कविपण मिरवणारे सुधीर मोघे (Sudhir Moghe)


_sudhir_moghe_1.jpgप्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचे पुण्यामध्ये निधन 15 मार्च 2014 रोजी झाले. गदिमा व शांता शेळके यांचा वारसा सांगणारा व साध्यासोप्या मराठी शब्दांनी कविता सजवणारा कलंदर कवी आपल्यातून निघून गेला! सुधीर मोघे यांचा जन्म सांगली जिह्यातील किर्लोस्करवाडीचा. वडील कीर्तनकार असल्याने त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी पंडिती कवींच्या उत्तम रचना पडल्या होत्या. घरच्या संस्कारांचा भाग म्हणून त्यांचे दररोजचे परवचा म्हणणे न चुकल्याने शुद्ध शब्दोच्चार आणि पाठांतर झाले, अनेक स्तोत्रे, कविता, अभंग आदी मुखोद्गत झाली होती. त्यांना त्यांच्या पुढील लिखाणात त्या सगळ्याचा उपयोग झाला. त्यांच्या कविता त्यामुळे शब्द, ताल, सूर आणि लय घेऊन येत असत. त्यांनी किर्लोस्करवाडीला, शाळेच्या दिवसांत शाळेत होणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतला, पण त्यांचा साहित्यिक म्हणून कालखंड सुरू झाला तो पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर. त्यांचे वडील बंधू श्रीकांत मोघे यांचे रंगभूमीशी संबंध असल्यामुळे, सुधीर मोघे यांना रंगभूमीचे आकर्षण लहाणपणापासून होते, पण त्यांच्यातील कवी हा लपून राहू शकत नव्हता. सुधीर मोघे यांचे ‘कविता सखी’ हे पुस्तक कविता संग्रह नसून कवीच्या लेखक म्हणून झालेल्या प्रवासाचे एक धावते वर्णणात्मक पुस्तक आहे. कविता सखी या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कवी म्हणतो,

जो दिसतो तुम्हा ।
तेवढाच मी नाही ।।
बघण्याला तुमच्या।
नसो वर्ज्यही काही ।।

या पुस्तकातून वाचकाला दिसून येते ते कवीचे हळूहळू उलगडत जाणारे व्यक्तिमत्व आणि त्या उलगडत जाणाऱ्या व्यक्तिमत्वातून वाचकाला दिसून येतो तो चिंतनातून, अनुभवातून आणि निरीक्षणातून प्रगल्भ होत गेलेला त्यांच्यातील कवीचा प्रवास. किर्लोस्करवाडीला असतानाच त्यांच्यातील कवीपण त्यांना अधून मधून जाणवू लागले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने बहर आला तो ते पुण्यात आल्यावर.

त्यांनी ते सत्तरच्या दशकात पुण्यात आल्यावर शोध सुरू केला तो साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांचा. ते तो करता करता ‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या सान्निध्यात आले. त्यांचे अष्टपैलुत्व त्या संस्थेच्या माध्यमातूनच पुढे आले. त्यांनी त्या संस्थेतर्फे ‘मंतरलेल्या चैत्रबना’पासून ते ‘नक्षत्रांचे देणे’पर्यंत गाण्यांचे अनेक कार्यक्रम सादर केले. पुण्यामध्ये असलेला बी.एम.सी. सी.कॉलेजचा परिसर ही त्यांची सगळ्यात आवडीची जागा होती. ते पुण्यामध्ये राहण्यास आल्यावर त्यांच्या पहिल्या कवितेने जन्म घेतला तो तेथेच. ती कविता होती-

मी रित्या आभाळी रिता मेघसा होतो,
शून्यात बिंब शून्याचे रेखित होतो,
जागले काय? हे कुठले वारे सुटले,
शब्दांत मनाचे थेंब दाटूनी आले.

