मी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर

प्रतिनिधी 28/05/2019

-heading‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आदिती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग.

अदिती : मी तुमच्या वाचकांच्या मनात असणारे प्रश्न घेऊन आलेली आहे. मी तुमच्या वाचकांचे प्रतिनिधित्व करणार आहे. तुम्ही एक डॉक्टर आहात. तुम्हाला साहित्य-संगीतकला-नाटक-चित्रपट अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस आहे आणि जाणही आहे. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील अनुभव घेऊन इतके खुमासदार आणि छान लिहिण्यास तुम्हाला नेमके सुचते कसे?

डॉ. सुलभा : माणसाला आलेले अनुभव, मनात आलेले विचार इतरांना सांगावेसे वाटणे, ही त्याची नैसर्गिक उर्मी असते. त्यातूनच लेखन घडते. स्वत: लिहिलेले खूप लोकांनी वाचावे, त्यांना ते आवडावे, इतकेच नाही तर त्यांना त्यातून नवीन काहीतरी मिळावे, असे वाटते आणि म्हणून लेखन आकर्षक, रंजक, रसपूर्ण  करण्याची धडपड असते. लेखन नेमके सुचते कसे हे सांगणे अवघड आहे. एखाद्या डोंगरावर कित्येक महिने-वर्षे पाऊस पडत असतो, तो जिरत असतो. वर काहीच दिसत नाही; पण पाणी मुरत असते. साठत असते. त्याला वाट केव्हातरी त्या डोंगराच्या तळाशी कोठेतरी मिळते. झरा झुळूझुळू वाहू लागतो. वाटते, अरे, हे एवढे पाणी आले कोठून? खरे तर, ते पाणी वर्षानुवर्षे साठलेल्या पावसाचे असते. तसेच, माणूस कळू लागल्यापासून अनुभव घेत असतो, आसपास घडणाऱ्या गोष्टींना रिअॅक्ट असतो, ते सारे मनात साठत असते, आणि तेच त्याच्या/तिच्या लिखाणाच्या रूपाने बाहेर येते. 

अदिती : ‘जगताना आणि जगवताना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुंदर आणि समर्पक आहे. जगणे आणि जगवणे हे एकमेकांत खूप छान मिसळले गेले आहे. या पुस्तकाच्या जन्माबद्दल काय सांगाल?

सुलभा : नेहमीच्या जगण्यात असे कितीतरी प्रसंग येतात, की जे त्याला काहीतरी शिकवून जातात, तोपर्यंत त्याने/तिने उराशी बाळगलेल्या कल्पनांना, विचारांना छेद देऊन जातात; आणि म्हणूनच कायमचे लक्षातही राहतात. तसे प्रसंग मी डॉक्टर असल्यामुळे माझ्या आयुष्यात खूप जास्त आले. ते तीस वर्षांत हळूहळू साठत गेले. लिहावे अशा गोष्टी खूप होत्या; पण त्यांची रचना कशी करावी, हे ठरवताना मात्र माझी त्रेधातिरपीट उडाली. कालक्रमानुसार लिहिणे माझ्या मनाला पटेना. कारण मला फक्त गोष्टी सांगायच्या नव्हत्या. त्या निमित्ताने मानवी भावविश्वाचा पट उलगडायचा होता. माणसातील माणूस शोधता शोधता स्वत:चाही शोध घ्यायचा होता. मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळत होती; तीही तपासून पाहायची होती. मग एकेक मानवी भावना - वात्सल्य, सहकार्य, विश्वास - घेऊन, त्याभोवती त्या भावनेच्या वेगवेगळ्या छटा दाखवणाऱ्या गोष्टी विणत गेले. त्या अनुषंगाने येणारे विचारही मोकळेपणाने मांडले. भूमिका कथनाची ठेवली आणि शैली संवादाची ठेवली. त्यातून जे निर्माण झाले, ते हे पुस्तक.

अदिती : ही कलाकृती खूपच छान झाली आहे! एखाद्या कलाकाराला त्याच्या चित्रपटाच्या किंवा नाटकाच्या बाहेर ’हाउसफुल्ल’चा बोर्ड लागला, की कृतकृत्य वाटते. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशनापासून सहा महिन्यांत निघाली, मग तुम्हाला कसे वाटत आहे? या यशाचे गमक काय सांगाल?

