्र स्वायत्त निसर्गप्रणाली आहे, ती जाणून घेणे नदिसुधार योजनेसाठी गरजेचे आणि माणसाच्या हिताचेही आहे. पुण्याच्या शासकीय ‘नदिसुधार योजने’त तो दृष्टिकोन नाही. शैलजा सांगतात, की सरकारी योजना प्रेताला शृंगार केल्याप्रमाणे आहे. प्रथम नदी जिवंत झाली पाहिजे, मग तिच्या भोवतीची सजावट करावी हे ठीक नाही का? पण सरकार नदीकाठ, सभोवताल स्वच्छ करून, प्रेक्षणीय बनवण्याचे बेत आखते. म्हणजे लोकांनी तेथे फक्त फिरण्यास यावे. पण प्रत्यक्षात नदी हा लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या भावविश्वाचा भाग असतो. सरकारी दृष्टिकोन पर्यावरणपूरक कसा करता येईल याची योजना ‘जीवित नदी’ संस्थेकडे आहे. त्यांनी लोकांचा नदीशी असलेला संबंध तुटला आहे, गरज आहे लोकांना प्रथम नदीशी जोडण्याची हे लक्षात घेऊन, मुठाई महोत्सवापाठोपाठ विविध उपक्रम आयोजित केले - नदीविषयी पोस्टरचे प्रदर्शन, नदिकिनारी स्वच्छता मोहीम, नदीकाठी बसून चित्रे काढण्याचा उपक्रम इत्यादी. ‘दत्तक घेऊया नदिकिनारा’ हाही उपक्रम ‘जीवित नदी’ने लोक-सहभागातून हाती घेतला आहे.

-rever-feri‘रिव्हर-वॉक’- नदीकाठी फेरफटका हा उपक्रम तर फार महत्त्वाचा ठरला आहे. दीड तासाच्या नदीकाठच्या प्रभात फेरीत लोकांना नदीच्या जन्मापासून तिचा इतिहास, भूगोल, तिच्या काठाचा निसर्ग, तिच्या किनाऱ्याचे महत्त्व सांगून प्रदूषणामुळे तिची गटारगंगा कशी झाली आहे आणि त्या प्रदूषणात लोकांचाच वाटा कसा आहे याची जाणीव करून दिली जाते, माणसांनी जीवनशैली बदलली तर ते घराघरांमधून नदीत होणारे सत्तर टक्के प्रदूषण कमी करू शकतात. ती माहिती सर्वसामान्यांना उद्बोधक वाटते. माणूसच नदीच्या दुरवस्थेला जबाबदार आहे याचा आता विचार करू लागली आहेत. शैलजा म्हणाल्या, की विठ्ठलवाडी, ओंकारेश्वर, राजपूत वीटभट्टी या परिसरातील नदीकिनारे स्थानिक लोकांनी दत्तक घेतले आहेत. तेथील शाळा व त्यांची मुलेही त्या कामात गुंतली गेली आहेत. निर्माल्य नदीत टाकले जाते त्याचाही नदी प्रदूषणात मोठा वाटा आहे. शैलजा मुळा नदीच्या काठी असलेल्या औंधच्या विठ्ठल मंदिराबाहेर निर्माल्यासाठी खत प्रकल्प करण्यात यशस्वी झाल्या आहेत. कोणाच्याही धार्मिक भावना त्यातून दुखावल्या गेलेल्या नाहीत!

शैलजा यांचे मूळ शिक्षण बालमानसशास्त्र या विषयात झाले आहे, परंतु त्यांनी गरजेनुरूप अभियांत्रिकीमधील वास्तु सजावट पदविकादेखील मिळवलेली आहे, कारण त्यांच्या पतिराजांचा, व्यवसाय बांधकाम उद्योग हा होता व त्या त्यांच्या व्यवसायात मदत करत होत्या. त्यांनी इंटिरियर डेकोरेशनचीही कामे केली आहेत. त्यांनी फील्ड बॉटनी व अॅडव्हान्स बॉटनी हे अभ्यासक्रम केले आहेत. पुण्याचे शेती प्रदर्शन हे जागतिक कीर्तीचे झाले आहे. शैलजा त्या प्रदर्शनाच्या संचालक मंडळावर आहेत.

शैलजा व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत: मुठा नीट जाणून घेतली आहे. मुठेचा उगम पुण्यापासून उत्तरेला पंचेचाळीस किलोमीटर दूर वेगरे गावाजवळ होतो. गावाजवळ पाच बंधाऱ्यांनी पाणी अडवले गेले आहे. नदी प्रदूषित होते ती शहरात आल्यावर. तेथे नदीवर संस्कार होणे महत्त्वाचे आहे. मुठा पुण्यामध्ये मुळा नदीला मिळते पुढे रांजणगाव सांडस  येथे भीमा या नदीस मिळते.  