ते ग. दि. माडगुळकर यांना गुरूस्थानी मानत असत आणि त्यांच्या बरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या सान्निध्यामुळे मोघे यांच्या कवितांवर गदिमांचा प्रभाव जाणवतो. आणि तो जाणवतो तो त्यांच्या साध्यासोप्या पण अस्सल मराठी शब्दांमधून. एकदा ते गदिमांबरोबर मुंबईला सुधीर फडके यांच्याकडे गेले असता, श्रीधर फडके यांनी त्यांच्याकडे एका कवितेची मागणी केली आणि मोघे यांनीदेखील लगेच त्यांना एक कविता दिली. ती कविता होती- ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’आणि ते श्रीधर फडके यांनी दिलेल्या पहिल्या चालीचे गाणे ठरले!

‘स्वरानंद’बरोबर प्रवास चालू असताना आणि ‘आपली आवड’ व ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या कार्यक्रमांमुळे लोकांची कवितेची जाण आणि अभिरूची वाढत असताना, त्यांचा आणखी एक पैलू लोकांसमोर आला व तो म्हणजे त्यांची कार्यक्रमाच्या संदर्भात करत असलेली निवेदन शैली. त्यांची निवेदन करण्याची शैली खास होती. ते त्यांची एखादी कविता निवेदन करता करता मधूनच अशा रीतीने सादर करायचे, की प्रेक्षक त्या कवितेबरोबर त्यांच्या निवेदनालादेखील खास दाद देत असत. तो धागा पकडून त्यांनी त्यांचा ‘कविता पानोपानी’ हा कार्यक्रम सादर केला.

मुंबई दूरदर्शनच्या ‘मराठी युवादर्शन’ कार्यक्रमामध्ये त्यांना मराठी पॉप गाणी लिहिण्याची संधी मिळाली. पॉप संगीत हे मराठीला नवीन होते. नंदू भेंडे यांच्यासारखा एखादा कलावंत वगळला तर मराठी पॉप गाणारा कोणी नव्हता. पॉप संगीताला जवळ जाणारा असा प्रयोग एका मराठी नाटकामध्ये झाला होता व ते नाटक होते ‘लेकुरे उदंड झाली’. प्रा. वसंत कानेटकर यांनी लिहिलेले. योगायोगाची गोष्ट म्हणजे, त्या नाटकात संवादात्मक गाणी ज्यांच्या तोंडी दिली होती, ते होते श्रीकांत मोघे.

अहो, या गोजिरवाण्या घरात,
माणसांना लागलंय खूळ,
यातली गोम अशी आहे, की
आम्हांला नाही मूल!

हे संवादात्मक गाणे त्यावेळी फार गाजले होते. अशी अनेक गाणी त्या नाटकामध्ये होती.

पॉप संगीत हे मराठीला नवीन होते. पॉप संगीताची जबाबदारी सोपवली होती संगीतकार आनंद मोडक यांच्याकडे. त्यांचा व सुधीर मोघे यांचा चांगला दोस्ताना. त्यांनी मोघे यांना पॉप संगीतासाठी कविता लिहिण्याची सूचना केली. मोघे यांनीदेखील मिळालेल्या संधीचे सोने केले.

‘एक सांगशील-
आपले रस्ते अवचित कुठे-कसे जुळले?
आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले?
आणि, तुझ्या-माझ्या सहवासाचा योग आपल्या कुंडलीत कुठून लाभला?’
‘ही नारिंगी संध्याकाळ,
ही सुखाची सफर,
हा झकास बेत कसा जमला?’

_sudhir_moghe_2.jpgसुधीर मोघे यांचा पिंड पोसला गेला होता तो छंदबद्ध व वृत्तबद्ध कवितांवर. त्यांना त्याखेरीज परिचयाचे होते ते संगीतानुकूल गीतबंध. पण मोघे यांच्या कवितेत त्या काळात फारसा प्रचलित नसलेला प्रवाही गद्यप्रकार देखील येऊ लागला. आशयपूर्ण व सहजसोपे, मनाला भिडणारे शब्द व संवादात्मक भाषा यांमुळे त्यांची पॉप गाणी गाजली. ती नंदू भेंडे व रवींद्र साठे यांच्या आवाजात सादर केली गेली. रसिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी नंदू भेंडे यांनी त्यांच्या पाश्चात्त्य ढंगात सादर केलेले एक गाणे प्रचंड गाजले होते.

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं.

