कनकाडी (Kanakadi)


कनकाडी हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शेवटी वसलेले गाव. त्या गावाच्या पुढे लांजा तालुका सुरू होतो. गावाला कनकाडी हे नाव कसे पडले याच्या दोन आख्यायिका आहेत. कनकाडी हे गाव कोणाचेही मूळ गाव नाही. त्या गावात राहणाऱ्या प्रत्येक समाजाचा कोणीतरी पूर्वज बाहेरून तेथे येऊन राहिला आणि गाव वसले. पहिल्या आलेल्यांपैकी काहींना तेथ कातळाच्या भेगेत सोन्याच्या काड्या मिळाल्या. सोने म्हणजे कनक; कनक काडीचा अपभ्रंश होऊन तयार झाले ते कनकाडी! दुसर्‍या आख्यायिकेप्रमाणे एरंडे नामक एका माणसाला स्वप्नात देवाची मूर्ती दिसली. त्या मूर्तींने ‘मी जमिनीखाली आहे, मला बाहेर काढ’ असे सांगितल्यामुळे एरंडे स्वप्नात दिसलेल्या जागी आला. त्याने पहारीने खणण्यास सुरुवात केली. त्याला मूर्ती काही वेळातच दिसली. तो ती बाहेर काढण्यासाठी म्हणून अजून खणू लागला. त्या प्रयत्नात, त्याच्या पहारीचा घाव मूर्तीवर पडला आणि मूर्तीचा कान तुटला. त्यावरून गावाचे नाव कान काढणारी म्हणून कानकाढी असे पडले. पुढे त्याचे कनकाडी झाले.     

कनकाडी गावाचे मूळ दैवत म्हणजे गांगेश्वर. गांगेश्वराचे मूळ देवस्थान ब्राह्मणवाडी येथे आहे. ते देवस्थान अनेक पिढ्या उघड्या स्वरूपात, ना कोठले देऊळ, ना छप्पर अशा अवस्थेत आहे. तेथे जर देऊळ बांधायचे तर ते एका रात्रीत, सूर्योदयापूर्वी बांधकाम पूर्ण नाही झाले तर ते बांधकाम टिकत नाही अशी श्रद्धा आहे. गांगेश्वर देवस्थानचे देऊळ कालांतराने गुरववाडी येथे बांधण्यात आले. त्या देवळात गुरव समाज पिढ्यान-पिढ्या धार्मिक कार्य करत आला आहे.   

कोकणात गणपती उत्सव हा मुख्यत: घरगुती स्वरूपात तर शिमगोत्सव हा सार्वजनिक स्वरूपात साजरा होतो. होळीनंतर गावागावांतून ग्रामदेवतांच्या पालख्या निघतात आणि त्या गावातील घरोघरी फिरून गुढीपाडव्याला पुन्हा मूळ देवळात परत येतात. ग्रामस्थ देव घरी येतो, ह्या आनंदात श्रद्धेने तो सण साजरा करतात. बहुतांश गावांमध्ये होळीच्या दुसर्‍याच दिवशी ग्रामदैवतांच्या पालख्या देवळांतून बाहेर पडतात आणि गावात फिरतात. कनकाडी त्याला अपवाद आहे. कनकाडीची पालखी देवळातून बाहेर पडते ती पंचमीला.

पण त्या दोन पालख्या फिरवण्याबाबतच्या अनेक गावांतील परंपरेलाही कनकाडी छेद देते. कनकाडीतही दोन पालख्या फिरवल्या जातात; एक गावची पालखी आणि दुसरी बाजूच्या करंबेळे ह्या गावाची. पण त्या पालख्या न भेटवण्याची परंपरा कनकाडी गावात आहे. कनकाडीची पालखी ही गावातील मूळ पालखी असल्याने ती मोठी बहीण आणि करंबेळे गावाची पालखी लहान बहीण असा समज पूर्वापार आहे. त्यामुळे कनकाडीच्या पालखीपाठोपाठ करंबेळे गावाची पालखीही मानाने आणली जाते. बर्‍याच वर्षांपूर्वी ब्राह्मणवाडीतील शेतात त्या पालख्या एकत्र आणून भेट घडवली जात असे. तेथे त्यावेळी दोन्ही पालख्यांबरोबर आलेले भाविक पालख्या एकत्र नाचवत असत. पालख्या नाचवताना दोन्ही पालख्यांमधील तांदूळ एकमेकांच्या पालखीत उडवले जात. त्यामागे दोन्ही बहिणी एकमेकींची ओटी भरतात असा समज होता.

कनकाडी गावातील ब्राह्मण समाज हे करंबेळे गावचे खोत होते. तो मान राखत त्या गावची पालखी ब्राह्मण समाजाच्या पाच घरांत आणि सोनार समाजाच्या एका घरी फिरवली जाते.  

एका वर्षी पालख्या नाचवत असताना करंबेळे गावाच्या पालखीतील नथीमधील मोती पडून हरवला. तो कनकाडी गावाच्या पालखीबरोबर आलेल्या ग्रामस्थांना मिळाला, असा विश्वास करंबेळे ग्रामस्थांना आहे. तो त्यांना परत मिळाला नाही. त्यामुळे करंबेळे गावाची पालखी म्हणजे लहान बहीण ही मोठ्या बहिणीवर रुसली! तेव्हापासून पालखी भेट सोहळा बंद करण्यात आला! तेव्हापासून दोन्ही गावांतील भाविक एकमेकांच्या पालखीच्या दर्शनाला जातात, एकमेकांच्या पालख्यांना नवस करतात, घरोघरी पालख्या नाचवतातही, पण एकत्र आणत नाहीत. कनकाडीची पालखी एका घरातून पुढे गेली, की मागून करंबेळे गावची पालखी त्या घरात येते.   

