झेडपीचे डिसलेसर 143 देशांत पोचले!


डिसलेसर सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून 2009 मध्ये रुजू झाले, तेव्हा पहिली ते चौथी या वर्गांतील शाळेची पटसंख्या होती नऊ. शाळेच्या एका वर्गखोलीत तर चक्क मेंढरे बसायची. डिसलेसरांच्या प्रवासाची सुरुवात त्यांना हुसकावून लावून मुलांसाठी वर्ग मिळवण्यापासून झाली.

सरांची भूमिका आहे, की गावाला आणि गावकऱ्यांना शाळा ‘आपली’ वाटली पाहिजे, तरच शाळेचा विकास घडेल. त्यामुळे त्यांनी सातत्याने गावकऱ्यांशी, विशेषत: विद्यार्थ्यांच्या मातापालकांशी संवाद ठेवणे आरंभले. दर आठवड्याला पाल्यांच्या प्रगतीची कल्पना देणारी पालकसभा आणि ‘अलार्म ऑन, टीव्ही ऑफ’ यांसारखे उपक्रम यांमुळे गाव आणि शाळा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. त्याच उपक्रमांतर्गत रोज संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजतो आणि पालक टीव्ही बंद करून पाल्यांचा अभ्यास घेतात! अभ्यास काय घ्यायचा याच्या सूचना पालकांच्या मोबाईलवर दररोज दुपारी गेलेल्या असतात.

डिसलेसरांनी लॅपटॉप स्वकमाईतून खरेदी केला आहे. त्यांनी त्या माध्यमातून गाणी, लहान मुलांसाठीचे मनोरंजक चित्रपट दाखवून शाळेचे आकर्षण वाढवले. त्यानंतर त्यांनी त्यापलीकडे जात सूर्यग्रहण, ज्वालामुखी यांसारख्या संकल्पनांचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवणे सुरू केले. विद्यार्थी त्या ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून चांगल्या प्रकारे ज्ञानग्रहण करू लागले. शाळेतील विद्यार्थी स्काइपच्या माध्यमातून चक्क पेंग्विन्संना भेटत आहेत! घडले असे, की विद्यार्थ्यांना दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधील एका शाळेत जखमी आणि आजारी पेंग्विन्ससाठी पुनर्वसन केंद्र चालवले जाते असे कळले. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात जलचर, उभयचर सृष्टीबद्दलचा पाठ आहे. शिवाय, त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मुंबईच्या राणीच्या बागेत पेंग्विन आल्याची बातमीही वृत्तपत्रातून वाचली होती. म्हणून त्यांनी त्यांच्या गुरुजींकडे हट्ट धरला, की आम्हांला पेंग्विन कसे दिसतात ते पाहायचे आहे. तर काय, सरांनी व्हर्च्युअल फील्ड ट्रिपच्या माध्यमातून चक्क खरेखुरे भासणारे पेंग्विन विद्यार्थ्यांसमोर हजर केले आणि त्यांचे कुतूहल शमवले.

मग सुरुवात झाली क्युआर कोडेड नोटबुक्सची. डिसलेसर सांगतात, ते पाठ्यपुस्तकाशी पूरक असा ‘डिजिटल कंटेंट’ साठवू लागले, पण तो कंटेंट पालकांच्या मोबाइलवर पाठवणे जिकिरीचे होऊ लागले. कधी मराठी फाँट ओपन होत नसे, तर कधी पीडीएफ कन्व्हर्टर नसे. पालकांना फाइलच ओपन करता यायची नाही! सर त्यासाठी पालकांच्या कार्यशाळा वेळोवेळी घेत असत. तरी डिसलेसरांनी सुलभ प्रणाली वापरण्यास हवी ह्या विचारातून ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी’ या तंत्राचा इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेतला. त्यांनी शाळेतील एकोणीस मुलांसाठी त्यांच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांवर प्रत्येकाच्या अध्ययनस्तरानुसार क्युआर कोड लावून दिले. ते क्युआर कोड पालकांच्या मोबाइलमधून केवळ स्कॅन केले, की त्यांच्या कविता सुरेल आवाजात ऐकू येऊ लागतात. इतिहासातील गड-किल्ले प्रत्यक्षात दिसतात आणि अभ्यास आकर्षक, चित्रमय व श्राव्य होतो.

