भद्रावती (Bhadravati)


भद्रावती हे ठिकाण वर्धा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. ते तालुक्याचे शहर आहे. ते चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणावरून सव्वीस किलोमीटर अंतरावर येते. त्या ठिकाणाला तेथील अनेक पुरातन वास्तूंमुळे प्रसिद्धी मिळाली. शिवाय, ऑर्डनन्स फॅक्टरी या शस्त्रास्त्रनिर्मितीच्या कारखान्यामुळे वेगळी नवी ओळख निर्माण झाली. तेथील लोकसंख्या आहे साठ हजार पाचशे पासष्ट. व्यवस्थापन नगरपरिषदेकडे आहे. ठिकाणाच्या चतु:सीमेला पूर्वेला ताडोबा जंगल, पश्चिमेला देऊरवाडा, उत्तरेला बरांज, वरोरा आणि दक्षिणेकडे लोणारा, चंद्रपूर ही गावे. भद्रावती हे ठिकाण ‘भांदक’ ह्या नावानेही ओळखले जाते. ते मध्यरेल्वे मार्गावर आहे. रेल्वेस्टेशन ‘भांदक’ या नावाने जास्त परिचयाचे आहे.

भद्रावती नागपूर-चंद्रपूर या राज्य महामार्गावर (264) आहे. त्यामुळे दळणवळण दोन्ही मार्गांनी सुलभ आहे.

भद्रावतीतील तालुक्याच्या ठिकाणी असाव्या त्या सर्व सोयी-सुविधा आहेत. सर्व शासकीय कार्यालये, न्यायालय, सरकारी तथा खाजगी आरोग्यसेवा, शाळा-महाविद्यालये, कृषिउत्पन्न बाजार समिती आणि गजबजलेली समृद्ध बाजारपेठ! भद्रावतीपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर चार कोळसा खाणी आहेत. गावात एनटीपीसी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, ऑर्डनन्स फॅक्टरी या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यांमध्ये काम करणारा कामगार व कर्मचारीवर्ग मोठा आहे. गावातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्य करणारे-लगतच्या कोळसा खाणीत काम करणारे नोकरदार, व्यापारीवर्ग यांचेही प्रमाण मोठे आहे. तसेच, नगरपालिकेच्या सीमेत जी गावे आलेली आहेत त्या गावांतील शेतकरी आणि परिसरातील विविध खाजगी व सरकारी फर्मस् यांमध्ये काम करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे.     

भद्रावतीला दोन पदव्युत्तर महाविद्यालये, तीन पदवी महाविद्यालये, पाच कनिष्ठ महाविद्यालये, आठ माध्यमिक विद्यालये आणि बारा प्राथमिक विद्यालये आहेत. त्यांवरून तेथील शैक्षणिक सांस्कृतिक वातावरण कसे असावे याचा अंदाज येतो. त्याचप्रमाणे, शहरात वातावरण धार्मिक स्वरूपाचे असून सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.     

भद्रावती येथे उत्खननादरम्यान सापडल्या गेलेल्या हिंदू, बौद्ध व जैन या काळांतील मूर्ती व मंदिरांचे अवशेष यांवरून तेथील समृद्ध ऐतिहासिक वारसा लक्षात येतो. भांदकसारखे प्राचीन अवशेषांनी समृद्ध दुसरे गाव या प्रांतात क्वचित असेल. ते कोणत्याही संशोधकाच्या जिज्ञासू वृत्तीस आव्हान दिल्याशिवाय राहत नाही असे इतिहास संशोधक कै. डॉ. यशवंत खुशाल देशपांडे यांनी म्हटलेले आहे. खनिज, पाणी, जंगल, सुपीक शेतजमिनी अशी नैसर्गिक समृद्धी एका बाजूस तर प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेली समृद्धी दुसऱ्या बाजूस अशा कोंदणात भद्रावतीची नगरी वसलेली आहे.   

भद्रावतीच्या गणेशाला वरदविनायक असे म्हटले जाते. तो भांदक रेल्वेस्टेशनवरून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे, गवराळा टेकडीवर आहे. म्हणजे भद्रावती शहरापासून दक्षिणेकडे एक किलोमीटर अंतरावर. मंदिराची इमारत हेमाडपंथी स्वरूपाची आहे. मंदिराच्या चार-पाच पायऱ्या उतरून खोलगट भागात गेल्यावर सुमारे सहा फूट उंचीची गणेशमूर्ती दिसते. तळघर खोलगट असल्याने मंदिर चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य (1087 ते 1126) यांच्या काळात 1104 मध्ये बांधले गेले असावे.

विजासन गुंफा अर्थात आवासालय भद्रावतीपासून पश्चिमेस सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम यांनी त्या लेण्यांचा उल्लेख प्रथम केलेला आहे. प्रसिद्ध चिनी यात्रेकरू ह्यूएन त्सांग तेथे इसवी सनाच्या सातव्या शतकात येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. त्या लेण्यांत तीन दिशांना तीन बोगदे असून पूर्वमुखी बोगदा पासष्ट फूट लांबीचा असावा. तेथे दोन्ही बाजूंस मध्यम स्वरूपाचे कोनाडे आहेत. बौद्ध भिक्षूक त्यात बसून ध्यान करत असावेत (रिपोर्ट ऑफ टूर इन दी सेंट्रल प्राव्हिन्सेस इन 1873, पृ-74, 75).
भांदकचे मूळ नाव भद्रक. ते ज्या मंदिरावरून पडले ते म्हणजे भद्रेश्वराचे मंदिर. भद्रेश्वर म्हणजे महादेव. कालांतराने, ते मंदिर पडून त्यातील शिवलिंग वगैरे नष्ट झाले. त्या ठिकाणी भद्रनाग मंदिराची वास्तू दिसते. पायऱ्यांची खोल विहीर मंदिराच्या बाजूला आहे. मंदिराला आता भद्रनाग मंदिर असे म्हणतात. त्याची स्थापना कोसल येथील पांडुवंशीय राजा उदयन याने इसवी सन 480 ते 500 च्या दरम्यान केली. (जनरल कनिंगहॅम यांचा आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, व्हॉल्यूम 9, पृष्ठ 135).

