फाळणी ते फाळणी - पाकिस्तानविषयक नवी दृष्टी


पाकिस्तान या शब्दाच्या उच्चाराबरोबर भारतीयांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना दाटून येतात. त्या मुख्यत्वेकरून असतात चीड आणि संताप यांच्या. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगली, त्यावेळी झालेले अत्याचार, पाकिस्तानने भारतावर लादलेली युद्धे, त्यांनी दहशतवाद्यांना दिलेले प्रोत्साहन, देशात येऊन केलेले बॉम्बस्फोट, तेथे होत असलेले बॉम्बस्फोट आणि त्यांनी भारताला शांततेत जगू न देण्याचे घेतलेले व्रत... असे हे सारे असूनदेखील, भारतीयांना पाकिस्तानबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याचे कारण म्हणजे दोघांचाही असलेला समान भूतकाळ. भारतीयांना लाहोर शहराचे आकर्षण वाटते, कारण आख्यायिकेप्रमाणे ते रामाच्या मुलाने, म्हणजे लव याने वसवलेले आहे; तर रावळपिंडी हे बाप्पा रावळ यांनी वसवलेले! हडप्पा आणि मोहेन-जो-दारो ही तर भारताच्या पुराणकालीन संस्कृतीची केंद्रे, ती सर्व ठिकाणे पाकिस्तानात आहेत.

‘फाळणी ते फाळणी’च्या लेखिका प्रतिभा रानडे या काबूलमध्ये चार वर्षें होत्या, तेव्हा त्या काही पाकिस्तानी लोकांच्या सान्निध्यात आल्या होत्या. नंतर, खुद्द त्यांचा मुक्काम पाकिस्तानातील कराची व लाहोर या शहरांत झाला. त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत - एक ‘फाळणी ते फाळणी’ व दुसर्‍या पुस्तकाचे नाव आहे, ‘अस्मितेच्या शोधात पाकिस्तान’.

लेखिकेने ‘फाळणी ते फाळणी’ या पुस्तकाची विभागणी चार भागांत केली आहे. पहिल्या भागात पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते बॅ. जिना यांच्या मृत्यूपर्यंतचा भाग येतो. दुसर्‍या भागात 1948 पासून ते 1958 पर्यंत पाकिस्तानात असलेल्या अनागोंदीचे चित्रण येते. त्या दहा वर्षांच्या कालखंडात पाकिस्तानात सहा पंतप्रधान होऊन गेले. तिसरा भाग म्हणजे जनरल अयूब खान यांची कारकीर्द आणि चौथ्या भागात पाकिस्तानची फाळणी व बांगलादेशची निर्मिती.

पहिल्या भागाची सुरुवात होते ती जिना हे त्यांची बहीण फातिमा हिच्याबरोबर दिल्लीहून कराचीला रवाना होतात तेव्हा. पण जिना यांनी पदरात पडलेले पाकिस्तान स्वीकारून मुस्लिम जनतेचा विश्वासघात केला आहे अशी तिखट प्रतिक्रिया दिली रहमत अली यांनी. त्यांनी पाकिस्तानची संकल्पना प्रथम मांडली. त्यांना पाकिस्तानमध्ये संपूर्ण पंजाब व संपूर्ण बंगाल हवा होता. ते पाकिस्तान नॅशनल मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष होते, त्यानी पाकिस्तानची कल्पना मांडली, ती 1932 साली, लंडनमध्ये झालेल्या तिसर्‍या गोलमेज परिषदेमध्ये.

जिना यांनी पाकिस्तानच्या मागणीसाठी मुस्लिमपणा हा एकच मुद्दा बनवला. त्यांना एक राष्ट्र म्हणून इस्लामशी काही देणेघेणे नव्हते. त्यांच्या नजरेसमोर पाकिस्तान हे एक आधुनिक राष्ट्र होते. तेथे सर्व धर्मांना स्वातंत्र्य होते. तेच त्यांनी घटना समितीसमोर केलेल्या त्यांच्या पहिल्या भाषणात सांगितले होते. त्यांनी पाकिस्तानात शीख, हिंदू आणि इतर सर्व धर्मीय यांना धार्मिक स्वातंत्र्य मिळेल, नागरिकत्वाचे समान अधिकार मिळतील, संरक्षण मिळेल असे आश्वासन दिले होते. जिना यांचे ते विचार मुठभर पुढारी सोडले तर घटना समितीतील कोणालाही पटले नाहीत.

जिना यांनी पाकिस्तान ‘मुस्लिम लिग’चा वापर करून मिळवले, पण मग त्यांचा ताबा ‘लिग’वर राहिला नाही. त्यांनीही गांधीजी यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यानंतर ‘मुस्लिम लिग’चे विसर्जन करण्यास सांगितले होते, पण कोणीही त्यांचे बोलणे मनावर घेतले नाही.