शिमगोत्सवात खेळे नाचवण्याची परंपरा कनकाडीत चाचे कुटुंबीयांतील मोठी माणसे जपत आली आहेत. महादेव आणि सुरेश चाचे ही काका-पुतण्यांची जोडी; सोबत मनोहर आणि सुधाकर चव्हाण ह्या बंधूंना घेऊन घरोघरी फिरतात. पण त्यांनी गायलेली गाणी मात्र वेगळी असतात. चार-पाच गाण्यांमधे गण, गवळण असतेच. ते एखादे देशभक्तीपर गाणेही गातात. त्यांना ढोलकी, झांज, तुणतुणे आणि सूरपेटी यांची साथ असते. महादेव चाचे हे स्वत: वारकरी पंथातील आहेत. ते डफलीवर गातात आणि साथीदार त्यांच्या-त्यांच्या वाद्यावर त्यांना साथ देतात.    

कनकाडी गाव बारा वाड्यांत विभागले आहे. त्यांची लोकसंख्या सतराशे आहे. गावात हिंदू आणि बौद्ध धर्मीय लोक आहेत. ब्राह्मण, मराठा, कुणबी, गवळी, तेली, सोनार, सुतार अशा समाजाचे लोक त्यांच्या-त्यांच्या वाड्या करून राहतात. मुस्लिम समाज आजूबाजूच्या गावांत राहतो.

 गावात पूर्वी एकच शाळा होती. श्रीराम पंडित यांनी ती खाजगी रीत्या सुरू केली होती. ते गावातील पहिले शिक्षक. ती शाळा प्रचंड अशा भेळ्याच्या झाडाखाली, पारावार भरत असे. ती पावसात देवळाच्या ओसरीत जाई. मध्यंतरीच्या काळात भेळ्याचे झाड पडले. शाळेची जागा बदलली तरी पण ती शाळा ‘भेळ्याखालची शाळा’ ह्याच नावाने प्रसिद्ध आहे. शाळा दोन वर्षें खाजगी रीत्या सुरू होती. विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यामुळे शाळा अधिकृत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. कै.विष्णु सखाराम पंडित यांनी शाळेच्या इमारतीसाठी जमीन दिली आणि ती ब्राह्मणवाडी शाळा म्हणून अधिकृतपणे सुरू झाली. विष्णु सखाराम पंडित हे शाळेतील पहिले अधिकृत शिक्षक ठरले.

श्रीराम पंडित यांच्या तीन पिढ्या शिक्षकी पेशात आहेत. श्रीराम पंडित यांनी सुरू केलेल्या शाळेत शिकलेले त्यांचे चिरंजीव अशोक पंडित हे पुढे उच्चविद्याविभूषित झाले. त्यांनी गणित विषयात एम एससी आणि पीएच डी करून मुंबई विद्यापीठात गणित विभागात एकतीस वर्षें लेक्चरर म्हणून सेवा केली. त्यांचा मुलगा अमित पंडित (म्हणजे मी) साखरपा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक आहे. अशोक पंडित यांच्या स्नुषा रेवती पंडित या गावातील पहिल्या पदव्युत्तर पदवी शिक्षण (M Lib) पूर्ण केलेल्या महिला ठरल्या आहेत. श्रीराम पंडित यांचे मोठे बंधू यशवंत पंडित हे जेआरडी टाटांचे आर्थिक सल्लागार होते. टाटा यांच्या चरित्रात यशवंत पंडित यांचा उल्लेख आहे. यशवंत पंडित यांनी युनोचे आदिसअबाबा येथील प्रतिनिधी म्हणूनही काम केले. त्यांचे चिरंजीव आनंद पंडित हे प्रथितयश उद्योजक आहेत. त्यांनी प्रारंभी जाहिरात क्षेत्रात काम केले आणि नंतर ते पुणे येथे बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपाला आले. त्यांचे सख्खे बंधू विनय पंडित हेही अमेरिकेत प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.  

कनकाडी गावात सहा शाळा आणि एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. त्यांपैकी तीन शाळा ह्या पूर्वप्राथमिक तर उर्वरित तीन शाळा प्राथमिक आहेत. माध्यमिक शाळा एकही नाही. गावातील विद्यार्थ्यांना सातवीनंतर बाजूच्या गावात जावे लागते. कनिष्ठ महाविद्यालयाच्या रुपाने अकरावी आणि बारावी कला आणि वाणिज्य शाखांच्या शिक्षणाची सोय झाली आहे. ग्रामस्थ श्रीरंग जाधव यांनी B. Lib ही पदवी संपादन करून गावात सदधम्म ग्रंथालय नावाचे नोंदणीकृत खाजगी ग्रंथालय सुरू केले आहे. जाधव ग्रंथालय सहा वर्षें चालवत आहेत. त्याचा लाभ शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक घेत असतात.

कनकाडी गावातील प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. भात हे प्रमुख पीक. त्याशिवाय काही शेतकरी नाचणीही घेत असतात. पाणलोट अभियान अंतर्गत काही शेतकरी हळद लागवडही करू लागले आहेत. आंबा आणि काजू ही फळपिके घेतली जातात.

- अमित पंडित 9527108522 ameet293@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.