-shailaja-deshpandeशैलजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रमोद मोघे यांच्याकडून मानवी जीवनशैली विषयुक्त कशी आहे हे जाणून घेतले. घरगुती वापरातील प्रसाधने- टुथपेस्ट, साबण, शांपू, डिटर्जंट आणि घर, कपडे, भांडी-फरशी-संडास-मोरी इत्यादी स्वच्छ करण्यासाठी कृत्रिम रसायनयुक्त ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या सांडपाण्यातून नाल्यात व मग नदीत जातात. एक व्यक्ती तीस ते चाळीस ग्रॅम विविध रसायने सरासरीने रोज वापरते. पुण्याची लोकसंख्या पन्नास लाख धरली तर दोन लाख किलो रसायने रोज नदीमध्ये प्रक्रियेशिवाय जाऊन मिळतात. नदीचे पाणी निसर्गचक्रामध्ये शुद्ध होते हे खरे, पण त्यासाठी नदीत वाहते पाणी हवे आणि नदी जिवंत हवी; म्हणजे तिच्यात प्राणवायू पुरेशा प्रमाणात हवा! ती प्राणवायू अभावी मृतप्राय झाली आहे. मुठा नदीतील प्रदूषणामुळे तिच्यात प्राणवायू पुरेसा नाही. महत्त्वाचे म्हणजे मानवनिर्मित विषद्रव्ये नदीत शुद्ध होत नाहीत. ती तशीच राहतात आणि एक दुष्टचक्र निर्माण होते. पाण्यातील घटक रसायने पिकांमध्ये शोषली जातात आणि ती मनुष्यप्राण्याच्या अन्नसाखळीत प्रवेश करतात. त्यामुळे मनुष्यांनाच नव्हे तर सर्व जीवसृष्टीला हानी पोचते. कर्करोगासारखे रोग, पोटाचे-त्वचेचे विकार, हृदयविकार, लठ्ठपणा, ग्रंथीविकार, स्त्री-पुरुषांमधील वंध्यत्व अशा व्याधी त्यातून संभवतात.

ते दुष्टचक्र भेदावे कसे? तर मानवी जीवनशैली बदलून फक्त ते शक्य आहे. घरातून बाहेर जाणाऱ्या पाण्यात विषद्रव्ये, रसायने सोडली नाहीत तर माणूस नदी स्वच्छ ठेवण्यास घरापासूनच मदत सुरू करू शकतो. जैव, विघटनशील, विषद्रव्यविरहित, पूर्वापार चालत आलेली घरगुती उत्पादने वापरणे हे त्याचे उत्तर. मानवी हिताचे आणि नदीसाठीही हितकारक. शैलजा आणि त्यांच्या चमूने पर्यावरणपूरक घरगुती वापराचा एक संच- कीट- तयार केला आहे. शैलजा यांच्या टीमने निसर्गाला हानिकारक असलेले पदार्थ वापरू नका, असे सुचवले होते. त्यावर लोक सांगून ऐकत नाहीत. लोकांना नुसते हे पदार्थ वापरू नका, हानिकारक आहेत, इतकेच सांगून उपयोग होत नाही. त्यांना त्याला साधे सोपे आणि खिशाला परवडणारे पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतात. त्यामुळे त्यांनी एक घरगुती वापराचा संच/कीट तयार केला. संचात शॅम्पूऐवजी – शिकेकाई/रीठा, टूथपेस्टऐवजी – दंतमंजन-राख-त्रिफळा चूर्ण-मीठ, फरशी पुसण्यासाठी व्हिनेगर असे अनेक पदार्थ सुचवले आहेत. ते लोक पूर्वी संच तयार करून देत. तो त्यांचा प्रकल्प मात्र सध्या बंद आहे. परंतु ‘सस्टेनेबल इनेशिएटिव्ह’ या प्रकल्पाद्वारे त्या वस्तू पुण्याच्या कर्वेनगर भागात उपलब्ध करून दिल्या जातात.

-shailaja-jeevitnadi-groupशैलजा यांचा आणखी एक लढा सुरू आहे. रामनदी मुळा नदीला औंध येथे मिळते. ते ठिकाण पुण्यापासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे. त्यालगत दोन नद्यांच्या संगमामधील भूभाग म्हणजे सुपीक मातीचा ‘दोआब’ प्रदेश निसर्गत: तयार झाला आहे. वृक्षांची दाटी तेथे आहे; हवा आल्हाददायक थंड असते, पण तेथेही मानवी आक्रमण झाले आहे. नवीन बांधकामांचा राडारोडा मोठ्या प्रमाणाबाहेर तेथे टाकून दिला गेल्यामुळे तेथील पाण्याचे स्रोत बुजून गेले आहेत. पालिकेच्या विकास योजनेत तेथे रस्ता आणि काही इमारती बांधकामाचे नियोजन आहे. शैलजा यांना निसर्गाचा तो सुंदर ‘दोआब’ स्थानिक रहिवाशांच्या मदतीने वाचवणे आहे. त्यासाठी मोहीम आखली जात आहे.

जीवित नदी फाऊंडेशन – 7350000385, 9325382401
लेखाचा मूळ स्रोत- उष:प्रभा पागे 
लेखाचा विकास – ‘थिंक महाराष्ट्र’ समूह

 

हे ही लेख वाचा- 
कयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला
वर्धा नदीखोऱ्यातील गावे कोळसा खाणींनी उध्वस्त!

लेखी अभिप्राय

नमस्ते, आमची एक उल्हासनदी स्वच्छता अभियान अशी टीम आहे. तीन महिन्यांपासून आम्ही आमचा रोज एक तास देऊन एका मर्यादित क्षेत्रापुरते नदी किनारा स्वच्छतेचे काम करतो. आमच्यासाठी हा लेख एक पथदर्शक आहे. पुणे येथे येत्या पंधरा दिवसांत येण्याचा विचार आहे तेव्हा भेटू. धन्यवाद.

मुकुंद भागवत 18/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.