फ्लोरा फाउंटन मुंबई फोर्टचे वास्तुवैभव


-flora-fountainफ्लोरा फाउंटन या शिल्पाकृतीचे समाजमनातील स्थान दीडशे वर्षें कायम आहे. त्याचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण साठ वर्षांपूर्वी झाले. तरी तो चौक फ्लोरा फाउंटन या नावानेच ओळखला जातो. त्याची निर्मिती करण्यामागे धारणा काय होती? सत्ताधारी ब्रिटिश अधिकारी, त्यांची कुटुंबे आणि अन्य नागरिक त्यांच्या मायभूमीपासून हजारो मैल दूरवर वेगळ्या संस्कृतीच्या देशात वावरत होते. त्यांना त्यांच्या मातृभूमीची याद येणे स्वाभाविक होते. त्याच भावनेने मुंबईतील बऱ्याच वास्तू, शिल्पाकृती यांची निर्मिती मूळ ब्रिटिश वास्तूंच्या धर्तीवर झाली. फ्लोरा फाउंटनची निर्मिती इंग्लंडच्या प्रख्यात, सुशोभित ‘पिकॅडली सर्कस’च्या धर्तीवर असावी असे वाटते. त्यामुळे ब्रिटिश नागरिक आणि त्यांचे परिवार यांना ते विरंगुळ्याचे आकर्षक स्थळ ठरले.

ते आकर्षक शिल्प उभारण्यासाठी कर्सेटजी फर्दुमजी पारेख या माणसाने देणगी 1864 मध्ये उपलब्ध करून दिली. त्यानंतर ‘ऍग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या प्रख्यात वास्तू विशारद संस्थेने ते शिल्प उभारण्याचे आव्हान स्वीकारले. त्या शिल्पाकृतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नेत्रदीपक कारंज्यांची निर्मितीही झाली. ते कारंजे मुंबई नगरी वसवणारे कलाप्रेमी गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या स्मरणार्थ बांधले गेले. ते कारंजे म्हणजे जलव्यवस्थापनाबरोबर जलअभियांत्रिकी तंत्रज्ञानातील आश्चर्यच आहे. कारंजे आरंभीच्या काळात फ्रियर फाउंटन या नावाने ओळखले जाई.

शिल्पाकृती सुमारे पंचवीस फूट उंच आहे. तिच्या सर्वोच्च भागी ‘फ्लोरा’ ही पुष्पदेवता आहे. त्याच नावाने ते नंतर ‘फ्लोरा फाउंटन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ब्रिटिश वास्तुरचनाकार आर. नॉर्मन शॉ यांनी शिल्पाकृतीचा आराखडा तयार केला. त्याला साजेसा सौंदर्याचा चेहरा ‘जेम्स फर्सीद’ या कलाकाराने कल्पकतेने दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर, 1961 साली त्या शिल्पाकृतीशेजारी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांचे स्मारक उभारले गेले व त्या परिसराचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण करण्यात आले.

‘फ्लोरा फाउंटन’ शिल्पाची रया दीडशे वर्षांनंतर जात चालली होती. महापालिकेने त्याच्या देखभालीचे काम हाती घेऊन ते शिल्पवैभव जतन करण्याचा आव्हानात्मक प्रयत्न केला आहे. शिल्प इंग्लंडमधील ‘पोर्टलॅण्ड’ स्टोन या खास दगडातून साकारले आहे. त्यातील मूर्तींचे अवयव तुटल्याने ते केविलवाणे भासत होते, त्यांनी पूर्ववत करण्यासाठी पोर्टलॅण्ड स्टोनशी मिळताजुळता ‘पोरबंदर’ स्टोनचा वापर केला गेला आहे.

-flora-fountain‘फ्लोरा फाउंटन’च्या सभोवताली गोलाकृती स्वरूपाच्या जागी पर्यटक, प्रेक्षक यांना निवांतपणे बसणे आता शक्य होणार आहे. मूळ स्वरूप पुन्हा प्राप्त करून देणे हे वास्तुरचनाकारांना एक खडतर आव्हानच होते. तीन टप्प्यांतील या आकर्षक कलाकृतीतील दोन्ही बाजूंकडून सिंह आणि डॉल्फिन यांच्या शिल्पांतून सतत पाण्याचा सुखद वर्षाव होई. मात्र त्यात बिघाड होऊन 2007 पासून जलप्रवाह बंद झाला होता. तो प्रवाह पूर्ववत करण्यासाठी जल अभियंत्यांना बराच शोध घ्यावा लागला. दगडी बांधकामाच्या अंतर्गत लपवून ठेवलेल्या जलवाहिन्यांचा शोध घेण्यासच तीन महिने लागले. आता, ते आव्हानात्मक काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्वक वापर करून त्या शिल्पाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी मूळ रंगांचे थर हटवण्यासाठी उष्ण पाण्याचे फवारे मारावे लागले. तेथे खोदकाम करावे लागले तेव्हा मुंबईकरांची एकेकाळी जीवनवाहिनी असलेल्या ट्रामगाडीचे लोखंडी रूळ सापडले. ट्राम1964 साली बंद झाली. त्या अवशेषांचे ऐतिहासिक मोल ध्यानी घेऊन वारसा जतन विभागाने त्यांचा योग्य उपयोग करण्याचे योजले आहे.
दोन-अडीच शतकांचा ऐतिहासिक – सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मुंबई महानगरातील काही वारसा वास्तूंची वर्तमान स्थिती उपेक्षित, केविलवाणी आहे. ‘फ्लोरा फाउंटन’पासून त्यांचे संवर्धन करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. 

- अरुण मळेकर
arun.malekar10@gmail.com

मुंबईच्या वारसा वस्तू संशोधनात विशेष आस्था असलेले वास्तुशिल्पी चंद्रशेखर बुरांडे यांच्या मते मात्र 'फ्लोरा फाउंटन' आणि लंडनमधील 'पिकॅडली' यांचा वास्तुविशेष या अंगाने काहीही संबंध नाही. 
 

 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.