सुलभा : त्याचे श्रेय ‘राजहंस’ प्रकाशनालाही आहे. ‘राजहंस’चे पुस्तक म्हणून विकत घेणारा एक वाचकवर्ग आहे. राजहंसची निवड नेमकी असते, मांडणी सुबक असते, वितरण सुनियोजित असते. मुख्य म्हणजे ते वेळेचे महत्त्व जाणतात. अर्थात त्या यशात माझ्या लेखनाचा वाटाही आहे. प्रसिध्द दिग्दर्शक रतन थिय्याम म्हणतात, “जेव्हा माझ्या नाटकाचा नायक मागील पडद्याकडे बोट करून म्हणतो, ‘तो पाहा चंद्र’, तेव्हा तेथे काहीही नसते. पण नाट्यगृहात बसलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा त्याचा चंद्र तेथे दिसतो. तो त्याच्या मनात दडलेला असतो. मी प्रेक्षकांना त्यांच्या मनात दडलेला चंद्र दाखवण्यासाठी नाटक करतो.’’ तेच माझ्या लिखाणाच्या बाबतीतही म्हणता येईल. मी वाचकांच्या मनात काही प्रतिमा निर्माण करते, काही नाटुकली घडवते. वाचकाला अनेक घटना, अनेक प्रसंग, अनेक माणसे वाचताना त्यांच्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या मनात साठून राहिलेल्या भावनांना वाट मोकळी मिळते. लेखनात वाचक जेव्हा त्याला स्वत:ला पाहतो, त्याच्या आवर घातलेल्या भावनांना कढ येतो; तेव्हाच ते लेखन खऱ्या अर्थाने पूर्ण होते. आम्ही लिहितो, प्रकाशक छापतात, पण पुस्तकाला खरे अस्तित्व वाचकाच्या मनात मिळते. अनेक वाचकांनी त्यांच्या मनात या पुस्तकाला जागा दिली आणि म्हणूनच सहा महिन्यांत दुसरी आवृत्ती काढता आली!

अदिती : तुमच्या पुस्तकाची शैली चित्रदर्शी आहे. वाचकाला तुमची पुस्तके वाचताना एखादा चित्रपट पाहत आहोत, किंवा खरे तर त्या घटना घडत असताना वाचकाला तोच तेथे उपस्थित आहे, असे वाटत जाते. या पुस्तकात चाळीस वर्षांपासूनच्या घटना, गोष्टी आहेत. सगळे लक्षात कसे राहिले? नोंदी ठेवल्या, डायरी लिहिली म्हणावे, तर ते तसे वाटत नाही. कारण त्या नुसत्या रुक्ष नोंदी वाटत नाहीत. मग सगळे लक्षात कसे बरे ठेवले?

सुलभा : नाही, मी कधीच नोंदी ठेवल्या नाहीत आणि मला माहीत तरी कोठे होते, की मी ते सारे लिहीन म्हणून! स्वप्नातसुध्दा नव्हते, की मी ते लिहीन! मी प्रवासवर्णन लिहिले, तेव्हाही वाचक विचारायचे, पंचवीस वर्षांपूर्वीच्या प्रवासाचे वर्णन केले, तर नोंदी तर ठेवल्याच असतील ना म्हणून. नाही. मी कधीच, कशाचीही नोंद ठेवलेली नाही. ज्या घटना किंवा माणसे किंवा गोष्टी खोलवर ठसा उमटवून जातात, त्या लक्षात राहतातच; लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. ती सगळी Deep impressions आहेत. ती तशीच्या तशी बाहेर येतात.

