बुलडाणा येथील सैलानी : दशा आणि दिशा


सैलानी दर्गा बुलडाण्यात आहे. माझे सासर आणि माहेर, दोन्ही सैलानी दर्ग्याच्या दोन बाजूंला आहेत, परंतु बऱ्याच लांबवर. त्यामुळे मी लहानपणापासून सैलानी बाबांविषयी  अंधुकसे ऐकलेले. महिलांच्या अंगात येणे, महिलांच्या अंगातील वाईट भूत काढणे तेथे चालते वगैरे ऐकत होते. पुढे, माझ्या यजमानांच्या नोकरीच्या निमित्ताने तेथे राहत असताना, बरेच कळू लागले. तशातच आम्ही वाशीमला असताना बबिता सोमाणी नावाच्या तरुणीवर बलात्कार करून तिला मारून विहिरीत टाकून दिले, असे ऐकले. तो प्रकार सैलानीलाच घडला होता. बबिता सोमाणी प्रकरण महाराष्ट्रभर गाजले, किंबहुना त्यामुळे सैलानी दर्ग्याचे प्रकरण उजेडात आले. आम्ही बबिता सोमाणी यांच्या खुनाची चौकशी व्हावी यासाठी निषेध रॅली काढली.

आम्ही माझ्या पतीच्या निवृत्तीनंतर बुलडाण्यात आलो. सैलानीत 25/02/2011 रोजी झोपड्यांना आग लागली. तीत तीन मनोरुग्ण महिला भाजून मेल्या. सर्व जिल्हा हादरला. त्यावेळी आम्ही शहरातील काही प्रमुख व्यक्तींसह सैलानी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रायपूर हे दर्ग्या जवळचे छोटे गाव. तेथील पोलिस ठाणे सैलानी दर्ग्यापासून जवळ आहे. आम्ही त्यांनाही भेटलो. पुरुष प्रतिनिधी पुरुष रुग्णांमध्ये फिरले. भाविकांची अशी श्रद्धा आहे, की सैलानी बाबा हे एक मोठे संत होऊन गेले. ते मुस्लिम होते. कोणी म्हणतात, ते हिंदू होते. दर्ग्याचे विश्वस्त मात्र मुस्लिम आहेत. दोन्ही धर्मांचे झेंडे व भक्त तेथे दिसतात.

सैलानी बाबांचा दर्गा हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. तेथे जातिधर्माचा वाद नाही. लोक देशाच्या अनेक प्रांतांतून तेथे येत असतात. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश वगैरे भागांतून स्त्रीपुरुष येत असतात. विशेषत: मार्च महिन्यात पौर्णिमेला यात्रा असते. यात्रेच्या वेळी तुफान गर्दी होते. अंगात येणाऱ्या स्त्रिया, तरुण मुली व पुरूष, बरेच येतात. त्यांचे कुटुंबीय त्यांना उपचारासाठी घेऊन येत असतात. आम्ही चंद्रपूरला असताना शाम मानव यांच्या सल्ल्याने व सहकार्याने अंधश्रद्धा निर्मूलनावर बरीच शिबिरे घेतली. तेव्हा लक्षात असे आले, की सर्वात जास्त अंधश्रद्धा स्त्रियांमध्ये आहेत. पारंपरिक रुढी-परंपरा, मुलगा न होणे, एकामागोमाग एक मुलीच होणे, मूल न जगणे वगैरेंसाठी सैलानी बाबांच्या दर्शनाने उपाय होतो, गुण येतो, मुले होतात, अंगातील भूत जाते, बाबाचे पाणी घेतल्याने अनेक जुनी दुखणी बरी होतात असे सर्वसाधारण समज जनमानसात होते. तशा अंधश्रद्धेआड सर्व प्रकारचे गुन्हे लपवले जातात. गावातील राजकारणी आणि छोटे-मोठे गुंड त्यात सामील असतात. तसेच, सैलानी बाबा दर्गा या ठिकाणी घडत आहे.