जैनमंदिर - हे जैन श्वेतांबर तीर्थ असून श्री केशरीया पार्श्वनाथ यांची प्राणप्रतिष्ठा मंदिरात केली गेली आहे. ते भांदक’ रेल्वेस्थानकावरून दोन किलोमीटर अंतरावर आहे. ती मूर्ती प्राचीन असल्याचे सांगतात. मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आणि आतील शिल्प आकर्षक स्वरूपाचे आहे. प्रेक्षणीय आणि पूजनीय स्थळ म्हणून सर्व धर्माचे लोक तेथे आवर्जून भेट देतात. ती वास्तू आणि तो परिसर आर्किआलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी तीर्थस्थानाचा दर्जा देऊन संरक्षित केले आहेत.     

भद्रावती शहराच्या मध्यभागात किल्ला असून तो ही पुरातत्त्व विभागाकडून संरक्षित आहे. किल्ल्याचा दर्शनी भाग प्रेक्षणीय भासतो. तेथील उत्खननादरम्यान सापडलेल्या काही मूर्ती व शिल्पे किल्ल्याच्या आतील भागात ठेवलेली आहेत. किल्ल्याची तटबंदी थोडीफार घसरली आहे. आतील भागात केवळ पटांगण सुस्थितीत आहे. आत पायऱ्यांची विहीर असून तिचे बांधकामही उत्तम स्थितीत आहे.

बालाजी मंदिर - भद्रनाग मंदिराच्या पूर्वेला असून ते पंचायत समिती समोरील रोडने ग्रामोदय संघाच्या समोरील बाजूस येते. मंदिर बाराव्या-तेराव्या शतकातील असावे. बालाजी मंदिरात प्रवेश केल्याबरोबर आकर्षक द्वारपट्टीका समोर दिसते. ती द्वारपट्टीका कलाकुसरीने परिपूर्ण आहे. नैगमेष, गंगा, स्त्रीशिल्प आदी चित्रांकन ठळक स्वरूपात दिसून येते. नैगमेषच्या मूर्ती घडवण्याचा काळ हा चौथ्या शतकाचा म्हणजे वाकाटकाचा समजला जातो. (शिल्पप्रकाश-र.पु. कुळकर्णी पृष्ठ (140) मंदिराचे बांधकाम साधे असल्याने त्या मंदिराचा उल्लेख फारसा कोठे झाल्याचे दिसून येत नाही व ते दुर्लक्षित आहे.      

गांधीवादी विचारवंत एस.के. मिरमीरा यांच्या प्रेरणेतून गावात मूलोद्योगाकरता ग्रामोदय संघाची स्थापना 1955 मध्ये झाली. कवेलू-भांडी बनवणे यासारख्या व इतर ग्रामीण कलांना चालना देणे, स्त्रिया व मुले त्यांच्या शिक्षणाला महत्त्व देणे, गावपातळीवरील स्वच्छता, खेडेगावात अल्प किमतीची घरे व स्वच्छतागृहे निर्माण करणे, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला-मेळाव्यांचे आयोजन करणे इत्यादी उद्देश घेऊन ग्रामोदय कार्यरत आहे. देशविदेशातील कलाप्रेमी तेथे येऊन गेल्याचे सांगितले जाते.

संदर्भ सौजन्य : दत्तात्रय तन्नीरवार, चंद्रपूर ऐतिहासिक संशोधनपर लेखक 9922089301भद्रावती रहिवासी :खुशालदास कामडी, लेखक

‘भद्रावतीदर्शन’ - 9921468017

- गोपाल शिरपूरकर, 7972715904, gshirpurkar@gmail.com
 

 

लेखी अभिप्राय

Good information sir

GANESH GORE30/03/2019

शिरपूरकर सर , खूप छान माहिती लिहिलीत ,भांदक या शहराबद्दल .धन्यवाद .

पार्श्वनाथाचे मंदिर , विजासन टेकडी ..तसेच खादी ग्रामोद्योगाचे कलाकृती बघण्यात म्हजे यायची .

चौथीला स्कॉलरशिप च्या परीक्षेसाठी गेलो .तेव्हा पहिल्यांदा भद्रावती शहर बघितले होते ..नंतर अनेकदा गेलो .पण पहिला ठसा जो उमटला तो अजूनही कायम आहे. एक ऐतिहासिक शहराबद्दल नेहमीच आपुलकी ,गूढ अन खूप काहीतरी ..

चंद्र्पुर जिल्ह्यात चंद्रपूर , बल्लारपूर ,मार्कंडा हे ठिकाणं आहेत .तसे वरोऱ्याजवळ चंदनखेडा , भटाळा येथील पुरातन मंदिर , लेण्याबद्दल ही लिहिता येईल .

श्रीकांत पेटकर .

SHRIKANT PETKAR01/04/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.