अदिती : तुमच्या लेखनावर परीक्षणे छापून आलेली आहेत - अगदी तिन्ही पुस्तकांवर. ‘गोफ जन्मांतरीचे’ असेल किंवा ‘बंद खिडकीबाहेर’ किंवा ‘जगताना आणि जगवताना’ असेल. तुमच्या शैलीचे आम्हा सगळ्यांना कौतुक काटते. तुमचे लिखाण शब्दबंबाळ नसते. साधे, सहज आणि अनलंकृत असते. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

सुलभा : मी लेखनशास्त्र शिकलेली नाही. प्रथम अगदी सहज, एका ऊर्मीतून लिहिले. ते प्रसिध्द लेखक श्रीनिवास कुलकर्णी यांना दाखवले. त्यांनी ते मौज दिवाळी अंकासाठी घेतले आणि एकदा मला अचानक श्री. पु. भागवत यांचा फोन आला, “तुम्ही आता इतर काही वाचू नका!’’ म्हणून. मी थोडी सटपटलेच! ते पुढे म्हणाले, “तुमची नैसर्गिक शैली फार वेगळी आहे. आल्हाददायक आहे. लेखक वाचतो, तेव्हा इतर लेखकांच्या शैलीचा लेखकाच्या लेखनशैलीवर परिणाम होतो.’’ म्हणून त्यांनी वाचू नका असे म्हटले. नंतरही इतरांनी मला माझ्या शैलीबदल सांगितले, तेव्हा मी त्या दृष्टीने माझे लेखन पाहू लागले.

-dr.-jagtanaअदिती : म्हणजे ती शैली नैसर्गिक आहे? त्यासाठी खास काही प्रयत्न केले नाहीत?

सुलभा : असे नाही, प्रयत्नही आहेतच. प्रत्येक कलाकारात दोन व्यक्ती असतात. एक कवी आणि दुसरा कारागीर. कवी जन्मजात असतो, पण कारागीर मात्र घडवावा लागतो. मी सिध्दहस्त लेखिका नाही. मी एकेक लेख फायनल करण्याआधी तो तीन-चार वेळा लिहून सुधारणा करत जाते. मी आशय आणि अभिव्यक्ती दोन्ही महत्त्वाची मानते. लेखन प्रवाही होण्यासाठी खूप कष्ट घेतले. वाचकांना माझे पुस्तक आवडावे, त्यांनी ते वाचताना बंद करू नये, यासाठी खूप धडपडते.

अदिती : मगाशी म्हटले तसे तुमची शैली चित्रदर्शी आहे. वाचक एखादा चित्रपट पाहतोय, असेच त्याला वाटते. त्याबद्दल काय सांगाल?

सुलभा : हो. ती नैसर्गिक देणगी म्हणावी लागेल. माझी Memory Photographic आहे. मला आवडलेला एखादा सिनेमा असेल, तो अगदी खूप पूर्वी बघितलेला असेल, तरीही मला तो अगदी फ्रेम बाय फ्रेम आठवतो. खरे तर मला जे आठवते, ते मी  माझ्या लिखाणामध्ये तसेच लिहिते आणि वाचकांपर्यंत पोचवते.

अदिती : चित्रपट नाटकांमध्ये ‘आर्टिस्टिक पॉझ’ नावाचा एक प्रकार असतो. अनेकदा, खूप बोलण्यापेक्षा तो पॉझच खूप काही सांगून जातो. तुमच्या लेखनातही तो ‘आर्टिस्टिक पॉझ’ जाणवतो. उदाहरणार्थ, तुम्ही कॉलरा झालेल्या एका बाळाच्या आईबद्दल लिहिलेले आहे. त्यात तुम्ही लिहिता, की ती बाई आणि मी मिनिटभर एकमेकींकडे बघत उभ्या राहिलो! त्या ठिकाणी वाचकही मिनिटभर स्तब्ध होतो आणि तुम्हाला काय म्हणायचे आहे, ते वाचकाला अगदी तंतोतंत कळते. तुम्ही ‘आर्टिस्टिक पॉझ’बद्दल काय सांगाल?