मूळ दर्गा परिसराची जागा थोडी आहे. मनोरुग्ण तेथे छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. त्या वस्त्या अत्यंत गलिच्छ आहेत. तेथे संडास, पाणी, दवाखाना अशा कोणत्याही सोयी नाहीत. वनविभागाच्या हद्दीत हजारो झोपड्या आहेत, तेथे दर्गा विश्वस्त सदस्यांनी काही तकलादू झोपड्या मनोरुग्णांना भाड्याने देण्याकरता बांधल्या आहेत. विविध भागांतील विविध धर्मांचे लोक उपचारासाठी तेथे येत असतात. काही रुग्ण अनेक दिवस, अनेक महिने व अनेक वर्षेंही तेथे वास्तव्यास असतात. सैलानी बाबा स्वप्नात येऊन तेथून जाण्याचा दृष्टांत देत नाही, तोपर्यंत रुग्ण तेथेच राहतात. पुरुष रुग्णांपेक्षा स्त्री मनोरुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्ण गरीब-श्रीमंत, शिकलेले वा निरक्षरही असतात.

-fire-newsआगीची घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या काही महिलांनी दबक्या आवाजात सांगितले, की झोपडी पेटवून दिली गेली होती. ते ऐकून आम्हाला धक्काच बसला. ज्या झोपडीत कोंबडीसुद्धा नीट भाजली गेली नसती तेथे दोन/तीन महिला कशा जळून मेल्या? घटना धक्कादायक होती. रात्रीच्या वेळी, मनोरुग्णांच्या झोपड्यांमध्ये लाईट, पाण्याची व्यवस्था नसते. रात्रीच्या अंधारात, झोपड्यांमध्ये बरेच वाईट प्रकार घडतात, कधी परस्पर संमतीने तर कधी जोर-जबरदस्तीने. तेथे गुंडगिरीचे धंदे चालतात असे महिला दबक्या आवाजात बोलत होत्या. तेथे महिला अधिकारी असलेले पोलिस ठाणे नाही. रात्रीच्या वेळी काही धनाढ्य लोक त्यांच्या गाड्यांमध्ये तेथील महिलांना घेऊन जातात. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अनेक निवेदने दिली, मागण्या केल्या, पण उपयोग झाला नाही.
तेथील रुग्णांची परिस्थिती भीषण आहे. पुरुष व स्त्री रुग्णांना तेथे साखळ्यांनी अडकावून ठेवलेले असते. प्रत्यक्षात ते मनोरुग्ण असतात असेही नाही. ते परिस्थितीने गांजलेले असतात. त्यांना समुपदेशनाची आणि औषधोपचारांची, चांगल्या व पोटभर अन्नाची गरज असते. त्यामुळे त्या रुग्णांच्या पुनर्वसनाचा सकारात्मक विचार व्हायला हवा. वातावरणही पूर्णपणे बदलून सकारात्मक करण्यास हवे, पण तेथे तशी काही व्यवस्था नाही. मनोरुग्ण दिवसभर नुसते ‘सैल्या ऽ’, ‘सैल्या ऽ सोड’ म्हणत, विक्षिप्त हातवारे करत घुमत असतात. दमले की निपचित पडतात. त्यांना बाहेर कोठेही घेऊन जाण्याची गरज कोणालाच वाटत नाही.

स्किझोफ्रेनिक महिला रुग्णांना त्यांचे कुटुंबीयच तेथे आणून सोडतात. त्यामुळेही त्यांचे दुखणे वाढते. काहींना त्वचेचे रोग होतात, त्यावर उपचार होत नाहीत. रुग्ण गलिच्छ झोपडीत राहतात. सोबत लहान मुले-मुलीही असतात. त्यांच्यासाठी दवाखाना, शाळा, कशाचीच सोय नसते. मग सोबत आलेले लोक मनोरुग्ण नसले तरी मनोरुग्ण बनतात. स्त्रिया रोज दर्ग्यावर हजेरी लावतात - म्हणजे अंगात येऊन घुमतात. प्रत्यक्षात मात्र अंगात वगैरे काही आलेले नसते. रुग्ण येणाऱ्या भाविकांकडे भीक मागतात.

दर्गा परिसरात थोड्या अंतरावर रस्ता ओलांडून एका उंच टेकडीवर काही झोपड्या आहेत. तेथे एक विहीर आहे. तिला पूर्वी ‘झिरा’ असे म्हणत. तेथे आंघोळ केल्याने स्त्रियांच्या शारीरिक व्याधी नाहीशा होतात असा समज आहे. तेथेही रुग्णांची गर्दी असते. तेथे विहिरीचे गरम वा थंड पाणी विकले जाते. गरम पाण्यासाठी सभोवतालचे जंगल कापले जाते. व्यापारी दुकाने टाकून पाणीविक्रीचा धंदा तेजीत चालवतात.

