माझे गाव - सकळात भारी; नाव असे तयाचे कुंभारी


_kumbhari_maza-gaav_2.jpgमाझे कुंभारी हे गाव अकोला शहराच्या पूर्वेस दहा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे आणि माझा अकोला जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील 20-17 अंश ते 21.16 अंश उत्तर व 76.07 अंश ते 77.04 अंश पूर्व पसरलेला भूभाग होय. जिल्ह्यात पूर्णा नदी वाहते. ती पुढे तापीला मिळते. म्हणून या भागाला तापीखोरे असेही म्हटले जाते. दक्षिणेकडील बालाघाट, उत्तरेकडील गाविलग, मध्यवर्ती अजिंठ्यांच्या रांगा तर पूर्व-पश्चिम सातपुडा पर्वताच्या रांगा असे निसर्गाचे कवच या जिल्ह्याला बहाल झाले आहे. माझ्या गावची जमीन दोन भागांत विभागली गेली आहे. उत्तर अन् पूर्व याकडील भाग सुपीक, काळा कसदार, तर दक्षिण अन् पश्चिम दिशेचा भाग बरड, खडकाळ असा आहे. लोणार नदी गावाजवळून वाहते. गावाच्या पूर्वेला उत्तर-दक्षिण असा कमी उंचीचा डोंगर पसरला आहे. निसर्गाने जणू ती भिंतच घालून दिलेली आहे!

माझ्या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. साधारणतः पावणेतीनशे वर्षांपूर्वी रघुजी भोसले यांच्या काळात पश्चिम विदर्भावर मराठी सत्तेचा अंमल होता. रघुजी भोसले यांच्यानंतर त्याचा मुलगा जानोजी भोसले सत्तेवर आला. जानोजी भोसले यांना पुत्र नसल्यामुळे त्यांनी  दुसरा रघुजी भोसले याला दत्तक घेतले. (वास्तविक, तो मुधोजी भोसले यांचा मुलगा होता.) जानोजी भोसले यांच्या मृत्यूनंतर गादीवर कोणास बसवावे या बाबतीत जानोजी भोसले यांची पत्नी दर्याबाई व जानोजी यांचा भाऊ साबाजी भोसले यांच्यात वादाला सुरुवात झाली. कारण दुसरा रघुजी भोसले वयाने फारच लहान होता. तशा वेळी मुधोजी भोसले यांनी जवळच्या एलिचपूरच्या (आजचे अचलपूर) नवाबाचे सैन्य जमवून साबाजीवर आक्रमण केले. त्यांची ती लढाई 1773 मध्ये कुंभारी या गावी झाली. त्यात मुधोजीचा पराभव झाला. कुंभारीच्या लढाईत कुंभारी, हिंगणा कुंभारी, उदेगांव, उकळी, नंदापूर ही पाच गावे उजाड झाली. सध्या कुंभारी जेथे वसलेले आहे तेथे जंगल होते. पूर्वीचे कुंभारी गाव तसेच उजाड राहिले आहे. त्याला वरले गाव म्हणून संबोधतात. गाव स्वातंत्र्य संग्रामात पुढे होते. आज गावातील तीन जवान सीमेवर आहेत.

माझ्या कुंभारी गावात बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली विहीर (बारव) आहे, तर महादेवाचे हेमाडपंथी मंदिरही पाहण्यास मिळते. गावात मधोमध मारुतीचे मंदिर आहे. त्याला मारुतीची मढी असे म्हणत. गावात राममंदिरसुद्धा आहे. त्याचबरोबर खोकला माय, ईसामाय, मरी माय, गोठाणावर जाना माय, पाय विहिरीत आसरा, लक्ष्मीबाईचे ठाण, सुपीनाथ महाराज, तर मुस्लीम धर्मीयांसाठी मशीद, बौद्ध धर्मीयांसाठी बुद्धविहार इत्यादी स्थळे गावाच्या धार्मिक ऐक्याची प्रचीती देतात.