डिसलेसरांचा क्युआर कोडेड पुस्तकांचा हा उपक्रम इतका यशस्वी ठरला, की  ‘बालभारती’ने त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्येही पूरक अभ्यासक्रमासाठी क्युआर कोड छापण्यास 2015 पासून सुरुवात केली. त्यासाठी डिसलेसरांनीच बालभारतीच्या आयटी टीमला प्रशिक्षण दिले आहे. हे क्युआर कोड पहिली ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांत पाहण्यास मिळतात. दरम्यान, सरांचे तंत्रज्ञानाचे प्रेम पाहून परितेवाडी गाव पुढे सरसावले. गावाने सुमारे दीड लाख रुपयांचा निधी उभारून लोकसहभागातून शाळेला कॉम्प्युटर, प्रोजेक्टर आणि सोलर पॅनेल यांची भेट 2014 मध्ये दिली. त्यातून सुरू झालेला आणखी एक भन्नाट उपक्रम म्हणजे व्हर्च्युअल फील्ड ट्रिप. डिसलेसर म्हणतात, “प्रत्येक शिक्षक प्रत्येक विषयात परिपूर्ण नसतो, पण विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे सर्वोत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, म्हणून आम्ही स्काइपच्या माध्यमातून राज्यातील, देशातील आणि जगभरातील इतर शाळांच्या शिक्षकांची थेट भेट घेण्याचा हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या education.microsoft.com या संकेतस्थळाचा मला फायदा झाला.” विद्यार्थ्यांनी या व्हर्च्युअल फील्ड ट्रिपच्या माध्यमातून गणित उत्तम शिकवणारे नवनाथ शिंदे सर, लेखक राजीव तांबे, आभा भागवत यांच्याशी गप्पा साधल्या. जगातील सात आश्चर्यांपैकी काही आश्चर्यांचा आनंद परितेवाडीत बसून घेतला. डिसलेसर सध्या व्हर्च्युअल ट्रिप ऑफ सायन्स सेंटरच्या माध्यमातून पहिली ते दहावीच्या मुलांसाठी त्रेपन्न प्रयोग दाखवतात, राज्यातील आणि देशातील एक हजार पाचशे शाळांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्याशिवाय जगभरातील ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी सोलापूरच्या चादरी आणि कापड या उद्योगाची सफर घडवणारी व्हर्च्युअल टूर ऑफ टेक्स्टाइल इंडस्ट्री आणि व्हर्च्युअल टूर ऑफ डायनॉसॉर पार्क हेही उपक्रम पाहिलेले आहेत.

विद्यार्थ्यांनी डिसलेसरांच्या मार्गदर्शनातून जवळच्या आकुंभे गावातील एकूण झाडांची, वाहनांची गणती केली, तेथे पर्यावरणाबाबत जाणीवजागृती घडवून आणली. गावातील दोनशेशहाऐंशी झाडे प्रत्येकी दहा-दहा याप्रमाणे विद्यार्थ्यांना दत्तक दिली गेली आहेत. एखादे झाड तोडण्याचा प्रयत्न जर झाला तर ते झाड ज्या विद्यार्थ्याचे आहे, त्याच्या पालकांना मोबाईलवर ‘रेड अलर्ट मेसेज’ जातो, पालक येऊन वृक्षतोड थांबवतात. झाड तोडणे अपरिहार्य असेल तर संबंधित व्यक्तीला एका झाडाच्या बदल्यात पाच नवीन झाडे लावावी लागतात. वृक्षतोडीचा आकुंभे पॅटर्न जपान, इटाली आणि मलेशिया या देशांतील शाळांनीही अवलंबला आहे. डिसलेसरांच्या या प्रयोगाची दखल घेतली गेली ती आंतरराष्ट्रीय ‘नॅशनल जिऑग्राफिक इनोव्हेटिव्ह एज्युकेटर’ या जागतिक पुरस्काराने! डिसलेसरांना चार वेळा ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेशन एज्युकेशन एक्स्पर्ट’ हा पुरस्कार मिळालेला असून, त्यांची निवड संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण मोहिमेचे सदिच्छादूत म्हणूनही झालेली आहे.