सुलभा : हो, हा आर्टिस्टिक पॉझ संगीतात असतो, नाटकात असतो, लिखाणातही असतो. गाण्याचे उदाहरण घेते. काही गायक फार छान गातात. त्यांची तयारी खूप असते. लय-ताल जमलेला असतो, स्वरांची कारंजी उसळत
असतात, पण ते गाणे ऐकताना श्रोत्यांना उसंतच मिळत नाही, त्यामुळे त्याचा व्हावा तेवढा परिणाम होत नाही. त्याउलट कुमार गंधर्वांचे गाणे ऐकावे. ते तान घेतात आणि नेमक्या अशा ठिकाणी सोडतात, की पुढील तान श्रोत्यांच्या मनात पूर्ण होते, आणि तीही कुमारांनी दाखवलेल्या मार्गाने. त्यामुळे श्रोता गानप्रक्रियेत सहभागी होतो. गाणे अधिक परिणामकारक होते. महेश एलकुंचवार यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, “आधी जे ऐकले, पाहिले किंवा वाचले त्याची रससिद्धी; आणि आता पुढे जे येऊ घातलेय, त्याची अधीर उत्कंठा यांचे मिश्रण या आर्टिस्टिक पॉझमध्ये अनुभवता येते आणि त्यामुळे ते संगीत, नाटक, लिखाण जास्त परिणामकारक होते.’’ मला खरे तर माझ्या अनेक वाचकांनी हे सांगितले, की तुमच्या लिखाणात हा आर्टिस्टिक पॉझ जाणवतो. तोपर्यंत मला हे कळले नव्हते!

अदिती : तुमच्यासारख्या साहित्य, संगीत, कला, लेखन एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये आवड आणि जाण असणाऱ्या व्यक्तीला डॉक्टर व्हावे, असे का वाटले? त्यातही बालरोगतज्ज्ञ व्हावे, असे का वाटले?

सुलभा : मी काही ठरवून किंवा आवड म्हणून डॉक्टर वाटत नाही. आमच्या घरात कोणी डॉक्टर नव्हते. डॉक्टरांचे आयुष्य कसे असते, ते मला माहीतही नव्हते. किंबहुना, मला ते ठरवण्याची मुभा आहे, चॉईस आहे, हेही
कळले नव्हते. तसे माझे आयुष्य प्रवाहपतितासारखे गेले. पहिल्यापासून मार्क चांगले पडत गेले, स्कॉलरशिप्स मिळत गेल्या. चांगले मार्क मिळाल्यावर मेडिकलला जायचे असते, अशी तेव्हा पध्दत होती, म्हणून मी गेले असेन. पोस्टग्रॅज्युएशनसाठी माझ्यासमोर ऑप्शन्स होते, त्यातील बालरोगतज्ज्ञ हा ऑप्शन आवडला आणि म्हणून मी तो घेतला.

अदिती : बोलताही न येणाऱ्या मुलांना काय होत आहे, हे कसे समजते? पालकांच्या सांगण्याची काही मदत होते का? की कधी कधी, त्याच्यामुळे त्रासच होतो?

सुलभा : बाळांची देहबोली, त्यांचा चेहरा इतका पारदर्शक असतो की त्यांना काय होत आहे ते साधारण समजते. आजार गंभीर आहे का, तेही समजते. अगदी नवीन जन्मलेले बाळ दुपट्यात गुंडाळून ठेवलेले असेल, तर फक्त दुपटे काढायचे. बाळ छान अंगडाई देते. ओळखायचे, ते छान आहे. बाळ रडते, तेव्हा त्याच्या रडण्याच्या क्वालिटीवरून कळते, की ते का रडत आहे. ते चड्डी ओली झाली तर वेगळे रडते, आई हवी तर वेगळे रडते, काही दुखत असेल तर अजूनच वेगळे. कोठे दुखत असेल तर ते कोठे? हेही शोधावे लागते. ते कसे शोधायचे, हे आम्ही शिकलेले असतो. रोजचा राउण्ड घेतानासुद्धा, बाळ कालच्यापेक्षा आज बरे आहे का, ते बाळ स्वतः पालकांपेक्षा जास्त चांगले सांगते. मी तर म्हणेन, लॅबोरेटरीपेक्षाही जास्त चांगले सांगते. न्युमोनियाचे बाळ असेल, एवस-रे कालच्यापेक्षा वाईट आलेला असेल, लॅब रिपोर्ट कालच्यापेक्षा वाईट असतील, तरीपण बाळ काल हसत नव्हते आणि आज हसत असेल, तर ते बरे होतेय असे समजावे. शब्दांची फारशी गरज नसते. कधीकधी तर त्यांची अडचणच होते!

-gof-janmanatrichaअदिती : लहानांची तपासणी आणि मोठ्यांची तपासणी यांत कोणता फरक जाणवतो?

