चिरंजीव शारदा - मुलीच्या बापाचा लोभ!


कै. गो. ब. देवल यांच्या ‘शारदा’चा जन्म झाला त्याला एकशेवीस वर्षें उलटली. देवल यांच्या त्या एकमेव स्वतंत्र नाटकाचे वर्णन ‘जरठ कुमारी विवाहाच्या अनिष्ट प्रथेचे करुणादायी चित्र प्रभावीपणे रेखणारे’ असे केले जाते. तो विषय समाजात उरलेला नाही, शिक्षणाचा प्रसार झाला आणि मुलींना शिकवणे हा तमाम जनतेचा अलिखित नियम होऊन गेला. त्यामुळे तो प्रश्न अस्तित्वातच राहिलेला नाही. परंतु, पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत तसे वाटत नसावे. तसे न वाटणाऱ्यांपैकीच एका नाटककाराने ‘चिरंजीव शारदा अर्थात पळसाची पाने’ या नावाचे नाटक लिहिले; आणि ते नाटककाराचे दैवत असलेल्या गडकऱ्यांच्या मृत्युदिनी,1966 साली प्रकाशित करवून घेतले! त्या नाटककाराचे नाव आहे. नरहर गणेश कमतनुरकर. कमतनुरकर यांच्या मृत्यूलाही पन्नास वर्षें झाली आहेत.

कमतनुरकर यांचा जन्म 28-5-1896 चा. त्यांचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले – ‘तेही रमत गमत!’ तसा उल्लेख गो. चि. भाटे यांच्या History of Modern Marathi Literature 1800-1938 (‘अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’) या इंग्रजी पुस्तकात केला आहे. कमतनुरकर यांच्या नावावर श्री (1926), सज्जन (1931), स्त्री पुरुष (1933) अशी तीन आणखी नाटके रुजू आहेत असेही भाटे सांगतात. पैकी ‘श्री’ या नाटकातील ‘सखी मुखचंद्र भ्रांत’ हे पद लोकप्रिय झाले होते. एच एम व्ही कंपनीने त्या पदाचा गौरव सुवर्णपदक देऊन केला होता अशी माहिती माहितीजालावर मिळाली. कमतनुरकर यांनी प्रस्तुतचे नाटक आयुष्याच्या अखेरी अखेरीस लिहिले. त्यांनी त्यांची नाटक व प्रेक्षक या विषयावरील मते नटी-सूत्रधारांच्या प्रवेशाच्या रूपाने नाटकात मांडली आहेत. त्यांची ती मते त्यांनी नाटक-रंगभूमीच्या जवळून घेतलेल्या अनुभवातून बनली होती. “भोलानाथ नटराजासारखा आमचा आजकालचा प्रेक्षकराजा स्थितप्रज्ञ बनलेला आहे. अर्धीमुर्धी हळकुंडं आणि तोठऱ्या सुपाऱ्या यांच्या माडांनी कोणत्याही नव्या-जुन्या नाटकाचा गोंधळ वा येळकोट उभा केला तरी हा शंभुराजा हसत-खिदळत किंवा किंकाळत पाहत राहतो.” हे उद्गार सूत्रधाराच्या तोंडी आहेत.

कमतनुरकर यांनी जुन्या रंगभूमीच्या काळात लौकिक मिळवला. त्यांची मते नव्या लोकांना नाक मुरडणारी अशी होती असे त्यांची प्रस्तावना वाचताना वाटते. ‘शारदा’ नाटकात अल्पवयीन मुलीचा विवाह अतिवयस्क माणसाशी होणे हीच एक शोकांतिका नव्हती, तर त्या प्रकारच्या कृत्याला संभवनीय ठरवणारा मुलीच्या बापाचा धनलोभ हा नाट्यपूरक घटक होता. मुलीच्या बापाचा लोभ पन्नास वर्षांत कमी झाला नाही आणि त्यामुळे अल्पवयीन नाही तरी तरुण मुलींचे लग्न त्यांचे द्रव्यलोभी बाप म्हाताऱ्या आणि अनेक बाबतींत अश्लाघ्य वर्तनाच्या पुरुषांशी बिनदिक्कतपणे योजत असतात व स्त्रियांना त्याबाबतीत काहीच किंमत इतक्या वर्षांनंतरही दिली जात नाही असे दाखवण्यासाठी त्या नाटकाची निर्मिती केली गेली.