पाकिस्तानातील सर्वात अस्वस्थतेचा काळ1948 ते 1958 हा. जिनांचा मृत्यू 1948 मध्ये झाला आणि लियाकत अली पंतप्रधान झाले. त्यांनी कारभार त्या कोलाहलात दोन वर्षें सांभाळला. ते कारभार अजून काही वर्षें सांभाळून पाकिस्तानात शांतता प्रस्थापित करतील असे वाटत असतानाच त्यांचा खून 1951 मध्ये झाला. पाकिस्तानात सहा पंतप्रधान पुढील आठ वर्षांत झाले. त्या काळात पाकिस्तानात सत्तास्पर्धेचा खेळ, राजकीय उलाढाली, धार्मिक तणाव, दंगे, वैयक्तिक हेवेदावे हे सर्वही चालू होते. त्या परिस्थितीत सत्ता जनरल अयूब खान यांनी त्यांच्या ताब्यात घेतली आणि लोकांनी त्यांचा निषेध तर सोडाच, त्यांचे स्वागत आनंदाने केले.

भारतात जनरल अयूब खान यांच्याबद्दल त्रोटक माहिती आहे आणि जी आहे त्याच्यापेक्षा अयूब खान हे फार वेगळे असल्याचे या पुस्तकातून लक्षात येते. मुख्य म्हणजे ते जरी लष्करशहा असले तरी ते पाकिस्तानच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे होते. त्यांनी अनेक मोठमोठ्या योजना पाकिस्तानला आधुनिक जगात सन्मानाने जगता यावे यासाठी आखल्या. त्यांनी सत्तेवर आल्यावर पंधरा दिवसांत जमीन सुधारणा समिती नेमली. त्यानंतर कायदा सुधारणा समिती, राष्ट्रीय शिक्षण मंडळ, विज्ञान आयोग, कंपनी कायदा आयोग, अन्नकृषी मंडळ अशा अन्य काही मंडळांची स्थापना केली.

पाकिस्तानची जनता जिना यांना राष्ट्रनिर्मिती झाल्यानंतर जवळ जवळ विसरून गेली होती. त्यांच्या नावाचे एकही स्मारक नव्हते, की एखादा रस्ता नव्हता. अयूब खान यांनी जिना यांच्या नावाने भव्य मकबरा कराचीमध्ये बनवण्याचे मनावर घेतले. त्याचा आराखडा प्रसिद्ध इटालियन वास्तुशास्त्रज्ञाने केला. मुंबईतील प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ याह्या मर्चंट यांनी त्या आराखड्याची अंमलबजावणी केली. ते कराची शहरातील सर्वात भव्य स्मारक होय. त्यामध्ये उंच भव्य झुंबर आहे. ती चीनने पाकिस्तानला दिलेली भेट आहे. जनरल अयूब खान यांनी पाकिस्तानसाठी केलेले दुसरे मोठे काम म्हणजे राजधानी इस्लामाबादच्या स्थापनेसाठी घेतलेला पुढाकार. सुरुवातीला, कराची शहराची पाकिस्तानची राजधानी म्हणून निवड झाली होती. त्याबद्दल अयूब खान म्हणाले होते, “राजधानी फक्त उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून बांधायची नसते तर तिला स्वत:चे असे व्यक्तित्व असायला हवे. उपयुक्तता महत्त्वाची आहेच, परंतु एखाद्या देशाच्या राजधानीचा अवकाश मोठा, भव्य असायला हवा. ते अधिक महत्त्वाचे. त्यातूनच लोकांच्या अपेक्षा आणि त्यांचे परिश्रम यांचे दर्शन घडले पाहिजे. त्यांच्या कर्तृत्वाला नव्या दिशा, नवा प्रकाश दिसायला हवा. त्या शहराकडे राज्य करणारे नेते, व्यापारी, उद्योजक, साहित्यिक, कलाकार, धर्मावर श्रद्धा असणारे, शास्त्रज्ञ हे सगळे आकर्षित व्हायला हवेत.” त्यावरून अयूब खान यांचा द्रष्टेपणा, विचारांची परिपक्कता दिसते. इस्लामाबाद हे राजधानीचे शहर रावळपिंडी शहराजवळ मरगला डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असून ते जगातील उत्तम शहरांपैकी एक समजले जाऊ लागले आहे.

त्यांनी लष्कराला खूष ठेवण्यासाठी आणि सैन्यात नोकरी करण्याची लोकांची इच्छा प्रबळ व्हावी म्हणून त्यांचे पगार, इतर सोयीसवलती, त्यांच्या मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, त्यांना वैद्यकीय मदत या सगळ्यांची जबाबदारी सरकारवर टाकली आणि त्याकरता लागणारा पैसा उभारण्यासाठी ठिकठिकाणी लष्करी ठाण्यांना जोडून शेती, दुभती जनावरे, घोड्यांची पैदास केंद्रे अशा अनेक तरतुदी केल्या. अयूब खान यांनी जरी लष्करी राजवट आणली तरी त्या कालखंडात पाकिस्तानमध्ये शांतता होती. याह्या खान यांच्या कारकिर्दीत बांगलादेशाची चळवळ सुरू झाली. पाकिस्तानची फाळणी आणि बांगलादेशाची निर्मिती याबाबत पुस्तकात दिलेली काही माहिती ही नवीनच आहे. उदाहरणार्थ, 1. माऊंटबॅटन यांची इच्छा त्यांनी भारताप्रमाणे पाकिस्तानचेसुद्धा पहिले गव्हर्नर जनरल व्हावे ही होती, पण जिना यांनी ते स्वत: गव्हर्नर जनरल होणार हे माऊंटबॅटन यांना ठणकावून सांगितले. 2. पाकिस्तानचे राष्ट्रगीत लिहिण्यास जिना यांनी एका हिंदूला सांगितले होते. त्यांचे नाव होते जगन्नाथ आझाद. त्यांनी राष्ट्रगीत लिहिलेदेखील. त्यातील पहिल्या चार ओळी अशा होत्या:

ऐ सरझमीं-ए-पाक
झरें तेरे हैं आज
सितारोंसे तबतक रोशन हैं
कहकशां से कहीं आज तेरी खांक.

(हे पाकिस्तानच्या भूमी, तुझ्या कणाकणाने तार्‍यांचा प्रकाश दत्तक घेतला आहे, तुझ्या धुळीलाही आकाशगंगेचे तेज आले आहे.) जिनांना ते गीत पसंत पडले आणि लगेच चाल लावून ते कराची रेडिओ स्टेशनवरून म्हटलेही गेले. मात्र ते राष्ट्रगीतही जिना यांच्या मृत्यूनंतर संपले. हाफिज जालिंदरी यांनी लिहिलेले राष्ट्रगीत नंतर रुढ झाले. 3. अफगाण मुसलमान भारतीय आणि पाकिस्तानी मुसलमानांना अस्सल मुसलमान मानत नाहीत, तर अरब मुसलमान स्वत:ला वगळून इतर कोणालाच अस्सल मुसलमान मानत नाहीत. 4. जिना जरी त्यांच्या अरेबियातील पूर्वजांचा दाखला भाषणांमध्ये देत असले तरी प्रत्यक्षात त्यांचे आजोबा हे पुंजाणी ठक्कर या नावाने ओळखले जात होते व ते हिंदू गुजराती लोहाणा समाजातील होते. 5. गांधीजी यांना कराचीला जाऊन जिना यांना भेटायचे होते, परंतु गांधीजी त्यांच्या स्टेटसचे नाहीत, म्हणजे गव्हर्नर जनरल नाहीत म्हणून जिना यांनी त्यांची भेट घेणे नाकारले.

जिना यांची अनेक वक्तव्ये वाचल्यानंतर मनात येते, की जिना यांना खरोखरच पाकिस्तान हवा होता, की पाकिस्तानच्या नावावर मुसलमानांसाठी अधिकाधिक अधिकार व सवलती उकळायच्या होत्या? पण तोपर्यंत पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून प्रकरण फार पुढे गेले होते; ते निव्वळ सवलती मिळवून थांबले नसते.

लेखिकेने पुस्तक लिहिताना घेतलेली मेहनत, संदर्भ-ग्रंथ सूची यांवरून नजर टाकली तरी वाचकाच्या लक्षात येते, की पाकिस्तानवर आलेली अनेक पुस्तके वाचूनसुद्धा हे पुस्तक वाचावेच लागेल, एवढी वेगळी माहिती ह्या पुस्तकात आलेली आहे.

पाकिस्तानातील राजकारणावर तेथील बिरादरींचा फार मोठा प्रभाव पडतो. पाकिस्तानी पंजाबमध्ये चौधरी, गुजर, चिमा, अरियन, जाट, राजपूत अशा अनेक बिरादरी जिल्ह्या जिल्ह्यांचे राजकारण खेळवत असतात, तर सिंधमध्ये ते काम जिलानी, चांडीओ, तालपूर, भुट्टो या बिरादरी करतात. सरहद्द प्रांतात रामझाई, युसुफझाई, आफ्रिदी, खटक या प्रमुख जमाती आहेत. पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा तेथीलच. बलुचिस्तानमध्ये सरदारी पद्धत आहे. जमाली, बिझेनजो, मेंगल, बुगती, लोधारी आणि मझारी ह्या तेथील प्रमुख टोळ्या आहेत. हिंदू, शीख टोळ्यादेखील आहेत आणि त्याचबरोबर ‘मरहट्टी’ टोळीही आहे. पानिपतच्या तिसर्‍या लढाईत, जेव्हा अहमदशहा अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला, तेव्हा त्याने त्याच्याबरोबर हजारोंच्या संख्येने मराठा सैनिकांना गुलाम म्हणून घेतले, परंतु ते सर्व गुलाम अफगाणिस्तानला नेण्याऐवजी अब्दालीने लढाईत मदत करणार्‍या बलुची सरदारांमध्ये वाटून टाकले आणि मराठे बलुचिस्तानमध्ये स्थायिक झाले!

फाळणी ते फाळणी
लेखक - प्रतिभा रानडे
राजहंस प्रकाशन
पृष्ठ संख्या - 217
किंमत - 200₹

- माधव ठाकूर, 9869212885

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.