कधी कधी, मनोरुग्ण असाध्य रोगांवर उपचारासाठी सरकारी दवाखान्यात येतात, पण ग्रामीण भागात सरकारी दवाखान्यात काळजीपूर्वक उपचार होत नाहीत. सैलानी परिसरात मनोरुग्णांसाठी दवाखाना व्हावा, सिनेमागृहे व्हावीत.

तेथे विश्वस्तांचा दरारा (दहशत) खूप जाणवतो. महिला व मुली यांच्या लैंगिक शोषणाचा तो अड्डाच आहे. दोन महिला जळल्यानंतर थोड्याच दिवसांत स्त्री मुक्ती संघटना, मुंबई येथून शारदा साठे बुलडाण्यात आल्या होत्या. आम्ही त्यांच्या कानावर ह्या सर्व बाबी टाकल्या. त्यांना सैलानी येथे प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती दाखवली. त्या लोकांच्या हातात बेड्या घातलेल्या पाहून व्यथित झाल्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष निर्मला सावंत- प्रभावळकर बुलडाण्यात आल्या होत्या. त्यांनाही त्याविषयी सविस्तर सांगितले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महिलांवरील त्या भयानक अत्याचारांची माहिती पत्रकारांना दिली.

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी धडाडीने लक्ष घालून आमच्या निवेदनावर कार्यवाही केली, वनखात्याला पत्र देऊन झोपड्या हटवल्या. अशी काही कामे मार्गी लागली असली तरी परिस्थिती जैसे थे आहे. पुन्हा 18/04/12 ला एका महिलेचा देह झाडाला लटकलेला आढळला. पुन्हा आंदोलने झाली. विविध ठिकाणांहून कार्यकर्त्यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. लक्षात आले, की झाड एवढे लहान होते, की त्याला गळफास लावून घेणेच शक्य नव्हते; म्हणजे त्या महिलेस जबरदस्तीने फाशी दिली गेली होती! पुन्हा वर्तमानपत्रांत बातम्या, सर्वांना निवेदने, कोर्ट-कचेऱ्या झाल्या. विश्वस्तांच्या विरूद्ध तर कधीपासून अनेक तक्रारी, गुन्हे उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. शिरसाट म्हणाले, की दर्गा खासगी जमिनीत आहे. दर्ग्याचे व्यवस्थापन विश्वस्तांकडे आहे. त्यामधून जो वाद निर्माण झाला तो कोर्टात आहे. कार्यकर्त्याचा त्याशी संबंध नाही. विश्वस्तांमध्ये एकही महिला नाही.

बोकड बळी देणे बंद केले असले तरी नवस फेडण्यासाठी ट्रक भरून नारळाची होळी केली जाते. प्रदूषण व अन्नधान्याची नासाडी, घाण, दुर्गंधी, गोंधळ, रोगराई, बोकड कापलेले रक्त सर्वत्र पसरलेले असते. अंगात येणाऱ्यांचे आवाज, वाद्यांचा गोंगाट तर भयंकर असतो. मिरवणुकीचे आजूबाजूच्या धाड, दुधा, रायपुर, पिंपळगाव  इत्यादी गावांवर वाईट परिणाम होत आहेत.

बुलडाणा जिल्हा ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे अध्यक्ष दत्तुभाऊ शिरसाट हे रायपूरलाच राहतात. ते म्हणाले, की सैलानीची यात्रा पंढरपूरनंतरची दुसऱ्या क्रमांकाची मानतात. लोक मुख्यत: मराठवाडा व कर्नाटक या प्रदेशातून येतात. आम्ही त्या यात्रेत जनजागरण करतो. अंधश्रद्धाविरोधी फलक मिरवतो, तसे प्रयोग करुन दाखवतो. खुद्द श्याम मानव म्हणाले, की आमचा आग्रह जादूटोणाविरोधी कायद्याचा अंमल व्हावा यासाठी आहे. शासनाने त्यानुसार सैलानीची चौकशी केली तर सारे पितळ उघडे पडेल.

- इंदुमती लहाने 9423144727 / 7499269568 ,Swatilahane1974@gmail.com

( मूळ स्त्रोत-‘प्रेरक ललकारी’)

लेखी अभिप्राय

Great... Awesome... लय भारी.

Moin kabra04/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.