सुलभा : लहान मुले बऱ्याचदा परक्या माणसाला अंगाला हात लावू देत नाहीत, त्यामुळे त्यांना आई-बाबांच्या कडेवर असतानाच तपासावे लागते. तपासण्याला मर्यादा येतात. अनेकदा फुफ्फुसांची, हृदयाची तपासणी नीट करता येत नाही. ती
सारखी रडत असतील, तर तपासणी करणे अवघड जाते. त्यांना सलाइन लावणे, दिवसभर ते टिकवणे, म्हणजे आमची परीक्षाच असते. प्रोसिजर्स करतानाही अनेक अडचणी येतात. पाठीतून पाणी काढताना, दोन छोट्या-छोट्या मणक्यांमधून नेमक्या काढता येत नाही. शारीरिक बळाचा वापर करण्यालाही मर्यादा येतात. तरीही बहुतेक वेळा जमून जाते. साधे बाळाला औषध पाजणेसुद्धा किती अवघड असते! बालरोगतज्ज्ञ आणि त्याचे सहकारी यांचा पेशन्स हळुहळू वाढत जातो. एक मात्र फायदा आहे, निसर्ग आमच्या मदतीला असतो. मोठ्यांचे डॉक्टर निसर्गाविरूध्द पोहत असतात, तर आम्ही प्रवाहाबरोबर पोहत असतो.

अदिती : प्रॅक्टिसमध्ये अनुभवलेली आजारांची असाध्यता, मृत्यू यांतून आलेल्या नैराश्याचा, दु:खाचा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो का?

सुलभा : नैराश्य, दु:ख यांचा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतोच. काही काळ नैराश्य, दु:ख यांचा सामना करावा लागतो. पण काही काळानंतर ते नाहीसे होते. तो एक प्रकारचा ‘Professional Hazard’ आहे, अटळ आहे. पण त्या दु:खाची, निराशेची सावली कुटुंबावर पडू नये; म्हणूनच खूप विचार करून,  घर आणि हॉस्पिटल आम्ही लांब-लांब बांधले. अर्थात, त्याची किंमतही खूप दिली, पण ’घर’ सर्वार्थानी ’घर’ राहिले.

अदिती : तुम्ही डॉक्टर लोक मोठे आजार, मृत्यू यांना सरावलेले असता. मग ‘आजार’ म्हणजे ‘शरीरातील बिघाड’, ‘मृत्यू’ म्हणजे ‘सगळं थांबतं’; इतक्या अलिप्तपणे सगळ्या गोष्टींकडे पाहता येते का?

सुलभा : थोडेफार पाहता येते. मृत्यू खूप ओळखीचा होतो. जेव्हा कृतार्थ आयुष्य जगून, वार्धक्यामुळे किंवा असाध्य आजारामुळे मृत्यू होतो, तेव्हा आपण तो स्वीकारतो. कारण असा मृत्यू हा दु:खाचा शेवट असतो. पण अकालमृत्यू नेहमीच 
दु:ख देऊन जातो. काही काळ स्मशाननैराश्य येते. पण मृत्यू तसा सवयीचा झाला आहे. त्याची भीती वाटत नाही.

अदिती : अज्ञानात सुख असते, म्हणतात. डॉक्टर म्हणून असलेल्या ज्ञानाचा कधी त्रास झाला आहे का? अज्ञान बरे, असे वाटले आहे का?

सुलभा : अज्ञानात सुख असते...? असेलही कदाचित. पण ज्ञानात शांती आहे, समाधान आहे. ज्ञानमार्ग हाच माझा मार्ग आहे. पण खरेच, अज्ञानात सुख असते का? काही गोष्टी भारतात लहानपणापासूनच चुकीच्या शिकवल्या आहोत, असे मला वाटते. ‘शेवटी सत्याचा विजय होतो’, ‘अज्ञानात सुख असते’, हे चूक आहे. अज्ञान हे सर्वात मोठे पाप आहे आणि त्याची शिक्षा माणसाला याच जन्मात भोगावी लागते, असे माझे मत आहे.

अदिती : परानुभूती (Empathy) आणि अलिप्तता यांतील समतोल कसा साधता? एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत कशा जाता?