नाटक जुन्या पद्धतीनुसार पाच अंकी अनेकप्रवेशी असे आहे. कमतनुरकर यांनी त्यांच्या नाटकात कांचनभट, शारदा, इंदिराकाकू, वल्लरी आदी मैत्रिणी, भद्रेश्वर, भुजंग आणि कोदंड ह्या प्रमुख व्यक्तिरेखांची नावे तीच ठेवलेली आहेत. बदल आहे तो रचनेत. पहिल्या अंकातील दृश्यांचा काळ 1896-1906 म्हणजे मूळ ‘शारदा’ नाटकाचा आहे. दुसऱ्या अंकाचा 1906-1916/17, तिसऱ्याचा19171927/28, चौथ्याचा 1927-1948, पाचव्याचा 1947 पुढील - आत्तापर्यंतचा (1966) असे उल्लेख प्रत्येक अंकाच्या सुरुवातीस एका फलकाद्वारे जाहीर करण्याची नाट्यलेखकाची सूचना आहे. कांचनभटाचा भटजी हा व्यवसाय मूळ नाटकात आहे तो बदलत्या काळानुसार बदलत जाऊन; मास्तर, रावसाहेब, सर ही पदवी मिळवलेले, शेवटी व्यापारी व तोही काळाबाजार केल्यामुळे गोत्यात आलेला असा कमतनुरकर यांना जाणवलेला आहे – त्यांनी तसा तो बदल मुलीच्या पित्याच्या व्यवसायातही दाखवला आहे. नाटकात कांचनभटाचा बाह्यव्यवसाय तेवढा बदलला पण द्रव्यलोभ आणि त्यासाठी मुलीचा बळी देण्याची तयारी ही कायमस्वरूपी वृत्ती आहे असे निर्देशित केले आहे. कमतनुरकर यांच्या नाटकात काळाप्रमाणे मराठी उच्चवर्णियांत शिक्षणाचा प्रसार झाल्याचे दाखवावे म्हणून शारदा कॉलेजमध्ये जाते व तिच्या मैत्रिणी अस्सल इंग्रजी शब्दप्रयोग सहजगत्या करतात असे दाखवले आहे. इंदिराकाकूने मूळ ‘शारदा’त तिच्या विवाहाला थोडाफार विरोध केला तसा तो येथेही होताना दिसतो, पण तिची अगतिकताही तशीच राहते. विशेष म्हणजे कोदंड ही व्यक्तिरेखा शेवटच्या अंकात चीड येण्याइतकी सात्त्विक आणि पौरुषहीन दाखवली आहे.

कमतनुरकर यांच्या नाटकाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, लेखकाने पाचवा अंक संपल्यावर ‘महत्त्वाची चेतावणी’ ह्या शीर्षकाखाली काही मजकूर दिला आहे. त्यातील पहिले वाक्य हे आहे – ‘हे नाटक प्रामुख्याने वाचून पाहण्यासाठी आहे.’ मात्र तो केवळ एक पवित्रा आहे. प्रत्येक अंकाच्या सुरुवातीचा सूचनाफलक आणि नेपथ्याविषयीचे तपशील प्रयोग करण्यासाठी आहेत हे अगदी स्पष्ट आहे. नवल म्हणजे ते नाटक पन्नासहून अधिक वर्षांपूर्वीचे आणि वयाच्या सत्तरीतील एका लेखकाने लिहिलेले आहे. त्या काळी समांतर रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी ह्या वर्गीकरणाचा जन्म झाला नव्हता. आज आमच्या धाडसी आणि जळजळीत वास्तववादी लेखन करणाऱ्या आणि तसे रंगमंचावर सादरीकरण करणाऱ्या रंगकर्मींना, असा अनेक वर्षे, पुन्हा पुन्हा जाणवणारा मानवी वृत्तीचा आविष्कार दाखवता येणे आवश्यक आणि शक्य वाटते का? ह्या पुस्तकाचे प्रकाशक - नीलकंठ प्रकाशन (पुणे.)

- मुकुंद वझे 9820946547, vazemukund@yahoo.com

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.