त्यांच्या वात्रटिकादेखील दूरदर्शनच्या कार्यक्रमामध्ये गाजल्या. पत्नी या प्रकरणाविषयी नवऱ्याचे गाऱ्हाणे होते -

‘खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो,
एका दुर्लभ क्षणी एक चेहरा आपल्याला भेटतो अक्कल गहाण पडते,
भेजा कामातून जातो,
चक्क, उघड्या डोळ्यांनी आपण लग्न करतो
त्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं
बायको नावाचं वेगळंच प्रकरण आपल्यापुढे येतं
हा दारूण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का?
सगळ्या मुलांचं लग्नानंतर हे असंच होतं का?’

ही फक्त पुरूषांची बाजू मांडून कसं चालेल? म्हणून त्यांनी बायकोचीही बाजू मांडली -

‘सगळे पुरूष एकजात ढोंगी, कांगावखोर
बायको म्हणजे त्यांना वाटते नाचणारी लांडोर
लग्नाआधी ज्याच्यासाठी तिच्यावर जीव टाकतात
आणि त्याच गोष्टी लग्नानंतर त्यांचा जीव खातात
प्रेयसी कशी स्मार्ट,
चंट आणि बिनधास्त हवी
लग्नानंतर मात्र तिची काकुबाई व्हावी
प्रत्येक पुरूषी भेजात हा सावळागोंधळ का?
सगळ्या मुलांचं लग्नानंतर हे असंच होतं का?’

ते स्वतः सादर करत असलेला ‘कविता पानोपानी’ हा कार्यक्रमदेखील चोखंदळ श्रोत्यांनी रुचीने पाहिला/ऐकला. तो एकपात्री प्रयोग होता. सुधीर मोघे स्वतः एकटे रंगमंचावर कोठलीही साथ न घेता फक्त स्वतःच्या कविता म्हणत जात. तसे ते जोखमीचे काम, पण स्वतःवरचा व स्वतःच्या कवितांवरचा विश्वास आणि इतर कार्यक्रमांतून तयार झालेला प्रेक्षकांचा कान यांमुळे त्या कार्यक्रमालादेखील निवडक प्रेक्षकांची दाद मिळत असे. तो कार्यक्रम लोकप्रिय मात्र होऊ शकला नाही.

सुधीर मोघे हे मराठी कवी म्हटल्यावर डोळ्यांसमोर जी कल्पना येते-उभी राहते त्यात फिट बसणारे कवी होते. अंगात झब्बा, त्याच्या बाह्या अर्ध्या वर केलेल्या, खाली पँट, डोक्यावर पांढरे शुभ्र विस्कटलेले केस व खांद्यावर समाजवादी झोळी या अशा वेशात सुधीर मोघे रंगमंचावर प्रवेश करत आणि मग सुरू होई तो एकेक सुरेख कवितांचा ओघ -

शब्दांच्या आकाशाला, शब्दांचे मेघ फिरावे
शब्दांच्या क्षितिजावरती, शब्दांनी बिंब धरावे

अशा शब्दांत त्यांचे काव्य येत असे. ते तो कार्यक्रम करताना त्यात एवढे समरसून जात असत, की तो आनंद त्यांच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीतून व्यक्त होत असे.

त्यांच्या आयुष्यातील 1970-80चा काळ मौजमजेचा होता. त्यांचा बसण्याचा व चर्चा करण्याचा अड्डा फर्ग्युसन रोडवरील ‘कॅफे डिलाइट’ हा होता. त्या पिढीतील पुण्याच्या तरुणांचे ते प्रेमाचे ठिकाण होते. समाजकारण, राजकारण, कलाकारण अशा सर्व क्षेत्रांतील नामवंत आणि नामवंत होऊ पाहणारी मंडळी तेथे जमत असत. त्यात नावारूपाला आलेले प्रभाकर वाडेकर, राहुल घोरपडे, समीरण वाळवेकर, रवींद्र खरे, अपर्णा पणशीकर, चित्रा देवबागकर अशासारख्या अनेकांचा समावेश होता. तेथे वेगवेगळे छंद-विचार-गप्पा असलेली कोंडाळी गोळा होत.