सुलभा : हा खरे तर मला कोंडीत पकडणारा प्रश्न आहे. चांगल्या डॉक्टरने परानुभूती आणि अलिप्तता यांत समतोल राखला पाहिजे, हे खरे आहे. पण मला राखता आलेला नाही. मृत्यू मला फार हलवत नाही; पण दु:ख, यातना हलवून टाकतात आणि फक्त बाळाचेच दु:ख नाही, तर त्याच्या आई-वडलांचे, आजी-आजोबांचे दु:खही अनुभवावे लागते. त्यामुळे कोणताही पेशंट स्थिर होईपर्यंत मला चैन नसते. हे सगळे माझ्या घरच्यांना, नवऱ्याला, मुलांनाही जाणवायचे. आमच्या व्यवसायात घरात आले, की घर आणि हॉस्पिटलमध्ये असताना हॉस्पिटल असे ‘स्विच ऑन’, ‘स्विच ऑफ’ करावे लागते, पण मला ते जमले नाही.

अदिती : अर्थसाक्षरता, संगणकसाक्षरता यांसारख्या ‘शरीरसाक्षरता’, ‘औषधसाक्षरता’ याही महत्त्वाच्या आहेत. त्याबद्दल काय सांगाल.

सुलभा : बरोबर आहे. आजच्या काळात हे महत्त्वाचे आहे आणि सहज शक्यही आहे. खरे सांगायचे, तर नव्वद टक्के आजार आपोआप बरे होतात. थोडा धीर धरण्याची तयारी हवी आणि थोडीफार प्राथमिक माहितीही करून घ्यायला हवी.
म्हणजे उदाहरणार्थ, ताप हा आजार नव्हे; तर आजाराचे लक्षण आहे. त्यासाठी तात्पुरते औषध कोणते घ्यायचे, वाट किती दिवस पाहायची, डॉक्टरांकडे कधी जायचे? इन्फेक्शन जंतूंमुळे होतात किंवा विषाणूंमुळे होतात. त्यात डॉक्टरसुध्दा लगेच फरक सांगू शकत नाहीत. विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांवर अॅन्टिबायोटिक्सचा उपयोग होत नाही किंवा थोडा धीर धरला, तर ते आजार आपोआप बरे होतात. टायफॉईडची टेस्ट सात दिवसांनंतर करायची असते. अशा कितीतरी साध्या साध्या गोष्टी आहेत; त्या शाळेत शिकवल्या जायला हव्यात, पेपरमध्ये छापून यायला हव्यात, रेडिओवर-टीव्हीवर सांगितल्या जायला हव्यात. त्यामुळे डॉक्टरांवरील अवलंबित्व कमी होईल. लोकांचा त्रास, खर्च, मनस्ताप कमी होईल.

-khidkibaaherअदिती : डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधील नात्याबद्दल काय सांगाल?

सुलभा : डॉक्टर -पेशंट नात्यात खूप दुरावा निर्माण झाला आहे. पण एक लक्षात ठेवले पाहिजे, की हे नाते नुसते कायदे करून सुधारणार नाही. डॉक्टरांना जितके कायद्याच्या कचाट्यात पकडण्यास जाल; तितके ते अस्त्र बूमरँगसारखे फिरून
सामान्यजनांचे नुकसान करत राहील. डॉक्टरांचे पेशंटशिवाय चालणार नाही आणि पेशंटचे डॉक्टरशिवाय चालणार नाही. मग त्या नात्यात पडलेली दरी वेळीच बुजवू या. नाहीतर ती दुरूस्त होण्यापलीकडे वाढत जाईल. त्यासाठी काय काय करता येईल, ते मी पुस्तकात सविस्तर लिहिले आहेच.

अदिती : तुम्ही व्यवसायातून निवृत्त झालात. मी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त होणारे फार कमी लोक पाहिले आहेत. त्यांतील तुम्ही एक. वैद्यकीय व्यवसायातून निवृत्ती घेताना मन सहज निवृत्त झाले का?

