कोंझर गावाची रायगड जिल्ह्यात आघाडी (Konjhar)


_Konzar_Village_1.jpgकोंझर हे गाव ‘रायगड’ किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. रायगड म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. त्या गावाच्या नावाबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. गावाची रचना अभेद्य किल्ल्याप्रमाणे वाटते. गावाच्या उत्तर–दक्षिण दिशांना प्रवेशद्वारांवर हनुमंताची मंदिरे आहेत. पश्चिम दिशेस ग्रामदैवत वाघजाई मातेचे स्वयंभू स्थान आहे, तर पूर्वेस अभेद्य रायगड. पाचाड गावापासून पाच किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या साडेपाचशे आहे. शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील हत्ती तळ (कुंजर तळ) त्या ठिकाणी होता. ‘कुंजर’चा अपभ्रंश ‘कोंझर’ म्हणून त्या ठिकाणाला कोंझर हे नाव पडले असावे. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळ स्वारीवर जाता-येता ‘कोंझर’ गाव व रायगड यांना जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान घाटमाथ्यावर त्यांच्या घोड्यांना पाणी देत असत. त्या परिसराला ‘घोडेटाकी’ असे संबोधतात व तेथील दोन-तीन किलोमीटरच्या शेतजमिनींना ‘घोडधाव’ असे उल्लेखतात. म्हणजेच सैन्यदलाची ये-जा ‘कोंझर’पर्यंत नेहमी असावी. त्यामुळे हत्तीचा तळ तेथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाघजाई माता हे गावचे ग्रामदैवत आहे. वाघजाई मातेचे स्थान गावाच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या गांधारी नदीच्या रम्य किनारी उंच झाडांच्या घनगर्द राईमध्ये आहे. तसेच, बोरजाई मातेचे स्थान गावाच्या दक्षिणेस आहे. वाघजाई उत्सव माघ त्रयोदशीला साजरा होतो; तसेच, हनुमान जयंती, नवरात्रौत्सव आणि इतर सण साजरे करून गावातील मांगल्याचे वातावरण कायम ठेवतात. ग्रामस्थांनी स्ववर्गणीतून दैनंदिन पूजेसाठी वाघजाईचे भव्य मंदिर गावाच्या मध्यभागी उभारले आहे. त्या ठिकाणाहून अभेद्य दुर्गराजाचे दर्शन होऊ शकते. ते कळत-नकळत घडलेले आश्चर्य आहे.

कोंझर गाव शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रांत रायगड विभागामध्ये अग्रेसर आहे. शंभर वर्षांहून अधिक काळापासून ते गाव सर्व सुखसोयींनी युक्त आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किराणा मालाची दोन दुकाने, पिठाची गिरणी, रेशनिंगचे स्वस्त धान्य दुकान, प्राथमिक-माध्यमिक शाळा व शेतीची अवजारे बनवण्यासाठी पांडुरंग वालेकरांची लोहारशाळा अशा सोयींनी गाव पूर्ण आहे. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डाकघर उपलब्ध आहे. आर्थिक गरजा भागवण्यासाठी दोन पतसंस्था कार्यरत आहेत. तसेच, उल्लेखनीय अशा गणेश मूर्ती बनवण्याची प्रसिद्ध कार्यशाळा (कारखाना) सुद्धा कोंझरला आहे. सदानंद देवगिरकर आणि त्यांचे चिरंजीव योगेश श्रीगणेशाच्या व देवीच्या सुबक मूर्ती बनवण्यात वर्षभर मग्न असतात. त्या मूर्ती आजूबाजूच्या गावांतून आणि पेण, महाड, पुणे-नगर शहरांपर्यंत पोचतात. मोजक्या मूर्ती सुरत-अहमदाबाद येथेही जातात. योगेश हे पोलीस पाटील आहेत. ते बहुगुणांनी संपन्न आहेत. त्यांचा 'स्नेहगंधा' नावाचा नाटकाचा 'ग्रूप' आहे. ते स्वतः नाटके लिहितात-दिग्दर्शित करतात. त्यांची नाटके परिसरातील गावांतून केली जातात. ते म्हणाले, की प्रायोजक (sponsor) मिळाला तर दूरगावी नाटकाचे प्रयोग झाले आहेत.

_Konzar_Village_2.jpgकोंझर ग्रामस्थ हे सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या शंभर वर्षांपासून रायगड विभागात अधिराज्य गाजवत आहेत. कोंझर ग्रामस्थांचे भजन म्हणजे आजूबाजूच्या गावातील लोकांना संगीतमय व मधुर आवाजाची मेजवानीच असायची! गौरी गणपतीच्या नाचांची खूप चढाओढ वीस-पंचवीस वर्षांपूर्वी असायची. कोंझर गावचे नाचाचे आविष्कार पाहण्यासाठी लांबून लोक येत. या गावातील नट सर्वत्र प्रसिद्ध होते; स्त्रीपात्रेसुद्धा! ग्रामस्थांचे दहीहंडीनिमित्त होणारे नाच तर पंचक्रोशीत कोठेच पाहण्यास मिळत नाहीत.