अनुवाद हा लेखकांचा आवडता लेखनप्रकार. मोघे यांच्या वाचन मुशाफिरीत साहिर लुधियानवी यांचे खूप गाजलेले ‘ताज’ हे काव्य आले आणि ते चक्क उर्दू काव्याच्या प्रेमात पडले! त्यांनी नंतर साहिर लुधियानवीच्या प्रसिद्ध ‘परछाईया’ या दीर्घ काव्याचा त्याच नावाने अनुवाद केला.

सुधीर मोघे यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांकरता गाणी लिहिली. त्यांचे जास्त गाजलेले चित्रपट म्हणजे, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘शापित’, ‘जानकी’, ‘पुढचं पाऊल’, ‘कळत-नकळत’, ‘चौकट राजा’, ‘देऊळ’. त्यांची चित्रपटांबाहेरील अनेक गाणीदेखील गाजली. त्यांतील नंतर काही चित्रपटांत घेतली गेली. त्यांचे पहिले गाजलेले गाणे म्हणजे सुधीर फडके यांच्या आवाजातील ‘सखी मंद झाल्या तारका’, त्याशिवाय त्यांनी ‘दयाघना मन मनास उमगत नाही’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘कुण्या गावाचं आलं पाखरू’ अशी अनेक छान छान गाणी लिहिली. त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले, त्यात सर्वात गाजलेले गाणे म्हणजे सुरेश भट यांनी लिहिलेले ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’- अक्षरशः एक भन्नाट चाल!

सुधीर मोघे हे मूळ कवी, पण त्यांचा संचार काव्यगीत, चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट या क्षेत्रांत होता, त्याचबरोबर ते चित्रकारदेखील होते. त्यांचे सहा कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत - ते म्हणजे, ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्षांचे ठसे’, ‘लय’, ‘शब्दधून’ व ‘स्वतंत्रते भगवती’. त्यांनी गद्यलेखनही केले आहे, ‘अनुबंध’, ‘कविता सखी’, ‘गाणारी वाट’, ‘निरंकुशाची रोजनिशी’ हे त्यांचे गद्यलेखन पुस्तकरुपात प्रसिद्ध झाले आहे. स्वाभाविकच अशा या हरहुन्नरी, संवेदनशील आणि बा.भ. बोरकर यांच्याप्रमाणे स्वत:चे कविपण मोठ्या तोऱ्याने मिरवणाऱ्या कलंदर कलाकाराला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना राज्य सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट गीतकार’ सन्मान, ‘गदिमा चैत्रबन’ पुरस्कार, ‘केशवसुत’ पुरस्कार, ‘मृण्मयी’ पुरस्कार, ‘म.टा.’ सन्मान असे पुरस्कार मिळाले. त्यांनी लिहिलेल्या आणि नंदू भेंडे यांनी गाऊन अमर केलेल्या ‘देवा, मला भेटायचंय तुला' या गाण्याच्या शेवटी सुधीर मोघे लिहितात,

हं, तू असं कर, मला रीतसर आमंत्रण पाठव,
जाण्यायेण्याचा भाडेखर्च दे किंवा चक्क तुझं वाहन पाठव,
आणि स्वर्ग स्वर्ग म्हणतात त्याची झलक एकदा तरी दाखव,
पण एक विसरू नकोस, तिथून परत मात्र नक्की यायचंय मला.

असा हा मनस्वी कलावंत वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी आपल्यातून निघून गेला. प्रवासाला जातानाही त्यांच्या कवितेची त्यांना साथ मिळाली असेल, कारण त्यांनीच लिहिले होते-
‘एका समंजस सावध क्षणी माझ्या मनानं मला निर्वाणी बजावलं,

खरं म्हणजे खडसावलंच,
होणार नाही कोणी दिवा,
मिळणार नाही उबदार हात,
तुझी तुलाच चालावी लागेल,
पायाखालची एकाकी वाट

हे त्यानं सांगितलं आणि मला पटलं तेव्हा, वाट जवळ जवळ संपली होती!’

- माधव ठाकूर, sahitya.mandir@yahoo.in

लेखी अभिप्राय

अतिशय छान लेख . धन्यवाद. या लेखकाचे इतर लेख कुठे मिळतील??

Asmita03/01/2019

खुप छान सविस्तर माहिती.

अम्रुता देखणे 16/01/2020

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.