मधू पाटील यांचे संस्कारशील आयुष्य


madhu-patil ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम.पी. तथा मधू पाटील यांनी त्यांच्या ‘खारजमिनीतील रोप’ या आत्मकथनाला असे वेगळे शीर्षक का दिले? खारजमिनीतील रोप छोटे, ठेंगणे! भात कणसाभोवती वाढणारे असते, ते रोप पाखरांशी मैत्रीसंबंध जोडते. पाखरांची गुणगुण ही त्या रोपाला आनंद देते. म्हणून त्यांनी त्यांचे आत्मकथन खार -जमिनीतील रोपाला अर्पण केले आहे. त्या मनोज्ञ अर्पणपत्रिकेवरून, मधू पाटील यांच्या संवेदनशील, सुसंस्कृत आणि तितक्याच हळव्या मनाची झलक कळते. ती जाणीव पुढे, पुस्तक वाचत असताना सातत्याने होते.

पाटील हे आगरी समाजाचे. त्यांच्या दृष्टीने ती जात मागासवर्गीय समाजापेक्षा थोडी वर असणारी. पाटील हे सर्वात लहान. त्यांचा जन्म होण्यापूर्वी शेजेवरून पिवळाधमक नाग गेला. त्यांच्या वडिलांना तो शुभशकुन वाटला. त्यांनी मुलाला भटाबामणांच्या मुलाप्रमाणे शिकवण्याचे ठरवले. मोठे कुटुंब. तीन एकर खारी जमीन. कष्टाचे जीवन. वरी-नाचणी-वांगी-मिरच्या-वाल-घेवडा-कलिंगडे यांचे उत्पन्न... आषाढ महिन्यात शेतीची कामे उरकल्यानंतर रामविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत अशा पोथ्यांचे वाचन होई. गावची मंडळी गोकुळ अष्टमीला येत. जेवणावळी उठत. मधू मोठा झाला तसा तो पोथी वाचनानंतर अर्थ सांगू लागला. त्याच्यावर त्या वयातच मराठी भाषेचे आणि मराठी संस्कृतीचे संस्कार झाले रूपही लोभस. वैशाख मासात गावात मारूती सप्ताह साजरा होई. त्यावेळी एकदा ‘गोकुळ चोर’ हे नाटक बसवण्यात आले. त्याच्या मोठ्या भावाने छोट्या मधूला कृष्णाची भूमिका करण्यास पुढे केले. त्यानंतर मधूने नायक-नायिकेच्या भूमिकेपर्यंत मजल मारली. गावातील भजनी मंडळातही मधूने अभंग गाण्याचा परिपाठ ठेवला. त्याचा आवाज गोड आणि त्यामुळे मधूचे कौतुक सर्वजण करत. नव्या युगात त्यांच्या त्या रम्य गावाचे रूपांतर कसे झाले आहे, त्याचेही वर्णन वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. गावात टीव्ही आले. भजन मंडळ - नाटक बंद झाले. खाड्यांतील मासे घरीदारी वाटणे थांबले. बैलगाड्या कालबाह्य झाल्या. मोटार सायकली, फोर व्हीलर धावत आहेत. सिमेंटकाँक्रिटची घरे, नळाचे पाणी, विजेचे दिवे आले. लग्नसमारंभांत बेंजो आला. बिअरच्या बाटल्या आल्या. चंगळवादी संस्कृतीची दाट छाया त्या भागावर पसरली आहे!