कोंझर ग्रामपंचायत ही स्वयंपूर्ण, स्वतंत्र आहे. ग्रामपंचायतीसाठी निवडणूक न होता सर्वानुमते सदस्य, उपसरपंच, सरपंच यांची निवड होते. रायगड जिल्हा परिषदेकडून कोंझर गावाला ‘निर्मल गाव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोंझर ग्रामस्थ एकमेकांशी आदराने वागतात, कारण तेथे सुसंस्कृत, शांतताप्रिय लोक पूर्वीपासून होते. त्यामुळे तेथे कोठल्याही प्रकारचा तंटा विकोपाला जात नाही किंवा गेला नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे वाद-विवाद कितीही गुंतागुंतीचा असला तरी सर्वांना हमखास योग्य न्याय मिळण्याची खात्री आहे. तसा न्याय स्थानिक ग्रामस्थ खुबीने देतात. न्यायदानासाठी पंच कमिटी आहे. त्यांनी दिलेला निर्णय अंतिम ठरतो. सर्व ग्रामस्थांचा त्या न्यायप्रणालीवर विश्वास आहे. वाघजाई मंदिराच्या प्रांगणात न्याय निवाडा केला जातो. महाराष्ट्र शासनाचा ‘तंटा-मुक्त गाव’ हा पुरस्कारही गावाला प्राप्त झाला आहे.

कोंझर गावात काही उत्साही तरुणांनी क्रिकेट या खेळाची बीजे तीस वर्षांपूर्वी पेरली. ती इतकी खोलवर रुजली, की त्या खेळात गावातील संघाला तालुक्यात प्रथम क्रमांकाचा संघ म्हणून मान्यता मिळाली आहे. क्रिकेटचे सामने काही वेळा कोंझर येथेही भरवले जातात.

_Konzar_Village_4.jpg‘जिजामाता माध्यमिक विद्यालया'ची स्थापना 1969 साली झाली. आजूबाजूच्या चौदा गावांच्या परिसरात शिक्षणाची सोयच नसल्याने उचललेले ते पाऊल म्हणजे शैक्षणिक क्रांतीच होती! खेड्यांमधून आलेले तरूण तेथे शिक्षण घेऊन कुटुंबाला आर्थिक आधार देत असत. खुद्द कोंझर गावातील विद्यार्थ्यांचे यश नेत्रदीपक आहे. कोंझर गावातून इंजिनीयर्स, डॉक्टर्स, शिक्षक आणि औषध उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांत उच्चपदांवर कार्य करणारी पिढी निर्माण झाली आहे. पूर्व प्राथमिक शाळेतील सुंभे गुरुजी, मोहिते गुरुजी, कीर्तने गुरुजी यांनी केलेले प्रयत्न व अपार मेहनत शिक्षणाचा पाया रचण्यासाठी कामी आले. तिघेही शिक्षक हयात नाहीत. त्यांच्यामुळे गावातील वरिष्ठ व्यक्ती सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शहरात स्थलांतरित होऊन आई-वडिलांना, भावंडांना आधार देते झाले. कोंझर शाळा ‘रायगड जिल्हा परिषदे’च्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

महात्मा गांधी यांनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाला कै. विष्णू केरुशेठ खातू हे गेले होते. ते महाडच्या सत्याग्रहींपर्यंत पोलिसांची नजर चुकवून पोचले. त्यानंतर राष्ट्रकार्याचा तो वारसा देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी सैन्यात भरती होऊन पुढे चालू ठेवला आहे.

- ओमकार कंक, knakrakmo@gmail.com

लेखी अभिप्राय

अप्रतीम

Sameer Devidas…05/01/2019

खुप मजेदार होत.वाचण्यात मज्जा आली.जे माहित नव्हत, ते सुद्धा माहित झाल. मी सुद्धा कोंझर चा आहे. गर्व आहे मी मराठी असल्याचा व रायगडकर कोंझरकर असल्याचा . आणि रायगडाच्या पुण्य भुमीवर जन्माला आल्याचा जय...शिवराय..?

Vishal santosh kadam05/01/2019

खुप मजेदार होत.वाचण्यात मज्जा आली.जे माहित नव्हत, ते सुद्धा माहित झाल. मी सुद्धा कोंझर चा आहे. गर्व आहे मी मराठी असल्याचा व रायगडकर कोंझरकर असल्याचा . आणि रायगडाच्या पुण्य भुमीवर जन्माला आल्याचा जय...शिवराय..?

Vishal santosh kadam05/01/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.