हा ही लेख वाचा - 
सोलापूरचे डिसले सर यांची क्यूआर कोड पद्धत संपूर्ण भारतात

- - - - - - - - - -

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या प्रतिनिधीने डिसलेसरांशी बोलून अधिक माहिती मिळवली. ती पुढीलप्रमाणे –

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील परितेवाडी गावचा हा शिक्षक सध्या जगातील आठ शत्रुराष्ट्रांतील चाळीस हजार मुलांना शांततेचे पाठ इंटरनेटच्या माध्यमातून देत आहे. त्यात भारत व पाकिस्तान यांचाही समावेश आहे. त्याच्या या प्रकल्पाला हार्पर व कॉलिन्स या प्रकाशकांचे अर्थसहाय्य दहा वर्षांसाठी लाभले आहे. हे अर्थसहाय्य त्यांना मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नडेला यांच्या शिफारशीने मिळाले आहे. त्या प्रकल्पातून दरवर्षी पाच हजार अशा प्रकारे प्रत्येक देशातील पन्नास हजार मुलांना प्रशिक्षित शांतताभिमुख बनवले जाणार आहे.

डिसलेसर हा माणूसच काँप्युटरवेडा आहे व त्याने काँम्प्युटरच्या माध्यमातून अनेकविध गोष्टी साधल्या आहेत. त्यांपैकी शालोपयोगी महत्त्वाचे तंत्र म्हणजे क्युआर कोड. त्यांनी तो प्रयोग प्रथम त्यांच्या शाळेत केला. तो बालभारतीने स्वीकारून त्यांच्या सर्व क्रमिक पुस्तकांत समाविष्ट केला आणि आता जून 2019 पासून तो राष्ट्रीय पातळीवर लागू करण्याचे ‘एनसीइआरटी’ने ठरवले आहे.

डिसलेसरांना त्यांच्या विविध उपक्रमासाठी ‘नॅशनल जिऑग्राफी’चा एक हजार डॉलरचा व ‘मायक्रोसॉफ्ट’चा तीन हजार डॉलरचा असे पुरस्कार लाभले आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी, शिक्षणसचिवांनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. मात्र ते गेली नऊ वर्षें जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवत आहेत.

क्युआर कोडचा उपयोग काय झाला? असे विचारता डिसलेसर म्हणाले, की 2015 साली बालभारतीच्या पुस्तकात भारताचा नकाशा छापताना चूक होऊन अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग म्हणून दाखवला गेला. एरवी, ती दोन पाने पुन्हा छापावी लागली असती, ती दुरुस्ती क्युआर कोडने सर्वत्र दाखवली गेली व सरकारचे लक्षावधी रुपये वाचले. क्युआर कोडचा फायदा शिक्षणविभागाला ‘कंटेंट’ विकसित करण्याच्या कामात व पालकांना मोबाइलवरून अपडेट देण्याच्या कामात खूपच होत आहे.

रणजित यांना लहानपणापासून काँप्युटरचे वेड होते व ते त्याच्याशी खेळत असायचे. त्यातून त्यांनी अनेक तंत्रे आत्मसात केली. रणजित यांचे आईवडील शिक्षक होते. त्यामुळे रणजित यांना शिक्षकी पेशाचे आकर्षण होते व त्यांनी शिक्षक होण्याचे पक्के केले होते. त्यांचे वय एकोणतीस वर्षांचे आहे. त्यांचे लग्न जानेवारी 2019 मध्ये झाले. त्यांच्या पत्नी लातूरच्या शाहू कॉलेजात प्राध्यापक आहेत. रणजित त्यांच्या आईवडिलांसह बार्शीला राहतात.

रणजितसिंह डिसले 9404665096, onlyranjitsinh@gmail.com

- स्नेहल बनसोडे - शेलुडकर 9420779857, snehswapn@gmail.com

(दिव्य मराठी ‘मधुरिमा’वरून उद्धृत, संपादित-संस्कारित-विस्तारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.