गावाची लोकसंख्या तीन हजार असून, गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे; अनेकांनी दुग्ध व्यवसायाची कास धरली आहे. शेतमजुरी करणाऱ्यांची व अकोला ‘एमआयडीसी’मधील कामगार म्हणून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. गावात कोणीही बेरोजगार मात्र नाही ! ग्रामपंचायतीची सभासद संख्या नऊ एवढी आहे.

गावकरी कुंभारीचे ग्रामदैवत म्हणून नागनाथ महाराजांना मानतात. दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी त्यांचा भंडारा केला जातो. सर्वांनी, सर्वांसाठी, सर्व मिळून, स्वयंपाक करून प्रसाद ग्रहण करतात. जात, पात, पंथ भेद तेथे नसतो. समाजऐक्याचे सुंदर असे उदाहरण म्हणजे नागनाथबुवाचा भंडारा असे म्हणता येईल. गावाची श्रद्धा असलेले दुसरे दैवत म्हणजे फत्तेपूर महाराज. ती गावातील प्राण्यांची व पशूंची देवता म्हणून ओळखली जाते. ती गावाबाहेर दूर डोंगरावर आहे. गावातील गुराखी त्या देवतेची नित्य पूजा करून त्यांच्या नावाने भंडारा दरवर्षी करतात. गावात नागपंचमीला बाऱ्याचा कार्यक्रम होतो. गावातील नागोबाची पूजा करून अरबळे मंत्रजप करतात. महादेवाची काठी हीसुद्धा एक परंपरा आहे. महादेवाच्या मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्यात (मार्च) अष्टमीच्या दिवशी काठीचा कार्यक्रम असतो. काठी म्हणजे पार्वती. त्या पार्वतीमातेच्या महादेवासोबत लग्नाचा तो कार्यक्रम असतो.  गावात हिंदू व मुस्लिम यांची एक देवता म्हणजे शादुलबुवा. ते जातीय सलोख्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

शासनाने लोणार नदीवर धरण बांधले असून, त्या जलाशयात उत्कृष्ट प्रकारचे जातिवंत मासळीचे उत्पादन घेतले जाते. ती मोठी भर गावच्या अर्थकारणात आहे. तेथे तलाव हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. त्या ठिकाणी चीन व जपान या देशांमधील ग्रे हेडेड, लॅपविंग पक्षी स्थलांतर करून दरवर्षी वास्तव्यास येतात. देशातील अन्य काही दुर्मीळ पक्ष्यांची नोंद तेथे करण्यात आली आहे. तो तलाव ही पक्षीप्रेमी तथा निसर्गप्रेमी यांना पर्यटनासाठी फार मोठी पर्वणी आहे.

_kumbhari_maza-gaav_1.jpgगावातील ‘जयबजरंग मंडळ’ या संस्थेचे कार्य शब्दातीत आहे. संस्था ज्ञान कला-क्रीडा हे ध्येय घेऊन 1 जुलै 1977 पासून काम करते. संस्थेतर्फे पहिल्या वर्गापासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था गावातच आहे. संस्थेतर्फे मुला-मुलींसाठी व्यायामशाळा चालवली जाते. संस्थेच्या शाखा विदर्भात अडीचशे गावांत आहेत. संस्थेच्या अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धांत जिल्ह्याचे व राज्याचे नेतृत्व केले आहे. वासुदेव बिडकर यांचा समावेश दिल्ली येथील आशियाई क्रीडा स्पर्धांत (1982) सादर झालेल्या महाराष्ट्राच्या लेझीम पथकात होता, तर कुंभारी व्यायाम शाळेचा जानराव आगळे (फ्रान्स, इटली), कमल गांवडे (इंग्लंड), बेबी अतकरे (रशिया, फिनलँड) या शेतकरी-शेतमजुरांच्या बालकांनी आंतरराष्ट्रीय बाल व महिला महोत्सवात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. गावात अनाथ मुलांसाठी बालगृह तर अनाथ गुरांसाठी गोरक्षण संस्था कार्यरत आहे. गावकऱ्यांनी राबवलेली रक्तदान चळवळ तर ग्रामीण भागात मोलाची ठरली. शरद पवार, आर.आर. पाटील यांची रक्ततुला करून, जमा झालेले रक्त गरजू महिला रोग्यांना पुरवून त्यांचे प्राण वाचवले. रक्तदान शिबीर, मोफत रोगनिदान शिबीर, अंधत्व निवारण शिबीर अनेक वेळा घेऊन रोग्यांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या गेल्या. रूग्णांना मोफत चष्मे वाटप झाले. मंडळातर्फे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाचे आयोजन बारा वर्षांपासून केले जात आहे. सर्व धर्माच्या सातशे जोडप्यांचे विवाह विनामूल्य लावण्यात आले आहेत. वृक्षारोपण, पर्यावरण, साहसी उपक्रम इत्यादी क्षेत्रांतही गावात उपक्रम चालू असतात.