डॉ. सुलभा : मन सहज निवृत्त होत नाही. ज्या ठिकाणी माणसाचे मन हळूहळू गुंतत जाते आणि बराच काळ गुंतत राहते, त्या गोष्टीपासून स्वत:ला एकदम सोडवून घेणे सहज शक्य होत नाही; मग ते मुलांपासून सोडवून घेणे असो, नाहीतर संसारातून स्वत:ला सोडवून घेणे असो, नाहीतर व्यवसायातून निवृत्त होणे असो; तशा निवृत्तीसाठी साधना करावी लागते. निदान मला तरी ती करावी लागली. मी व्यवसाय सुरू केला  तेव्हाच ठरवले होते, की पंचवीस-तीस वर्षे व्यवसाय करायचा आणि निवृत्त व्हायचे. मी चैतन्य हॉस्पिटल सोळा वर्षांपूर्वी सुरू केले, तेव्हासुध्दा मी माझ्या बरोबरच्या इतर डॉक्टरांना याची पूर्ण कल्पना दिली होती आणि मी स्वत:लासुध्दा बजावत होते. पण त्याचा उपयोग झाला. त्यामुळे ’शेवटचा दिस गोड झाला.’

अदिती : तुम्ही पस्तीस वर्षांपूर्वी कराडला आलात; तेव्हा तुमचे आणि कराडचे काहीच नाते नव्हते. आज, इतक्या वर्षांनंतर त्या नात्याविषयी काय सांगाल?

सुलभा : आम्ही दोघे नवरा-बायको एक बॅग घेऊन कराडच्या एसटी स्टँडवर पस्तीस वर्षांपूर्वी उतरलो; तेव्हा आम्ही येथे उपरे होतो. कराड आम्हाला पूर्णपणे नवीन होते. आमची कोणाशीही ओळख नव्हती. लोक विचारायचे, “तुम्ही कोठून आलात? तुमचे गाव कोठले?’’ मला सांगता यायचे नाही! व्यवसायाला काहीशा अलिप्तपणे सुरुवात केली. हळूहळू येथील लोकांबरेाबर धागेदोरे जुळू लागले. नाती निर्माण झाली. आपलेपणा वाढू लागला. आपल्या लोकांसाठी काही करावेसे वाटू लागले. आम्ही दोघेही कलासक्त आहोत. येथे आल्यावर वर्षा-दोन वर्षांतच अजयने ‘अभिरुची’ ही संस्था स्थापन केली. अभिरुचीच्या बॅनरखाली आम्ही शास्त्रीय संगीताचे चाळीसएक कार्यक्रम केले. मालिनी राजूरकर, मंजिरी असनारे, मंजुषा, मुकुल शिवपुत्र अशा दिग्गज कलावंतांच्या काही मैफिली घरीही अॅरेंज केल्या. कराडमध्ये नाटक पाहायला मिळायचे नाही. तेव्हा वर्षाला सहा अशी सुमारे चाळीस व्यावसायिक नाटके तेथे आणली. आपल्या लोकांना येथील, परदेशातील उत्तमोत्तम, वेगळे सिनेमे पाहायला मिळावेत; म्हणून फिल्म क्लब चालवला आणि महिन्याला एक याप्रमाणे पाच-सहा वर्षे सिनेमे दाखवले. कराडच्या लोकांनी त्या सगळ्यालाच मनापासून दाद दिली. पस्तीस वर्षांत आमची मुळे रूजली; आम्ही कराडचे झालो आणि कराडनेही आम्हाला आपले मानले. मी तीन पुस्तके लिहिली. ‘कराड जिमखाना’ या संस्थेने आणि आनंद परांजपे यांच्या ‘चौफेर’ या संस्थेने त्या पुस्तकांचे प्रकाशन केले. माझे कौतुक केले. ‘आपल्या गावची लेखिका’ ही कौतुकाची भावनाच त्यामागे होती. हल्ली भाषणासाठी किंवा इतर कशाकशासाठी मी वेगवेगळ्या गावांना जाते. लोक विचारतात, “तुम्ही मूळ कोठच्या?’’ मी अभिमानाने सांगते, “मी कराडची.’’ मी व्यवसायातून निवृत्त झाले, तरी मला अजून खूप काही करायचे आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यापुढेही असेच मिळत राहतील, असा विश्वास आहे.

('राजहंस ग्रंथवेध' वरून उदृत, संपादित-संस्करीत)

लेखी अभिप्राय

मुलाखत ऊत्तम झााली. परिपूर्ण परिचय. सुलभाताई फार मनस्वी कलाकार स्री आहेत.

Anjana karnik31/05/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.