-madhu-patilमधू पाटील यांचे प्राथमिक शिक्षण खेड्यात झाले. मधू पाटील यांच्यावर संस्कार अविस्मरणीय झाले. त्यांचे अलिबाग येथील सागरी किनाऱ्याजवळ वसलेले गाव. तेथे ती शाळा,शाळकरी मुले... मधू ज्या घरात खोली घेऊन राहत होते ते सेवादलाचे घर! बेचाळीसच्या क्रांतीमध्ये त्याच घरातील स्वातंत्र्यसैनिक पकडले गेले! तेथेच विद्यार्थ्यांची बौद्धिके होत. स्वातंत्र्याचा संग्राम, हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक समता, अहिंसा, समाजवाद हे बौद्धिकांचे विषय. साने गुरुजी, वि.स. खांडेकर, बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या साहित्याचे वाचनमनन तेथे झाले. तेथेच, समाजवादी पक्षाचे नेते येत. एस.एम. जोशी, साने गुरुजी, रावसाहेब-अच्युतराव पटवर्धन, शिरुभाऊ-अनुताई लिमये येत. वसंत बापट, लीलाधर हेगडे यांचे कलापथक आणि त्या कलापथकाने सादर केलेले गीत ‘उठू दे देश, पेटू दे देश!’ ते गाणे ऐकून विद्यार्थ्यांच्या मनात समाजवाद, स्वातंत्र्य, त्यासाठी करण्याचा त्याग याचे संस्कार कोरले जात. मधू पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण त्या संस्कारांवर झाली. त्यामुळेच त्यांचे जीवन संपन्न झाले.

पाटील यांनी आत्मकथनामध्ये सर्व सविस्तर लिहून, जणूकाय आजची स्वार्थ, जातीयता, धर्मांधता यांनी पोखरलेली राजकीय व्यवस्था आणि स्वातंत्र्यलढ्याचा नेत्रदीपक काळ यांमधील विरोधाभासच अधोरेखित केला आहे.

-mukhprustha-त्याच संस्कारांनी प्रेरित होऊन मधू पाटील यांनी सरकारी खात्यात कारकून म्हणून नोकरी करत बी ए, एम ए, एम एड या पदव्या उच्च श्रेणीत संपादन केल्या. त्यांनी प्रथम हायस्कूल, नंतर बी एड महाविद्यालय, त्यानंतर कला-वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी समर्थपणे अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी सर्व संस्थांमध्ये त्यांच्या अध्यापनकौशल्याने विद्यार्थ्यांच्या मनात, अंत:करणात अढळ स्थान संपादन केले. त्यांनी त्यांच्या मधुर वाणी, त्यांचा साहित्याचा गाढा व्यासंग, त्यांच्यावर नामवंत साहित्यिक-कवी यांच्या साहित्याचे झालेले संस्कार, त्यांची विद्यार्थिवर्गावर त्यांच्या निरपेक्ष आत्मीयतेची शाल पसरून त्यांच्याशी अकृत्रिम रीतीने संवाद साधण्याची शैली या गुणांमुळे विद्यार्थिवर्गाचे प्रेम संपादन केले. ज्या प्राध्यापकाचे शिक्षणसंस्थेतून बाहेर पडल्यानंतरही विद्यार्थ्यांना कधीही विस्मरण होत नाही, तो प्राध्यापक आदर्श! पाटील यांनी त्यांना नेहमी येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची पत्रेही त्यांच्या लेखात उद्धृत केली आहेत. त्यांनी त्यांच्या पत्नी निर्वतल्यानंतर त्यांच्यासंबंधी जे लिहिले आहे ते हृदयस्पर्शी आहे. तो लेख मुळातून वाचण्यास हवा. मधू पाटील यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी आत्मकथन लिहिले आहे. ते मुंबईमध्ये राहतात. त्यांचे चिरंजीव, त्यांची सून, त्यांची नातवंडे, जावई, मुली यांच्या प्रेमाची सावली त्यांना आधार देते, लिहिण्यासाठी प्रेरणा देते. त्यांनी अन्य आठवणीही कथन केल्या आहेत.

खार जमिनीतील रोप
लेखक :  प्रा. एम. पी. तथा मधू पाटील
प्रकाशक : राजेंद्र प्रकाशन, गिरगाव, मुंबई
पाने : १३२, किंमत : १५० रुपये

- प्रा. पु.द. कोडोलीकर 9730942444

(‘जनपरिवार’ वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

 

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.