कुंभारी गावाचे कलाक्षेत्रातील योगदान जिल्हा स्तरावर नोंदले गेले आहे. कलावंतांनी नाट्यस्पर्धांत सहभाग घेतला आहे. चित्रपटसृष्टीतही त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटला आहे. कलावंतांनी एकवीस चित्रपटांत विविध भूमिका केल्या. गावातील किशोर बळी यांनी पाच चित्रपटांसाठी गीतलेखन केले, तर शत्रुघ्न बिडकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित ‘डेबू’ या चित्रपटाची व सौ. राधा बिडकर यांनी ‘झरी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण गावात झाले. त्यात ‘राघू-मैना’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’, ‘महानायक’, ‘डेबू’, ‘टिंब टिंब’, ‘मिसकॉल’ या मराठी आणि नाना पाटेकर दिग्दर्शित ‘प्रहार’ या हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्यामुळे कुंभारीची ओळख अकोल्याची फिल्मसिटी अशी केली जाते.

कुंभारीकरांना विविध क्षेत्रांतील कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. तुकाराम बिडकर यांना युवकसेवा क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती युवा पुरस्कार, अ.भा.वि.प.ने युवाशक्ती पुरस्कार, शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दलित मित्र पुरस्कार देऊन गौरव केला आहे. राज्याच्या क्रीडा विभागाचा धनुर्विद्या खेळातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार कमल गावंडे हिला तर क्रीडा संघटकाचा शिवछत्रपती पुरस्कार शत्रुघ्न बिडकर यांना मिळाला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीकृष्ण बिडकर, किशोर बळी, श्रीकृष्ण डांबलकार या कुंभारी गावच्या शिक्षकांना मिळाला. स्काऊटमधील राज्यातील सर्वोच्च पुरस्कार बबलू तायडे व अनेक विद्यार्थ्यांना मिळाले. कुंभारीच्या ‘जयबजरंग मंडळा’चा महाराष्ट्र शासनातर्फे महिला क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्याबाई होळकर पुरस्कार, आदिवासी क्षेत्रातील आदिवासी सेवक संस्था पुरस्कार, वृक्षारोपण क्षेत्रातील श्री शिवाजी वनश्री पुरस्कार तर भारत सरकारतर्फे बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

- तुकाराम बिडकर, राधे-१२१, डॉ. मोरे हॉस्पिटल जवळ, रामनगर, अकोला - ४४४ ००५

लेखी अभिप्राय

आपण केलेल्या कार्या बद्द्ल भाऊ आम्हाला फारच अभिमान आहे ,,,अश्या गुरूला शतशः प्रणाम ,,,,

Mahendra metkar04/01/2019

प्रा.श्री.तुकारामभाऊ बिडकर यांचा कुंभारी गावचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व पटवून देणारा लेख खूप आवडला.
या लेखाद्वारे कुंभारी गावचा इतिहास समजून घ्यायला मदत होते.
आदरणीय तुकाराम भाऊंचे खूप खूप अभिनंदन !

Shrikrishna Da…04/01/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.